मुंबई - लोकसभा निवडणुकीला पुत्र सुजय विखे आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये सामील झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांना अहमदनगर जिल्ह्यात धक्के बसण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून नगर जिल्ह्यावर असलेले विखे कुटुंबाचे वर्चस्व आता सैल पडण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपला नगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 जागा जिंकून देईल अशी प्रतिज्ञा विखे पाटील यांनी केली होती. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीने शानदार पुनरागमन करताना नगर जिल्ह्यात 9-3 अशा जागा जिंकल्या. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व वाढले आहे.
नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे आहेत. मात्र पती आणि मुलगा भाजपमध्ये गेल्यामुळे शालिनीताई अध्यक्षपदावर राहतील याची शक्यता नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदी थोरात कोणाची वर्णी लावणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातच रोहित पवार यांची नगर जिल्ह्यात एंट्री झाली आहे. नगरमध्ये राष्ट्रवादीचे 19 सदस्य आहेत. राष्ट्रवादीच्या रोहित पवारांना देखील महत्त्व मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात थोरात-पवार यांचाच शब्द नगरमध्ये चालणार अशी शक्यता आहे.
नगर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 73 असून डॉ. किरण लहामटे आमदार झाले असून सदस्य संख्या 72वर आली आहे. यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक 23, राष्ट्रवादीचे 19, भाजप 13, शिवसेना 7, क्रांतीकारी शेतकरी पक्ष 5 आणि इतर पाच सदस्य आहेत. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यास, अध्यक्ष काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा होऊ शकतो.