मुंबई : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांतील ८४; तर त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी सुमारे ६३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्व ठिकाणी उद्या, बुधवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांतील मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित जागांसाठी मंगळवारी मतदान झाले.
प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी अशी : धुळे- ६०, नंदुरबार- ६५, अकोला- ६३, वाशीम- ६५, नागपूर- ६० आणि पालघर- ६५. नागपूर जिल्ह्यातील डिगडोह-इसासनी सर्कलमध्ये यादीतील घोळामुळे हजारो मतदार मतदानापासून वंचित राहिले. या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रामटेक तालुक्यातील पटगोवरी मतदान केंद्रावर झालेल्या मारहाणीमुळे तासभर मतदान बंद राहिले.
धुळ्यात २४ जणांविरुद्ध गुन्हाजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारास मदत करण्यासाठी १० हजार रुपयांचे आमिष दाखवत मदत करण्याच्या कारणावरुन सोमवारी सायंकाळी धुळे तालुक्यातील अजंग येथे एकाला लाठ्या-काठ्यांसह हाताबुक्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी २४ जणांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या किशोर अहिरे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात केले. उपचारानंतर त्यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली.