वाशीम : गेल्या काही वर्षांमध्ये खासगी शाळांमध्ये झालेली वाढ आणि सरकारी शाळांची अवस्था, यामुळे सरकारी शाळेत (ZP School) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे. यातच कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांना बंद करण्याची चर्चाही अनेकदा होत असते. काही शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या कमी असल्यामुळे शिक्षक येत नाहीत. पण, वाशिम जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेने इतर शाळांसमोर आदर्श ठेवला आहे.
अनेक ठिकाणी विद्यार्थीसंख्या नसल्यामुळे सरकारी खेड्या गावातील सरकारी शाळांची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळते. पण,वाशिम जिल्ह्यात अशी एक शाळा आहे, जिथे फक्त एकच विद्यार्थी शिकतो आणि त्या विद्यार्थ्यासाठी दररोज शाळा भरते. विशेष म्हणजे, त्याला इतर शाळेप्रमाणे सर्व सुविधाही मिळतात. एएनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील गणेशपुर गावात ही अनोखी शाळा आहे. या गावतील लोकसंख्या फक्त 150 असून इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एकच विद्यार्थी शिकतो.
गेल्या दोन वर्षांपासून या शाळेत फक्त त्या एका विद्यार्थ्याचे अॅडमिशन असूनही त्याच्यासाठी ही शाळा दररोज भरते. विशेष म्हणजे, या शाळेत एकच शिक्षक आहेत. या शिक्षकाचे नाव किशोर मानकर असून ते दररोज या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी शाळेत येतात आणि सर्व विषय शिकवतात. या विद्यार्थ्याला सरकारच्या सर्व सुविधा मिळतात ज्यामध्ये मध्यान्ह भोजनाचाही समावेश आहे. सकाळी 10.30 ते 12 वाजेपर्यंत भरते आणि या शाळेत राष्ट्रगीतही गायलं जातं. या शाळेने इतर शाळांसमोर एक आदर्श मांडला आहे.