लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत २०१७-१८ चा १६८ कोटी ७० लाख रुपयांचा अर्थसंकल्प अवलोकनार्थ ठेवण्यात आला होता. या अर्थसंकल्पात ४२ विषय मांडण्यात आले होते. त्यांपैकी महिला व बाल कल्याण समितीचे विषय वगळता अन्य सर्व विषयांमध्ये किरकोळ दुरुस्त्या सुचवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला. यामध्ये मुख्यत: शालेय पोषण आहाराबाबत मिळत असलेल्या सुविधाबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, अतिरिक्त मुख्य कायकारी अधिकारी यशवंत शितोळे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, महिला व बाल कल्याण सभापती राणी शेळके, कृषी सभापती सुजाता पवार आणि समाजकल्याण सभापती सुरेखा चौरे तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी घुले उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची ही दुसरी सर्वसाधारण सभा होती सदस्य निवडून येऊन तब्बल चार महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर त्यांना अर्थसंकल्प कसा असतो, हे पहिल्यांदा अनुभवायला मिळाले. अनेक तरुण पुरुष तसेच महिला सदस्य हिरिरीने आपल्या सूचना मांडत होत्या. या सर्वसाधारण सभेत सर्वांत जास्त जिल्हा आरोग्य विभागाच्या १२ विषयांना मंजुरी मिळाली, तर महिला व बाल कल्याण समितीच्या शालेय पोषण आहार आणि इतर दोन विषयांना मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे काही काळ तणाव होता. >सभेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीच दांडीजिल्हा परिषदेच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई हे गैरहजर राहिले होते. त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने महत्त्वाचे विषयांवर कशी चर्चा करायची, असा सवाल उपस्थित करीत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, विरोधी पक्षाचे सदस्य आणि इतर सदस्यांनी नाराजी व्यक्त करत अध्यक्षांकडे खुलासा मागितला. कर्जमाफीच्या श्रेयासाठी रंगला कलगीतुरासर्वसाधारण सभेच्या सुरूवातीला राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांची ३४ हजार कोटींची केलेली कर्जमाफी यावरून श्रेय घेण्यासाठी विशेषत: सर्वच पक्षांमध्ये चढाओढ लागली होती. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती अजून काहीच लागले नाही; मात्र श्रेय घेणे आणि अभिनंदन ठराव मांडण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे चित्र या सभेने अनुभवले.जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांचा गौरवराज्य शासनाने नुकताच पुणे जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषिनिष्ठ शेतकरी सन्मानाने गौरव केला. या शेतकऱ्यांचा या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये जुन्नर तालुक्यातील बाळासाहेब काकडे, दिगंबर घुटे, वैशाली राजेंद्र पवार, तर आंबेगाव तालुक्यातील अंजलीताई अशोक घुले आणि भोर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जिल्हा परिषदेचा १६८ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
By admin | Published: July 13, 2017 1:13 AM