मुंबई: भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेकडून राज्य सरकारला 3 मेचा अल्टिमेटम दिल्यानंतर आता आज राज्यातील अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.
'आम्हाला बाळासाहेबांविषयी सांगण्याची गरज नाही'आज सकाळी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडिओला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "बाळासाहेबांचे जुने काय प्राचीन व्हिडीओ जरी टाकले, तरी आम्हाला बाळासाहेबांविषयी कुणी सांगण्याची गरज नाही. त्यांनी पुन्हा बाळासाहेब तपासले पाहिजेत. शिवसेना प्रमुखांच्या भूमिकांचा, विचारांचा इतिहास हा आमच्यासारख्यांना कुणी सांगण्याइतके आम्ही अजून खाली घसरलेलो नाही. आजही आमचा श्वास बाळासाहेबांच्या विचारांनीच चालतो," असं राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणतात की, "बाळासाहेबांनी भोंग्याच्या बाबतीत, रस्त्यावरच्या नमाजाच्या बाबतीत जरूर भूमिका मांडली. पण त्यांनी रस्त्यावरचे नमाज तोडगा देऊन बंद केले. हा इतिहास माहिती नसेल, तर त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब समजून घ्यावे. यासंदर्भातल्या बाळासाहेबांच्या जुन्या भाषणाच्या कॅसेट आम्ही त्यांच्याकडे पाठवून देऊ," असा टोलाही राऊतांनी लगावला.
राज ठाकरेंनी शेअर केला व्हिडीओराज ठाकरेंनी आज सकाळी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे भोंग्यांच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना दिसत आहेत. "ज्या दिवशी आमचे सरकार महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नामाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल त्याने येऊन मला सांगाव, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. मशिदीवरील लाऊडस्पीकर्स खाली येतील", असं बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.