'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 08:16 PM2024-10-24T20:16:21+5:302024-10-24T20:17:14+5:30
Yugendra Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाने बारामतीत अजित पवारांविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे.
Yugendra Pawar vs Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने(शरदचंद्र पवार) आज अखेर आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 45 उमेदवारांची नावे असून, यातील सर्वात महत्वाचे बारामतीमधील उमेदवाराचे आहे. बारामतीत पुन्हा पवार vs पवार सामना पाहायला मिळणार आहे. पक्षाने बारामतीत अजित पवारांविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. युगेंद्र यांच्या रुपाने पवार घराण्यातील पुढची पिढी राजकारणात उतरली आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युगेंद्र यांनी अजित पवारांवर नाव न घेता जोरदार टीका केली.
युगेंद्र पवारांच्या उमेदवारीमुळे आता बारामती काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युगेंद्र पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. एबीपी माझाशी संवाद साधताना युगेंद्र म्हणाले, "शरद पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मी या निर्णयाचे स्वीकार करतो. जेवढं मला करता येईल, शेवटपर्यंत पवार साहेबांचेच काम करेन. संधीचे सोनं करेल, पवार साहेबांना अभिमान वाटेल, असे काम करेन," अशी प्रतिक्रिया युगेंद्र यांनी दिली.
अजित पवारांवर निशाणा
यावेळी त्यांनी बारामती मतदारसंघातील कामांची माहिती देत अजित पवारांवर नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणतात, "तालुक्यात पाण्याचा प्रश्न आहे, 25 गावात प्यायला पाणी नाही. बेरोजगारीची मोठी समस्या आहे, शेतकऱ्यांचा पिकांना भाव नाही, शिक्षणावरही जोर दिला पाहिजे. तालुक्यात भ्रष्टाचार वाढलाय, स्थानिक नेते खूप भ्रष्टाचार करत आहेत, तो संपवायचा आहे. गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत, ते संपवायचे आहेत," अशी टीका त्यांनी यावेळी केली.
समोर तगडे आव्हान, पण...
"लोकसभा निवडणुकीदरम्यान जे झालं, ते व्हायला नको होतं. पण, एकदा बाण सुटला, तो मागे घेऊ शकत नाही. आमच्या समोर नक्कीच खूप मोठे आव्हान आहे. पण, आम्ही सगळे खूप कष्ट घेत आहोत, कार्यकर्तेही चांगले काम करत आहेत. त्यांनी लोकसभेला चांगले काम केले, आता विधानसभा आणि पुढील सर्व निवडणुकीत चांगले काम करुन पवार साहेबांचे विचार तालुक्यात आणि राज्यात पुढे नेतील," अशी प्रतिक्रियाही युगेंद्र यांनी यावेळी दिली.
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...