मुंबई - भारतीय जनता पक्षातील दिग्गज नेत्यांना राज्यातील सत्ता गेल्यानंतर आपापल्या जिल्ह्यातही धक्के बसले. माजीमंत्री पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातूनही नागपूर जिल्हा परिषद गेली आहे. काँग्रेसने शानदार विजय मिळवत नागपूर जिल्हा परिषदेवर विजयी पताका फडकविला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी नागपूरचेच आहेत. त्यामुळे ही जिल्हा परिषद निवडणूक भाजप सहज जिंकेल असं चित्र होतं. मात्र याउलट चित्र येथे पाहायला मिळाले. काँग्रेसने मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात आणि महाविकास आघाडीच्या साथीत जिल्हा परिषद आपल्याकडे राखली आहे. फडणवीसांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील कोल्हापूर जिल्हा परिषद गमवावी लागली. त्यानंतर केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांना जालना आणि पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा परिषद आपल्याकडे राखता आली नाही. जालन्यात पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली.