ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ११ - मुंबईतील विक्रोळी येथे पोलिस भरतीदरम्यान एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. अंबादास सोनवणे असे या तरुणाचे नाव असून तो मालेगावहून पोलिस भरतीसाठी मुंबईत आला होता.
मालेगाव येथे राहणा-या अंबादास सोनवणे पोलिस दलात दाखल होण्याचे स्वप्न बाळगून मुंबईत पोलिस भरतीसाठी आला होता. विक्रोळीत पोलिस भरतीसाठी शारिरीक चाचणी सुरु होती. या दरम्यान धावताना अंबादास अचानक पडला. त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रणरणत्या उन्हात भरतीसाठी आलेल्या तरुणांना धावण्यासाठी ५ किलोमीटरचे अंतर ठेवण्यात आले आहे. हे अंतर कापताना उन्हामुळे तरुणांची दमछाक होत आहे. मंगळवारीदेखील भरतीदरम्यान दोन तरुण जखमी झाले होते. उन्हात भरतीप्रक्रिया राबवणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे एका माजी पोलिस अधिका-याने सांगितले. त्यामुळे गृहखात्याच्या भरतीप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.