कऱ्हाड : विद्यानगर येथे रविवारी रात्री गस्त घालत असणाऱ्या पोलिसांवर आठ ते दहा युवकांनी हल्ला केला. या वेळी युवकांनी केलेली धक्काबुक्की व मारहाणीत वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एक पोलीस जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. त्यामुळे रविवारपर्यंत प्रचाराची मुदत होती. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी रात्री शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी.आर. पाटील हे काही पोलिसांसह गस्त घालत होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सर्व जण विद्यानगर परिसरात पोहोचले, त्या वेळी तेथे युवकांची वादावादी सुरू असल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आले. पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव पवार यांनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवकांनी पवार यांनाच घेरून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्या वेळी पाटील यांनी जीपमधून उतरून त्या ठिकाणी धाव घेतली. युवकांना शांत राहण्याचे आवाहन करीत त्यांनी कॉन्स्टेबल पवार यांना जमावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी जमावाने पवारांसह पाटील यांनाही धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ संबंधित युवकांना अटक केली. (प्रतिनिधी)
कऱ्हाडमध्ये पोलिसांवर युवकांचा हल्ला
By admin | Published: August 05, 2015 1:08 AM