बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 09:59 AM2024-10-25T09:59:36+5:302024-10-25T10:01:51+5:30
...आता संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अथवा काका विरुद्ध पुतण्या, या लढतीकडे असणार आहे.
बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांची लढाई स्वतःचे डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल, तर अजितदादा यांची लढाई 2019 च्या मताधिक्याचा विक्रम मोडण्यासाठी असेल. असे म्हणत, राषट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शरद पवारगटाला डिवचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिण्यात आली आहे.
यासंदर्भात, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सुराज चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक व्हिडिओ शेअर करत भाष्य केले आहे. या व्हिडियोमध्ये चव्हाण यांनी म्हटले आहे की, "बारामती विधानसभा मतदार संघात युगेंद्र पवार यांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल आणि अजितदादा पवार यांची लढाई 2019च्या मताधिक्याचा रेकॉर्ड तोडण्यासाठी असेल. तुतारी गटाकडून जी यादी जाहीर करण्यात आली, त्यात 10 पेक्षा जास्त भाजपमधून आलेल्या निष्ठावान, स्वाभिमानी शिलेदारांना न्याय दिल्याबद्दल मी प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांचे हार्दिक अभिनंदन!"
बारामती विधानसभा मतदार संघात युगेंद्र पवार यांची लढाई स्वतःच डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल अजितदादा पवार यांची लढाई 2019 च्या मताधिक्याच रेकॉर्ड तोडण्यासाठी असेल..तुतारी वाल्यांनी 10 पेक्षा जास्त भाजपमधून आलेल्या निष्ठावान,स्वाभिमानी नेत्यांना उमेदवारी देऊन न्याय दिल्याबद्दल अभिनंदन! pic.twitter.com/e8xoum6K4n
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) October 24, 2024
काल प्रसिद्ध झाली शरद पवार गटाची पहिली यादीत -
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महत्वाचे म्हणजे, यात 11 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात बारामती विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांना उमेदवारी देत अजित पवार यांना आव्हान दिले आहे. युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू तर अजित पवार यांचे पुतणे आहेत.
काका विरुद्ध पुतण्या लढतीकडे असणार संपूर्ण राज्याचे लक्ष -
शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात थेट युगेंद्र पवार यांनाच मैदानात उतरवले आहे. यामुळे, आता संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अथवा काका विरुद्ध पुतण्या, या लढतीकडे असणार आहे.