मुंबई : इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा प्रमुख झकीर नाईक याचे इंडियन मुजाहिदीन या भारतातील व जमातुद्दवा या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा अहवाल मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दिला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे लवकरच पाठविला जाईल. केंद्र आणि राज्य मिळून या प्रकरणी पाठपुरावा करतील. तसेच, या अहवालातील प्रत्येक मुद्द्याची छाननी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. सध्या सौदी अरेबियात असलेल्या झकीर नाईकचे देशद्रोही शक्तींशी असलेल्या संबंधांवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी फिरोज देशमुखशी त्याचे राहिलेले संबंध, हैदराबादमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांशी त्याचे राहिलेले संबंध याची पुराव्यांनिशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. इसिसमध्ये भरती करण्यासाठी गेलेल्या चार युवकांपैकी परत आलेल्या एका युवकानेदेखील त्याचे झकीर व त्याच्या संस्थेशी संबंध आल्याचे उघड केले आहे. (विशेष प्रतिनिधी)झकीर आणि त्याच्या संस्थेच्या माध्यमातून हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, ज्यू धर्माविषयी द्वेष पसरविण्याचे काम केले जात होते याचेही ठोस पुरावे समोर आले आहेत. देशविघातक कारवायांमध्ये सामील होण्यासाठी झकीरकडून अनेकांना उत्तेजन मिळाले. हा संपूर्ण विषय अतिशय संवेदनशील आणि गंभीर आहे. त्याचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
झकीर नाईक यांचे मुजाहिदीनशी संबंध
By admin | Published: August 10, 2016 4:53 AM