सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर दुष्काळ व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी झाडे लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक शिक्षकाने शाळा परिसरात दोन झाडे लावून जगविली पाहिजेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाने दुष्काळ, पाणीटंचाई व इतर नैसर्गिक आपत्तींवर मात करण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने सन २0१७ पासून तीन वर्षांत ५0 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. असे असताना चालू वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळामुळे गेल्यावर्षी लावलेली झाडे उन्हाच्या कडाक्याने व पाणी टंचाईमुळे जगणे मुश्कील झाले आहे. यातील अनेक रोपे जळून गेली आहेत. चालू वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपाययोजना काय केल्या, याबाबत वनविभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यासाठी २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली व प्रत्येक विभागाला वृक्ष लागवड व त्यांच्या जोपासनेबाबत काळजी घेण्याबाबत सूचित केले आहे. या निर्णयामुळे वृक्षसंवर्धनाची मोहिम अधिक गतीमान होणार आहे़
३९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला २३ तर माध्यमिक विभागाला १६ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाला दोन झाडे लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार संंबंधित शाळेच्या प्रत्येक शिक्षकाने झाड कोठे लावणार याची माहिती दोन दिवसांत शिक्षण विभागाला कळवायची आहे. तसेच शिक्षकांनी शासनाच्या माय प्लान्ट हे अॅप्लिकेशन मोबाईलवर डाऊनलोड करून आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांना सदस्य करून घ्यायचे आहे. दिलेल्या जबाबदारीप्रमाणे शिक्षकांनी ही माहिती भरून शिक्षण विभागाच्या बैठकीला सादर करावयाची आहे, असे परिपत्रक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढले़
जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झेडपीच्या प्रत्येक शिक्षकाला दोन झाडे लावण्याची जबाबदारी दिली आहे. झाड कोठे लावणार याची त्यांच्याकडून माहिती भरून घेण्याचे काम सुरू आहे. - संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी