हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे शाळेला दांड्या मारण्याचे वाढलेले प्रमाण तसेच शाळेत उशिराने येणे आणि शाळेतून वेळेआधी निघून जाणे, असे प्रकार जिल्हा परिषद शाळेत सरसकट घडत आहेत. या प्रकाराला लगाम लागावा म्हणून हा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. जव्हार तालुक्यातील कोरतड ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे दांडी बहाद्दर शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. विद्यार्थांना वेळेत व व्यविस्थत शिक्षण मिळावे, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबावी, या दृष्टीने ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठरावा द्वारे निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरतड ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तालुक्यातील कोरतड ग्रामपंचायत हद्दीतील सावरपाडा, कातकरीपाडा, मोठामेढा, लहानमेढा, डुंगाणी, हांडीपाडा, व ग्रामपंचायत कार्यालय या ग्रामपंचायतीत हद्दीतील सात जिल्हा परिषद शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अशिक्षित आदिवास पालक तक्रार करीत नसल्याने या शिक्षकांचे चांगले फावले असल्याची माहिती वरिष्ठ स्तरावर गेल्याने प्रशासनाने ही उपाय योजना केली आहे.आदिवासींसाठी असणाऱ्या पेसा कायद्याच्या ५ टक्के रक्कम निधीतून खर्च करून प्रत्येक जि.प. शाळेत सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. कोरतड ही ग्रामपंचायत अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणारी एकमेव ठरल्याने तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. सरपंच विद्याश्री गोविंद, उपसरपंच संदीप माळी, सदस्य मनोज विशे, परशुराम खुरकुटे, येदु पवार, निर्मला पाडवी यांनी या ठरावा विषयी समाधान व्यक्त केले.
जि.प. शिक्षकांवर सीसीटीव्हीची नजर
By admin | Published: July 15, 2017 3:01 AM