मुंबई : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या भूमिकेमुळे वादात सापडलेला ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अडथळ दूर झाला. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर काही अटींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या चित्रपटाच्या विरोधाची तलवार म्यान केली.मुख्यमंत्री, राज ठाकरे, दिग्दर्शक करण जोहर व प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश भट यांच्या बैठकीत तोडगा निघाला. या पुढे पाक कलाकार वा गायक हिंदी चित्रपटांत नसतील, ही अट निर्मात्यांनी मान्य केल्याची माहिती राज यांनी दिली. चित्रपटाच्या सुरुवातीला ऊरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली जाईल. राज यांच्यासोबत मनसेचे अमेय खोपकर आणि शालिनी ठाकरे उपस्थित होत्या. (विशेष प्रतिनिधी)देशभक्तीचाच निर्णय - मुख्यमंत्री चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत दोन्ही बाजूंशी चर्चा करून आणि देशभक्तीचा विचार समोर ठेवूनच निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, ‘ऐ दिल है मुश्कील’चे निर्माते केंद्र सरकारच्या सैनिक कल्याण निधीत योगदान देतील. त्यांचे देशप्रेम व देशासाठी काही देण्याची किती तयारी आहे, यावर ही रक्कम तेच ठरवतील. ते अधिकाधिक योगदान देतील, असा विश्वास आहे. चित्रपट सुरू होण्याआधी शहीद जवानांना पडद्यावर श्रद्धांजली वाहिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.‘सिंगल स्क्रीन’ मालकांचा विरोध मात्र कायम !हा चित्रपट प्रदर्शित करण्यास सिंगल स्क्रीन सिनेमागृहांच्या मालकाच्या सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनने विरोध कायम ठेवला आहे. पाच कोटी देणारचित्रपटाला नफा वा तोटा झाला, तरी निर्माते सैनिक कल्याण निधीमध्ये पाच कोटी रुपये देतील, असे राज म्हणाले. पाक कलाकार असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी असेच प्रत्येकी पाच कोटी रुपये सैनिक कल्याण निधीला द्यावेत, असेही ते म्हणाले. गुंडगिरीसमोर मुख्यमंत्री झुकले : कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी असंवैधानिक व धक्कादायक भूमिका घेतली, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली. निर्मात्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून, तयार केलेल्या सिनेमाचे प्रदर्शन रोखण्याची धमकी देणे बेकायदेशीर आहे. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घ्यायचा आहे, परंतु या राजकीय गुंडगिरीसमोर मुख्यमंत्री स्वत:च झुकले नाहीत, तर राज्यालाही झुकायला त्यांनी भाग पाडले, असे ते म्हणालेचित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी सैन्य कल्याणनिधीत प्रत्येकी पाच कोटी रुपये जमा करण्यावर सेटलमेंट करून, राज ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक प्रकारे शहीद जवानांचा अपमान केला आहे. महाराष्ट्रातील मनसेच्या इंजिनाला, भाजपाकडून इंधन पुरवले जाते हे आता उघड आहे. - नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
जोहरची ‘मुश्कील’ दूर
By admin | Published: October 23, 2016 4:38 AM