Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. शिंदे गटाला राज्यभरातून वाढत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच शिवसेनेच्या कठीण काळात साथ देणाऱ्या युवासेनेतील एका नेत्याने शिंदे गटाला पुन्हा सुनावले आहे. शिवसैनिकांनी खूप सहन केले. मात्र, आता नाही. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहतोय, असा स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला आहे.
दसरा मेळावा शिवाजी पार्कवर साजरा करण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. सालाबादप्रमाणे यंदाही दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतीर्थावरच होणार, असा विश्वास युवा सेनेचे राज्य विस्तार प्रमुख शरद कोळी (Sharad Koli) यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कसल्याही परवानगीची गरज नसल्याचा दावाही शरद कोळी यांनी यावेळी बोलताना केला.
शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांची थोबाडे फोडू
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांची थोबाडे फोडू, अशी आक्रमक भूमिका शरद कोळी यांनी घेतली. शिवसैनिकांनी आजतागायत खूप सहन केले. पण, आता सहन करणार नाही. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहत आहोत, असा इशारा शरद कोळी यांनी विरोधकांना दिला आहे. राज्यातील युवा सैनिकांनी व शिवसैनिकांनी मुंबईला हजर व्हायचे आहे, असे आवाहनही शरद कोळी यांनी केले आहे.
राज्यातील तरूणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे
वेदांता-फॉक्सकॉनचा महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू होणार होता. पण ती कंपनी आता गुजरातमध्ये गेली आहे. यावर, एकनाथ शिंदे व विद्यमान राज्य सरकारवर जहरी टीका करताना, दळभद्री सरकारमुळे ही कंपनी महाराष्ट्र राज्यातून गेली. राज्यातील तरूणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे, असा घणाघातही शरद कोळी यांनी केला.
दरम्यान, टीका करणारे यापूर्वी अनेकदा मातोश्रीवर जाऊन नाक घासत आमदारकीची भीक मागत होते. आता ते टीका करतात, त्यांची लायकी आहे का? असा सवाल शरद कोळींनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना केला आहे.