ठाणे : गायन, नृत्य आणि लिपसिंकिंगच्या आधारे मोठ्या कल्पकतेने व्हिडीओ बनवून ते शेअर करणारे तरुण युजर्स दिवसभरातील सरासरी ५२ मिनिटे वेळ टिक टॉक अॅपवर घालवत आहेत. तसेच दहा पैकी नऊ युजर्स दिवसभरात वारंवार हे अॅप वापरत असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.मूळच्या चीनमधील कंपनीने विकसित केलेले टिक टॉक अॅप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात ५० कोटींपेक्षा अॅक्टिव्ह युजर्स आहेत. तर, भारतातील २० कोटींपेक्षा मोबाइल वापरकर्त्यांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. तर, १२ कोटी अॅक्टिव्ह युजर्स आहेत. अॅप युर्जसचे वय १६ ते २४ या वयोगटांतील असून, महिलांपेक्षा पुरुष हे अॅप वापरण्यात आघाडीवर आहेत. ५५.६ टक्के पुरुष तर, ४४.४ टक्के महिला हे अॅप वापरत आहेत.सोशल मीडियावरील युट्युब, फेसबुक, इन्स्टिाग्राम यासारख्या गुगलचे मोठे पाठबळ असलेल्या अॅपना टिक टॉकमुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारतातील ३० टक्के मोबाइलधारकांनी हे अॅप इनस्टॉल केले आहे. गंमतीजंमती, मजेशीर व्हिडीओ बनवण्याचे व ते अपलोड करण्याबरोबरच अधिकाधिक लाइक्स मिळवण्याची एक स्पर्धाच महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये पाहायला मिळत आहे. असे असले तरी केवळ करमणूक, विरंगुळा म्हणूनही या अॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.दरम्यान, टिक टॉकसाठी व्हिडीओ बनवताना अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील तीन अल्पवयीन मुलांच्या आर्इंनी हायकोर्टात धाव घेत या अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.टिक टॉकमुळे माझ्यासह अनेकांना आपले टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली आहे. सध्या मला विनोदी डायलॉग आणि स्लो मोशन स्टाइलिंग व्हिडीओ बनवायला आवडतात. दिवसाला एक तरी व्हिडीओ बनवतोच. सध्या माझे टिक टॉकवर १८९५ फॉलोअर्स आहेत, असे कल्याण पूर्वेतील हितेश पाटील याने सांगितले.सुप्त कलागुणांना टिक टॉकमुळे आता वाव मिळू लागला आहे. मात्र, अनेक जण स्टंटबाजीसाठी जीव धोक्यात घालत आहेत. व्हिडीओसाठी ठाकुर्लीत चालत्या ट्रेनमध्ये एका तरुणाने चढण्याचा प्रयत्न कला. याबाबत पोलिसांना सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. असे प्रकार नेहमीचेच झाल्याचे शुभम कोळंबकर याने सांगितले.
टिक टॉकमुळे पडली तरुणाईच्या कल्पकतेत भर, महिलांच्या तुलनेत पुरुषांकडून जास्त वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 1:38 AM