मुंबई : दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांकडील सोने, चांदी, हिऱ्यांसह रोकड लुटणाऱ्या टोळीच्या मास्टरमार्इंडला अटक करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. अरपुत नाडार (३४) असे या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या जबरी चोरी, दरोडाविरोधी पथकाने ही कामगिरी केली. नाडारविरुद्ध मुंबईसह, गुजरात, हैदराबादमध्ये तब्बल १७हून अधिक गुन्हे दाखल आहेत.मूळचा तामिळनाडूचा रहिवासी असलेला नाडार १९९३मध्ये मुंबईत आला. धारावी परिसरात भाड्याने खोली घेऊन तो राहत होता. तेथेच स्थानिक गुंडांच्या संपर्कात आलेल्या नाडारला चोऱ्या करून पैसा कमाविण्याची चटक लागली. त्यातूनच १९९९पासून त्याच्या चोऱ्यांचे रूपांतर दरोड्यापर्यंत झाले. जास्तीचा पैसा कमाविण्यासाठी त्याने मुंबईसह, गुजरात, हैदराबाद येथील बड्या व्यापाऱ्यांना लक्ष्य केले. मोक्याच्या ठिकाणांवरून तो व्यापाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायचा. महिनाभर अशी पाळत ठेवून संधी मिळताच अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्यास सुरुवात केली. त्याने ज्वेलर्स शॉप, फायनान्स कंपन्यांमध्येही दरोडे घातले असून, पोलिसांकडे त्याच्याविरुद्ध तब्बल १७ गुन्ह्यांची नोंद आहे. त्याशिवाय मुलुंड, पंतनगर, आझाद मैदान, कांदिवली पोलीस ठाण्यात पाच गुन्ह्यांतही त्याचा सहभाग असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.६ आॅगस्ट रोजी नवी मुंबईतील पॉप्युलर फायनान्स कंपनीमध्ये दुपारच्या सुमारास नाडारने सहकाऱ्यांच्या मदतीने दरोडा घातला होता. त्या वेळी २० किलो वजनाच्या दागिन्यांसह ९ लाख ५० हजारांची रोकड घेऊन या टोळीने पळ काढला. तब्बल ६ कोटी ९ लाख ५० हजारांवर या टोळीने डल्ला मारला होता. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेचा नवी मुंबईसह मुंबई गुन्हे शाखाही समांतर तपास करत होती. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या टोळीचा सूत्रधार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 2:12 AM