मुंबई – मागील अनेक दिवसांपासून देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडलं आहे. महागाईविरोधात निषेध करण्यासाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलनं करत आहेत. त्यात सत्ताधारी शिवसेनेच्या युवासेनेने महागाईविरुद्ध एल्गार पुकारला आहे.
उद्या म्हणजे ३ एप्रिलला युवासेनेचे कार्यकर्ते महागाईचा निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरत अनोखा आनंदसोहळा साजरा करणार आहेत. याबाबत युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई म्हणाले की, २०१४ आणि २०१९ मध्ये अबकी बार मोदी सरकार अशा घोषणा देत, महागाई कमी करू असं आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली. परंतु आज पेट्रोल-डिझेलनं शंभरी ओलांडली. गॅसचे दर वाढले. अत्यावश्यक वस्तूंचे दर वाढत चालले आहेत. कोरोनाच्या काळात युवकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात बेरोजगारीने नवा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनता विचारत आहे असं ते म्हणाले.
तसेच याच अच्छे दिनासाठी भाजपाचं अभिनंदन करण्यासाठी युवासेनेच्या वतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात ३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता थाली बजाओ निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. ज्या प्रमाणे २ वर्षापूर्वी भाजपाने थाळ्या वाजवून कोरोनाला पळवून लावलं होतं. तशाच रितीने थाळी वाजवून भाजपा महागाईला पळवून लावेल ही अपेक्षा आहे. त्यामुळे या थाळी बजाओ आंदोलनात सर्व कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा असं आवाहन युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी केले आहे.