बफर झोन : वन्यप्रेमींसाठी नववर्षातील दु:खद घटनाभद्रावती : नर आणि मादा वाघांच्या झुंजीत वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना भद्रावती तालुक्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत मुधोली काटवल बफर झोन क्षेत्रात नवीन वर्षाच्या पर्वावर उघडकीस आली. मृत वाघीण अंदाजे चार वर्ष वयाची असून उंची ८७ सेमी तर लांबी १७० सेंटीमीटर आहे. मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील वनमजूर गुरुवारी पहाटे ५ वाजता गस्तीवर असताना त्यांना पट्टेदार वाघीण मृत अवस्थेत आढळली. याच परिसरात १०० मीटर अंतरावरील तलावात रानडुक्करदेखील मृत अवस्थेत आढळले. या डुकराच्या अंगावर जखमा होत्या. हल्लेखोर वाघ मृत वाघिणीशी प्रणयक्रीडेसाठी उत्सुक होता. परंतु त्याला वाघिणीने प्रतिसाद न दिल्याने चिडलेल्या वाघाने अखेर हल्ला करून वाघिणीला ठार मारले असावे, असा अंदाज मोहुर्लीेचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुलकर यांनी वर्तविला आहे. या झुंजीतील नर वाघाचा आम्ही शोध घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मृत वाघिणीची उत्तरीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे यांनी केली. त्यानंतर मृत वाघिणीवर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व इक्रो प्रो संघटनेचे बंडू धोतरे, सामाजिक कार्यकर्ते माधव जीवतोडे, शंकर भरडे यांनी घटनास्थळी भेट दिली. (प्रतिनिधी)
वाघासोबतच्या झुंजीत वाघीण ठार
By admin | Published: January 02, 2015 12:47 AM