मालेगाव : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसच्या प्रभाग १३ (क)च्या नगरसेविका सलीमाबी सय्यद सलीम यांना म्हाळदेशिवारातील घरकुल योजनेतील सदनिकाचा लाभ देण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत माजी नगरसेवक मोहंमद आमीन मो. फारूक यांनी संबंधित नगरसेविकेला अपात्र घोषित करावे, अशी मागणी मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.नगरसेविका सलीमाबी सय्यद या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग १३ मधून निवडून आल्या आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे शपथपत्र सादर केले आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केले नाही तसेच अतिक्रमीत क्षेत्रात राहत नसल्याचे नमूद करून निवडणूक लढविली होती; मात्र जाफरनगर भागातील सर्व्हेक्रमांक ९१/२ येथील मोकळ्या भूखंडावरील झोपडी क्रमांक ५५/ब या ठिकाणी असलेल्या झोपडीमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. शासनाच्या घरकुल योजनेत अतिक्रमणधारकांना सदनिकांचा लाभ दिला जात आहे.सलीमाबी सय्यद सलीम यांनी घरकुल योजनेचा लाभार्थी होण्यासाठी महापालिकेकडून अर्ज केला होता. तसेच फेज क्रमांक ७ मधील बिल्डींग क्रमांक ८ मध्ये सदनिका मिळण्यासाठी २३ हजार ४०० रूपये अनामत रक्कम भरली आहे. सदनिका वाटप पत्र व बायमेट्रीक कार्ड घेतल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्यामुळे त्यांचे पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक मो. आमीन मो. फारूख यांनी केली आहे.