ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. १४ - तालुक्यातील पैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी येथील वन्यजीव सोयरे संस्थेने नदीच्या तीरावर निर्माल्य कुंड तयार करून भाविकांना त्यात निर्माल्य टाकण्याचे आवाहन केले होते. या उपक्रमाला भाविकांनी मोठ्या
प्रमाणात प्रतिसाद दिला असून निर्माल्य कुंडात नवरात्रोत्सवाचे निर्माल्य टाकून नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेतला.
जिल्ह्यातून जाणा-या पैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीच्या नावाने नावारूप झालेल्या पैनगंगा अभयारण्यातील वन्यजीवांना या प्रदूषणाने होत असलेले धोके लक्षात घेऊन बुलडाणा तालुक्यातील साखळी फाट्याजवळ पैनगंगा नदी लगत असलेल्या पुलाजवळ निर्माल्य वस्तू एकत्र जमा करून नदीचे प्रदूषणापासून मुक्तता करण्यासाठी वन्यजीव सोयरे बुलडाणा यांचे मार्फत पुलाजवळ तात्पुरते निर्माल्य कुंड १३ सप्टेंबर रोजी तयार करून भाऊ, दादा अन् काका, पैनगंगा नदीचे प्रदूषण रोका, निर्माल्य येथेच टाका, असे घोष वाक्स तयार करून भाविकांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गणपती विसर्जनात भरभरुन दिलेल्या प्रतिसादानंतर आता नवरात्रात देवीचे विसर्जनाच्या वेळी १२ आॅक्टोबर पासून अनेक भाविक भक्तांनी निर्माल्य वन्यजीव सोय-यांनी तयार केलेल्या निर्माल्य कुंडमध्ये टाकून सहकार्य करीत आहेत. निर्माल्य कुंड तयार करण्यासाठी वन्यजीव सोयरे संस्थेचे गणेश श्रीवास्तव, गणेश झगरे, गणेश वानखेडे, प्रशांत आढे, सुरज वाडेकर, अमोल रिंढे, संजय मोटे, मनोज तायडे, मोरे, सुरेश दांडगे, संतोष कंकाळ, नितीन श्रीवास्तव यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून भाविकांचा प्रतिसाद मिळत आहे.