ZP Election Results Update: पोटनिवडणुकीत काँग्रेसचा बोलबाला, पंचायत समितीत जिंकल्या सर्वाधिक जागा, महाविकास आघाडीतील वजन वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 05:36 PM2021-10-06T17:36:35+5:302021-10-06T17:37:37+5:30
Congress, ZP Election Results Update: आज लागलेल्या राज्यातील सहा जिल्हा परिषदांमधील ८५ जागा आणि पंचायत समित्यांच्या १४४ जागांच्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसचा बोलबाला दिसून आला.
मुंबई - आज लागलेल्या राज्यातील सहा जिल्हा परिषदांमधील ८५ जागा आणि पंचायत समित्यांच्या १४४ जागांच्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसचा बोलबाला दिसून आला. (ZP Election Results Update) पंचायत समितीच्या १४४ जागांपैकी ७३ जागा महाविकास आघाडीच्या खात्यात गेल्या असून, त्यापैकी ३५ जागा जिंकत काँग्रेसने अव्वलस्थान मिळवले आहे. तर राष्ट्रवादीच्या खात्यात १६ आणि शिवसेनेच्या खात्यात २२ जागा गेल्या आहेत. तर राज भाजपाला ३३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्याबरोबरच नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ जागांपैकी ९ जागा जिंकत काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे. (Congress dominance in by-elections, highest number of seats won in Panchayat Samiti, weight in Mahavikas Aghadi will increase)
पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या जिल्हावार निकालांचा आढावा घेतल्यास काँग्रेसला नागपूरमध्ये उल्लेखनीय यश मिळाले आहे. नागपूरमध्ये काँग्रेसने ३१ पैकी २१ जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. तर वाशिममध्ये काँग्रेसने २७ पैकी ५ जागा जिंकल्या आहेत. नंदुरबारमध्ये काँग्रेसला १४ पैकी ४ जागांवर विजय मिळवला आहे. तर धुळ्यामध्ये ३० पैकी ५ जागांवर काँग्रेसला विजय मिळवला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीतही ८५ पैकी १७ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. यातील ९ जागा काँग्रेसने नागपूरमध्ये जिंकल्या. तर नंदुरबारमध्ये ३, धुळे आणि वाशिममध्ये प्रत्येकी २ आणि अकोल्यामध्ये काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला.जिल्हा परिषद पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला महाविकास आघाडीमधील घटक पक्षांपेक्षा मिळालेल्या उल्लेखनीय यशामुळे काँग्रेसचे महाविकास आघाडीमधील वजन वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील सहा जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीपैकी सर्व ८५ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये काँग्रेसने १७, राष्ट्रवादीने १७ आणि शिवसेनेने १२ अशा मिळून महाविकास आघाडीने आतापर्यंत ४६ जागा जिंकल्या. तर भाजपाने २३ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित १६ जागा इतर पक्षांच्या खात्यात गेल्या आहेत.