“अजितदादांनी केले, ते कुटुंबातील कुणाला आवडले नाही, सुप्रिया सुळे गड राखतील”: युगेंद्र पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 08:34 PM2024-02-29T20:34:18+5:302024-02-29T20:37:27+5:30
Yugendra Pawar: आम्ही सगळे पुरोगामी विचारांचे लोक आहोत. त्यामुळेच आम्ही शरद पवार यांना साथ देणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.
Yugendra Pawar: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. प्रचार, बैठका, सभा यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यातच पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य राजकारणात सक्रीय होताना दिसत आहे. अजित पवार यांनी जे केले, ते कुटुंबातील कोणालाच आवडलेले नाही. आगामी लोकसभेत सुप्रिया सुळे बारामतीचा गड राखतील, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.
अलीकडेच युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच आता ते राजकारणात सक्रीय होताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार उमेदवार असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष बारामती मतदाससंघाकडे लागले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.
कुटुंबातील जवळपास सर्वच लोकांना हे आवडलेले नाही
युगेंद्र पवार म्हणाले की, कुठल्याही पक्षात, कुटुंबात फूट पडली तर लोकांना ते आवडत नाही. कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मलाही अजित पवार यांनी जे केले, ते आवडलेले नाही. असे काहीतरी होईल, असे कधाही वाटले नव्हते. कुटुंबातील जवळपास सर्वच लोकांना हे आवडलेले नाही, असे युगेंद्र पवार म्हणालेत. शरद पवारांनी माझ्या वडिलांना मुंबईत आणले. शरद पवार हे नेहमीच कुटुंबप्रमुख राहतील. त्यांच्याविषयीचा आमचा आदर कधीच कमी होणार नाही, असे युगेंद्र पवार यांनी नमूद केले.
सुप्रिया सुळे गड राखतील
तुतारी हे निवडणूक चिन्ह आता सगळीकडे पोहोचले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे या पराभूत होतील, असे वाटत नाही. सुप्रिया सुळे या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. सुप्रिया सुळे यांनी खूप कामे केलेली आहेत. सुनेत्रा काकी बारामतीतून उभ्या राहतील, असे वाटत नाही. बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार लढत होईल, असे वाटत नाही. एक नातू म्हणून शरद पवारांसोबत आहे. आम्ही सगळे पुरोगामी विचारांचे लोक आहोत. त्यामुळेच आम्ही शरद पवार यांना साथ देणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात फिरणे सुरू केले आहे. हवेलीला गेलो होतो. इंदापूर, खडकवासला, दौंड, मुळशी या ठिकाणी जाणार आहे. कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे की त्यांना भेटावे. लोकांना भेटायला आवडते. पूर्वीपासूनच सामाजिक कामे करत आलो आहे, असे युगेंद्र पवार म्हणाले.