Maharashtra Politics: शिवसेना आणि पक्ष चिन्हाबाबत शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनाला मोठा धक्का देत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मोठा दिलासा दिला. निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने पुढील कार्यवाही करण्यास होकार दिला आहे. यामुळे पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावर निवडणूक आयोग कार्यवाही करण्यास मोकळा झाला आहे. यानंतर जर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले, तर ठाकरेंचा शिवसैनिक रस्त्यावर उतरेल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, असा गंभीर इशारा युवासेनेकडून देण्यात आला आहे.
युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शरद कोळी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासूनच शिंदे गटावर सातत्याने सडकून टीका करताना पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे फक्त एकनाथ शिंदे असतील. निवडणूक आयोग शिंदे गटाला चिन्ह देईल असा गौप्यस्फोट केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर शरद कोळी आक्रमक झाले असून, असे झाल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरेल. दंगलही होऊ शकेल. राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा दिला आहे.
अब्दुल सत्तार म्हणजे उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग
अब्दुल सत्तार म्हणजे उतावळा नवरा , गुडघ्याला बाशिंग. शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण देण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर सोपवली आहे. निवडणूक आयोग जर पक्षपाती करत निर्णय दिला किंवा शिंदे गट आणि निवडणूक आयोग यांनी जर ‘५० खोके एकदम ओके’ कार्यक्रम केला, तर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, अशा इशारा देत, संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंचा आहे, असे ठणकावून सांगितले आहे.
दरम्यान, अलीकडेच तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानावरूनही शरद कोळी यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगणाऱ्यांना ठेचून काढू. शिंदे गटातील मंत्र्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तोंड सांभाळून बोलावे. सत्ता कायमची नसते, सत्ता येते आणि जाते. पण उद्धव ठाकरेंबाबत एकही अपशब्द काढू नये. छत्रपती शिवाजी महाराज कधीच दिल्ली समोर झुकले नाहीत. शिवाजी महाराजांना मुघलांकडून अनेकदा बोलावणे आले होते. पण शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी त्यांनी कधीच दिल्ली समोर झुकले नाहीत. उद्धव ठाकरे देखील झुकणार नाही, असे शरद कोळी यांनी म्हटले होते.