बेनझीर जमादार,पुणे- व्हॉट्सअॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये स्टेटस हरविल्याने तरुणाई नाराज झाली आहे. या नव्या व्हर्जनवर प्रोफाईल म्हणून फक्त फोटोच अपलोड करता येऊ शकतो; मात्र स्टेटस अपडेट होत नाही. व्हॉट्सअॅप स्टेटस म्हणजे एखादी भावना आपण त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो. कोणाला वाढदिवस, परीक्षा, सणसूद अशा अनेक आनंदाच्या क्षणाच्या शुभेच्छादेखील या माध्यमातूनच दिल्या जातात. मित्रासोबत भांडणे झाली, कोणी मन दुखावले असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीला टोमणे मारण्याची जागादेखील व्हॉट्सअॅप स्टेटसची होते. त्याचबरोबर आज कोणाचा काय मूड आहे, याचे आकलनदेखील स्टेटसच्या माध्यमातून व्हायचे. कोण कुठे फेरफटका मारत आहे, हेसुद्धा या स्टेटसमधून कळत होते. आता मात्र या सर्व गोष्टींना तरुणाईला मुकावे लागणार आहे.सोशल मीडियावरही या व्हर्जनवर टीका होत आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर अशा अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून मजेशीर कमेंट, पोस्ट आणि जोक्स पाहायला मिळत आहेत. स्टेटसला भावपूर्ण श्रद्धांजलीे, बाकी कुणाचा विचार नाही केला तरी चाललं असतं; पण पुणेकरांचा विचार केला पाहिजे, असे म्हणत पुणेकरांना पुन्हा टार्गेट केले आहे. >व्हॉट्सअॅपचे नवीन व्हर्जन हा एक नंबर बकवास आहे. आता कोणाचे स्टेटसही वाचता येणार नाही. स्टेटस वाचणे हा एक चांगला टाइमपास होता. एकदा फोटो अपलोड केला, तर फक्त २४ तासच अपडेट राहतो. त्यानंतर तो डिलीट होतो. आता कोणाचा फोटो पाहण्यासाठी काय २४ तास फोन हातात ठेवायचा का? भले ते अपडेट जरी मिळत असेल तरी. - कृणाल मेहता, तरुणव्हॉट्सअॅपचे नवीन व्हर्जन मला बिलकूल पटलेच नाही, कारण पूर्वी व्हॉट्सअॅप हाताळणे सोपे होते. आता खूपच अवघड करून टाकले आहे. स्टेटसही ठेवता येत नाही की कोणाचे वाचताही येत नाही. आता ते नवीन व्हर्जन डिलीटही मारता येत नाही. म्हणूनच आवर्जून सांगावेसे वाटते, की जे जुने व्हॉट्सअॅप वापरत असेल, त्यांनी व्हॉट्सअॅप अपडेट करू नका. नाही तर फक्त हाती लागेल पछतावा. - प्राची विधाते, तरुणी
‘स्टेटस’ गेल्याने तरुणाई नाराज
By admin | Published: March 07, 2017 1:03 AM