ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 21 - राज्यात पत्रकार संरक्षण कायदा विधेयक संमत झाले असले तरी पत्रकारांवरील हल्ले कमी झालेले नाहीत. शुक्रवारी ‘लोकमत’चे उपसंपादक राहुल भडांगे यांच्यावर अंबाझरी तलावाजवळील श्री गजानन मंदिरासमोर अज्ञात मद्यधुंद तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. भडांगे यांना मारहाण करुन त्यांची दुचाकी व मोबाईलदेखील लुटण्याचा प्रयत्न झाला.भडांगे कार्यालयाकडे जात असताना पांढ-या रंगाच्या मारुती ‘स्विफ्ट’ गाडीतील तरुणांनी त्यांना ‘कट’ मारला. याबाबत भडांगे यांनी हरकत घेतली असता काही मीटर अंतरावर थांबून तरुणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या ‘युनिफॉर्म’वरुन ते एखाद्या महाविद्यालयातील विद्यार्थी वाटत होते. मागूनदेखील काही तरुण आले व यात सहभागी झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भडांगे गोंधळले. तरीदेखील त्यांनी गाडीचा क्रमांक कागदावर टिपला. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्या खिशातून सर्व कागदपत्रे काढून नेली. याबाबत प्रतापनगर पोलिस ठाण्यात भडांगे यांनी तत्काळ तक्रार दाखल केली. गाडीचा शेवटचा क्रमांक ०६६० हा होता. पत्रकार राहुल भडांगे यांच्यावरील हा हल्ला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला आहे. याचा निषेध व्हायलाच हवा व आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी पत्रकारांकडून होत आहे.