वर्षभराच्या कार्यकाळात त्यांनी धडाकेबाज कामकाज करून ठेकेदार व कर्तव्यात कसूर करणा-या अधिका-यांना वठणीवर आणले होते.५ जून २०१७ रोजी मनपा आयुक्त पदाचा पदभार धायगुडे यांनी स्वीकारला होता. महापालिकेच्या तिजोरीत असलेल्या खडखडाटामुळे विकास कामे करण्यास अडचण निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेवून मनपा आयुक्त धायगुडे यांनी महसूल उत्पन्नात वाढ करण्यासाठी मालमत्ता कराची वसुली केली. सन २०१६-१७ मध्ये मालमत्ता व संकीर्ण कराची २३.४६ कोटी एवढी वसुली झाली होती तर २०१७-१८ मध्ये महापालिकेच्या मालमत्ता व संकीर्ण कर वसुली ४१.३७ कोटी एवढी झाली. २०१६-१७ च्या तुलनेत १७.९१ कोटी एवढी वाढ झाली. मनपाच्या इतिहासात ७० टक्के वसुली पहिल्यांदा झाली. परिणामी महापालिकेचे महसूली उत्पन्न २०६.४ कोटी एवढे झाले. महसूली उत्पन्नात ६८.८९ एवढी वाढ झाली. मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणा-या कामांचे सोशल आॅडिट करण्यात आले. महापालिकेच्या एक हजार ५६६ कामांचे सोशल आॅडीट झाले. २७२ कामे सुरू करण्यास विलंब करणाºया ३९ मक्तेदारांना काळ्या यादीत टाकून सदरचे २७२ कामे रद्द करण्यात आले. यामुळे महापालिकेचे ११.४७ कोटी एवढी रक्कम वाचली. तसेच मनपा आयुक्तांनी अचानक कामांची पाहणी केली असता १४ कामे निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने सदर कामांची चौकशी सुरू आहे. तर या कामात हलगर्जीपणा करणा-या दोघा अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. सन २०१७-१८ मध्ये अंदाजपत्रकीय तरतुदीवर नियंत्रण ठेवून मनपाचे दायित्व ६.२४ कोटीने कमी केले. गेल्या दहा वर्षांपासून जमिनींच्या प्रलंबित प्रकरणांवर तडजोड करुन महापालिकेचे ५.७९ कोटींची बचत केली. बँकेच्या विविध खात्यातील शिल्लक मुदत ठेव गुंतवणूक करून व्याजपोटी ४.३८ कोटी रूपये जमा केले. आस्थापना खर्च २.८९ टक्के कमी केला. शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी ५ जून २०१७ ते ६ आॅगस्ट २०१७ दरम्यान मोहीम राबविण्यात आली. शहराची केंद्रस्तरीय समितीने तपासणी केली. २२ डिसेंबर २०१७ रोजी शहर हगणदारी मुक्त झाल्याचे शासनाने प्रमाणित केले. ६० सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले. उघड्यावर शौचास बसणा-या ८१ नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. शहर हगणदारी मुक्त झाल्यामुळे शहरातील ५५ मोकळे भूखंड, शाळा, महाविद्यालयांची मैदाने या ठिकाणी उघड्यावर शौचास बसणे बंद झाले. घनकचरा व्यवस्थापनासाठी ३१.६५ कोटी रकमेच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. अमृत योजनेंतर्गत २० उद्यानांपैकी ८ उद्यानांचे काम ७५ टक्के, ७ उद्यानांचे काम ५० टक्के व ५ उद्यानांचे काम ३ टक्के झाले आहे. अमृत अभियानाच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत वाढीव पाणी वितरण व्यवस्थेच्या कामासाठी ५८.६८ कोटी रूपयांचा प्रकल्प अहवाल मंजूर झाला आहे. त्याअंतर्गत शासनाकडून ३५.७५ कोटी रूपये अनुदान प्राप्त झाले आहे. योजनेंतर्गत एकूण ५४७.७२ कि.मी. पैकी २९७.७९ किलो मीटरची जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. मल्लनिस्सारण कामासाठी ८८ कोटी रकमेचा अहवाल मंजूर करण्यात आला आहे. नगरोत्थान अभियानांतर्गत शहरात २१.७२ कोटी रकमेच्या उड्डाण पुलाचे काम प्रगती पथावर आहे. वर्षभरात २२.५० टक्के काम झाले आहे. प्राथमिक सोय-सुविधा, नागरी दलितवस्ती सुधार योजना राबविण्यात आली. एकात्मीक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत म्हाळदे व सायने येथे ११ प्रकल्पांमध्ये प्रत्येकी १४४० इतक्या घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. सदर घरकुलांमध्ये लाभार्थ्यांना स्थलांतरीत करण्यासाठी ड्रॉ पद्धतीने १ हजार २०० सदनिकांचे वाटप करण्यात आले आहे. यापैकी २५० कुटुंब स्थलांतरीत झाले आहे. पंतप्रधान आवास योजनेत शहरी बेघरांसाठी निवारा, अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासीत करण्याचे काम व कामे धायगुडे यांच्या कार्यकाळात झाले. मंगळवारी सायंकाळी त्यांनी मनपा आयुक्त पदाचा पदभार सोडला. यावेळी महापौर रशीद शेख, आमदार आसीफ शेख यांनी मनपा आयुक्तांना पुष्पगुच्छ देवून निरोप दिला. शासनाने मनपा आयुक्त पदाचा पदभार नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे दिला आहे.
मालेगाव मनपा आयुक्तांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 7:01 PM