मुंबई: जबाबासाठी प्रत्यक्ष हजर राहिलो तर अटक होण्याची भीती असल्याने, आपल्याला जे काही विचारायचे आहे, त्याची लेखी प्रश्नावली पाठवावी, असे वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झकिर नाईक याने अंमलबजावणी संचालनायास (ईडी) कळविले आहे. ‘इस्लामिक रीसर्च फाउंडेशन’चा संस्थापक असलेल्या नाईकला ‘ईडी’ने ‘मनी लॉड्रिंग’च्या एका प्रकरणात जाबजबाबांसाठी समन्स पाठविले होते. वकील महेश मुळे यांच्यामार्फत पाठविलेल्या ताज्या पत्रात नाईक म्हणतो की, ‘मी आलो, तर मलाही अटक होईल, ही माझी भीती आमिर गझधरच्या अटकेने साधार ठरली आहे. त्यामुळे तुम्ही लेखी प्रश्नावली पाठविली, तर मी त्याला उत्तरे देईन.’या आधी नाईकने वकिलामार्फत पाठविलेल्या पत्रात ‘स्काइप’सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाने जबानी देण्याची तयारी दर्शविली होती. ‘मी ‘एनआरआय’ आहे, हे माहीत असूनही मी समन्स काढूनही येत नाही व तपासात सहकार्य करीत नाही,’ असे ‘ईडी’ने न्यायालयास सांगितल्याबद्दल नाईक याने पत्रात नाराजीही नोंदविली आहे. (प्रतिनिधी)
झकिर नाईकला आता हवी लेखी प्रश्नावली
By admin | Published: February 27, 2017 5:29 AM