कोल्हापूर: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमातील अपघात थोडक्यात टळला आहे. आदित्य ठाकरे शाळेच्या मैदानात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देत असताना कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप अचानक उडाला. आदित्य यांच्या कोल्हापुरातील कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. काही खांब कोसळल्यानं थोडा वेळ गोंधळदेखील उडाला. मात्र सुदैवानं मोठा अपघात टळला.कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थिंनीसाठी आयोजित करण्यात स्वसंरक्षण शिबिरात सहभाग घेतला होता. शिवशाहू महाविद्यालयातील या शिबिराला जवळपास 2 हजार विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या शिबिरासाठी महाविद्यालयाच्या आवारात मंडप उभारण्यात आला होता. आदित्य विद्यार्थिनींना व्यासपीठावरुन स्वसंरक्षणाचे धडे देत असताना अचानक वाऱ्याचा वेग वाढला. त्यामुळे काही खांब कोसळले आणि मंडप उडाला. यानंतर एकच गोंधळ उडाला आणि घबराट निर्माण झाली. मात्र थोड्याच वेळात परिस्थिती नियंत्रणात आली. खांब कोसळून मंडप उडाल्यानं विद्यार्थिनी घाबरल्या होत्या. मात्र आदित्य ठाकरेंनी मिश्किल भाष्य करत परिस्थिती हाताळली. 'मीच जादूनं हा मंडप वर नेला होती. मला तुम्हा सगळ्यांची रिअॅक्शन पाहायची होती', अशी मिश्किल टिप्पणी आदित्य यांनी केली. सुदैवानं या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. या कार्यक्रमानंतर आदित्य पुढील कार्यक्रमांसाठी निघाले. याआधी नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंच्या गाडीचा टायर फुटला होता. सुदैवानं त्यावेळी मोठा अपघात टळला होता.