परभणी : जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या परिचर आणि विस्तार अधिकारी या पदांसाठीच्या परीक्षेचे पेपर फुटल्याचा प्रकार रविवारी शहरातील अनेक केंद्रांवर निदर्शनास आला़ त्यानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाबद्दल रोष व्यक्त करीत परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन केले़ अखेर ही परीक्षा रद्द झाल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने जाहीर केले़परभणी जिल्हा परिषदेतील परिचर या वर्ग ४ श्रेणीतील पदाच्या १९ जागांसाठी आणि विस्तार अधिकारी पदाच्या एका जागेसाठी २९ नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली़ शहरातील ४७ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली़ परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात सीलबंद नसलेल्या प्रश्नपत्रिकांचे लिफाफे उघडून पेपर देण्यात आले़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी पेपर फुटल्याचा आरोप करून परीक्षा देण्यास नकार दिला़ हा प्रकार अनेक परीक्षा केंद्रांवर निदर्शनास आला. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत सर्वच केंद्रावरील विद्यार्थ्यांनी परीक्षा थांबविली़ दोन-तीन हजार परीक्षार्थ्यांचा जमाव शहरात ठिकठिकाणी फिरून रास्ता रोको करीत होता़या परिक्षेसाठी विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थी दाखल झाले होते़ या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली़ जिल्हा परिषदेसमोर रास्ता रोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला़ त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चा नेण्यात आला़ अखेर खा़ बंडू जाधव यांनी विद्यार्थ्यांना सामोरे जाऊन परीक्षा रद्द केली जाईल, दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी शांत झाले़पेपर फुटला नाही. मंत्र्यांच्या दौऱ्याची गडबड असल्याने काही प्रश्नपत्रिकांच्या पॉकिटांना सीलबंद करण्याचे राहून गेले़ परीक्षार्थींनी हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर ही परीक्षा रद्द केली आहे़- सुभाष डुमरे, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी.
जिल्हा परिषद परीक्षेचा पेपर फुटला
By admin | Published: November 30, 2015 3:00 AM