लोकमत न्यूज नेटवर्क
एका दाम्पत्याला बाळाचा जन्म होऊन पाच महिने झाले होते; पण पोटपाण्यासाठी त्यांना पुणे गाठायचे होते. रेल्वेने प्रवास सुरू झाला; मात्र प्रवासातच बाळाचा श्वास थांबला. आई-वडिलांवर आभाळ कोसळले. काय करावे सुचेना. अशावेळी समाजसेवक विलास कटारे हे धावून आले आणि पासवान कुटुंबाला धीर देऊन मुलाचा दफनविधी करत माणुसकीचे दर्शन घडवले. यावेळचे शोकाकुल वातावरण हृदयाला पाझर फोडणारे होते.
लखनौ येथे राहणाऱ्या गोविंद पासवान आणि सुमन पासवान या दाम्पत्याच्या पोटी गोंडस बाळ जन्माला आले. सर्व कुटुंबाने हा क्षण आनंद साजरा केला; मात्र हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जास्त दिवस टिकणार नसल्याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. सदर कुटुंब रोजंदारी करून आपले पोट भरणारे आहे. पोटापाण्यासाठी पुण्याला जाण्याकरिता पासवान दाम्पत्य रेल्वे गाडीत बसले. गाडी मनमाड रेल्वे स्थानकाजवळ येताच अघटित घडले. बाळाची हालचाल अचानक बंद झाली होती. बाळाला हलवून उठवण्याचा निष्फळ प्रयत्न दोघेही करत होते. गाडी मनमाड स्थानकावर आली. सदर घटना समाजसेवक विलास कटारे यांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रेल्वेस्थानक गाठले. पासवान कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मनमाड येथील एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र बाळाने रेल्वे प्रवासातच आपला प्रवास संपवला होता.
यांचा मदतीचा हात
दफनविधीप्रसंगी मुलाच्या आईचा हंबरडा जणू अस्मान चिरत होता. हे पाहून उपस्थित सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. यावेळी विलास कटारे यांच्यासह आम्रपाली निकम, टीनू जाधव, अर्जुन सकट, विकी भिवसने, अनुराग कटारे, मिलिंद खरे, उमेश शिंदे, किशन देठे, पप्पू केदारे आदींनी यावेळी मदतीचा हात दिला.