मुंबई : जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी आता एकाऐवजी चार जिल्ह्यांचा पर्याय देता येणार आहे. ग्रामविकास विभागाने बुधवारी आंतरजिल्हा बदल्यांचे तसेच जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे धोरण जाहीर केले. सर्व बदल्या ऑनलाइनच होणार आहेत.याआधी आंतरजिल्हा बदली एकच पर्याय देता येत होता. आता चार जिल्ह्यांचे पर्याय देता येतील. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या पती-पत्नीस आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करायचा असेल तर दोघांपैकी एका जिल्ह्याचा पर्याय निवडता येईल. दोघे वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत आणि त्यांना तिसऱ्याच जिल्ह्यात बदली हवी असेल तर दोघांपैकी जो कनिष्ठ असेल त्याची सेवाज्येष्ठता गृहीत धरण्यात येणार आहे.आंतरजिल्हा बदलीसाठी सध्या कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) लागेल, ही पूर्वीची अट कायम ठेवण्यात आली आहे. एनओसी असलेल्यांना बदल्यांबाबत प्राधान्य असेल. त्यानंतर संवर्ग एकमधील कर्मचाऱ्यांना प्राधान्य राहील. ज्या प्रवर्गातून कर्मचाऱ्याची निवड झाली आहे त्याच प्रवर्गातील रिक्त पदावर दुसऱ्या जिल्ह्यात बदली केली जाईल. पती-पत्नी एकत्रिकरणाबाबतचा प्राधान्यक्रमही या धोरणात निश्चित करण्यात आला आहे. दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर बदलीत प्रथम प्राधान्य असेल. यापूर्वी शिक्षकांना स्वत:च बदलीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागत असे. आता त्यांना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि ते अर्ज ऑनलाइन टाकतील.जिल्हांतर्गत बदल्यांबाबत अवघड क्षेत्र कोणते यासाठीचे सात निकष ठरविण्यात आले असून, त्यातील तीनची पूर्तता करणारे क्षेत्र हे अवघड मानले जाईल. दरवर्षी ३१ मेपर्यंतच बदल्या करण्यात येतील. जिल्हांतर्गत बदल्यांसाठीही संवर्ग निश्चित करण्यात आले आहेत. शिक्षक सहकार संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी या धोरणांचे स्वागत केले आहे.जिल्हांतर्गत बदलीसाठी...जिल्हांतर्गत बदलीसाठी यापूर्वी २० शाळांचा पर्याय देता येत होता. आता ३० शाळांचा पर्याय देता येईल. ज्या शिक्षकांची सेवा अवघड क्षेत्रात तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल ते बदलीपात्र असतील. सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा आणि एका शाळेवर पाच वर्षे सेवा केलेले शिक्षक बदलीपात्र मानले जातील.
जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी आता मिळणार चार पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 2:37 AM