पंकज रोडेकर, ठाणेकल्याण-डोंबिवलीतील त्या २७ गावांचा समावेश कल्याण-डोंबिवली महापालिकेत करण्याचा निर्णय राज्य शासनाने अधिसूचना काढल्याने ठाणे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीबाबत पेच निर्माण झाला आहे. या समावेशामुळे जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांची संख्या कमी होणार असल्याने पुनर्रचना करून नवीन गट आणि गण निश्चित करावे लागतील. त्यामुळे जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक नाहीतर सार्वत्रिक निवडणूक घ्यावी लागणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान ही निवडणूक घेतली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.ठाणे व पालघर दोन जिल्हे स्वतंत्र झाल्यानंतर जानेवारी महिन्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी तर ११० गणांसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या वेळी ठाणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने निवडणूक रिंगणात उतरलेल्या जवळपास सर्वच उमेदवारांनी माघार घेतली होती. मात्र, मुरबाडमधील ५ पं. समिती गण व १ जि.प. गट अशा ६ जागा बिनविरोध आल्या. उर्वरित ३ पं.स. गण व २ जि.प. गटांसाठी झालेल्या निवडणुकीत पाचही ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, कोरम नसल्याने जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकीय हाती आहे. याचदरम्यान, जिल्हा परिषदेचे आठ गण आणि आठ गट सोडून अन्य ठिकाणी पोटनिवडणूक घेण्याची तयारी ठाणे जिल्हा प्रशासनाने सुरू केली होती. त्यातच निवडणूक आयोगाने पूर्वतयारी आढावा घेतल्यावर ही पोटनिवडणूक जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली गेली होती. याचदरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांबाबत शासनाने नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे संख्याबळ कमी झाले. आता पोटनिवडणुकीऐवजी सार्वत्रिक निवडणुक ीसाठी परिषदेची पुनर्रचना करून गण आणि गट निश्चित करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. यामुळे आता जिल्हा परिषदेचे किती गण आणि गट असतील, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेची लवकरच सार्वत्रिक निवडणूक
By admin | Published: May 18, 2015 4:10 AM