लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सोमवार, १६ मे रोजी मुंबईकरांना आणि मंगळवार, १७ मे रोजी ठाणे-डोंबिवलीकरांना दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. वर्षातील दोन दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्या दिवशी भर दुपारी सूर्य आकाशात बरोबर आपल्या डोक्यावर आणि आपली सावली नेमकी आपल्या पायाशी आल्यामुळे ती दिसू शकत नाही. त्यामुळे या ठरावीक दिवशीच शून्य सावलीचा अनुभव घेता येतो, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
वर्षातील दोन दिवस हे शून्य सावलीचे दिवस असतात. मे महिन्यात आकाश निरभ्र असल्याने शून्य सावली अनुभवता येते; पण दुसरा दिवस २८ जुलै हा पावसाळ्यात येत असल्याने शून्य सावलीचा अनुभव घेता येत नाही. सूर्याची क्रांती ज्या दिवशी उत्तर १९ अंश होईल, त्या दिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर दिसेल. वर्षातून दोनवेळा सूर्य डोक्यावर दिसतो. त्यामुळे या दिवशी मध्यान्हाला सूर्य डोक्यावर आल्यावर आपली सावली बरोबर पायाखाली आल्यामुळे दिसू शकत नाही. म्हणून या दिवसांना शून्य सावलीचा दिवस म्हणतात, असे सोमण यांनी सांगितले. या दिवसाचा नागरिकांनी आनंद लुटावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
अशी अनुभवा शून्य सावली शून्य सावलीच्या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायला सुरुवात करावी. पुठ्याचे एक जाड नळकांडे तयार करून उन्हात ठेवावे, किंवा एक जाड काठी उन्हात उभी करून ठेवावी. तिच्या सावलीचे निरीक्षण करावे. काठीच्या सावलीची लांबी कमी कमी होत जाईल. ठीक १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य आकाशात डोक्यावर आला, म्हणजे सावली काठीच्या मुळाशी आल्यामुळे अदृश्य होईल. नंतर पुन्हा काठीची सावली लांब लांब होत जाईल. मुलांच्या एका गटाने उन्हात गोलाकार उभे राहून एकमेकांचे हात धरून कडे करावे. नंतर सावलीचे निरीक्षण करावे. आकाशात सूर्य डोक्यावर आल्यानंतर सुंदर दृश्य दिसेल. याचा उंचावरून फोटो घेता येईल. शून्य सावलीचे निरीक्षण करण्याची संधी आपणास महाराष्ट्रात मिळू शकते, असे सोमण म्हणाले.
महाराष्ट्रातील दिवस (१) रत्नागिरी ११ मे (२) सातारा, सोलापूर १२ मे (३) उस्मानाबाद १३ मे (४) रायगड, पुणे, लातूर १४ मे, (५) अंबेजोगाई, केज १५ मे (६) मुंबई, नगर, परभणी, नांदेड १६ मे (७) ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याण, पैठण १७ मे (८) संभाजीनगर, जालना, हिंगोली, चंद्रपूर १९ मे (९) नाशिक, वाशिम, गडचिरोली २० मे (१०) बुलडाणा, यवतमाळ २१ मे (११) वर्धा २२ मे (१२) धुळे, अकोला, अमरावती २३ मे (१३) भुसावळ , जळगाव, नागपूर २४ मे (१४) नंदुरबार २५ मे