- पवन देशपांडे
काही वर्षांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्स या प्रतिष्ठित अमेरिकन वर्तमानपत्रात भारताची हेटाळणी करणारे एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते़ ‘एलाइट स्पेस ग्रुप’ असा बोर्ड लावलेल्या एका खोलीत काही (विदेशी) शास्त्रज्ञ बसलेले दिसतात. काळा कोट घातलेल्या त्यातल्या एकाच्या हाती वृत्तपत्र आहे. त्यावर ‘इंडियाज मार्स मिशन’ असे इंग्रजीत लिहिलेले आहे. त्या खोलीच्या दाराशी एक खेडूत आपली गाय घेऊन ‘मलाही तुमच्या ग्रुपमध्ये घ्याल का?’ असा याचकी चेहरा घेऊन उभा दिसतो... तो माणूस म्हणजे भारत, असेही त्यावर लिहिले आहे!- असे हे व्यंगचित्र! भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ संशोधन कार्यक्रमाची खिल्ली उडवणारे! त्यावर अर्थातच टीकेची झोड उठली. दुसऱ्याच दिवशी या नकचढ्या न्यूयॉर्क टाइम्सने दिलगिरी व्यक्त केली खरी; पण भारताच्या वैज्ञानिक महत्त्वाकांक्षांकडे पाहण्याचा पश्चिमी दृष्टिकोन कसा टिंगलटवाळीचा आणि खवचट आहे, हे त्यातून दिसलेच!- ही घटना फार जुनी नव्हे! काही वर्षांपूर्वी आपण जेव्हा मंगळाभोवती पोहोचण्यासाठी यान पाठवले तेव्हाची!त्या मंगळयानाने या खवचट खिल्लीला चोख उत्तर तर दिलेच; पण आता भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) एकाच वेळी एकाच उड्डाणात १०४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले तेव्हा तर तो तथाकथित ‘एलाइट स्पेस ग्रुप’ही हडबडला असेल यात तिळमात्र शंका नाही.या यशस्वी झेपेनंतर पुन्हा एकदा भारताची मान अभिमानाने ताठ झाली़ आणि या अतीव महत्त्वाच्या क्षेत्रात एक नवे यशोशिखर इस्रोने गाठले़ जो ‘एलाइट स्पेस ग्रुप’ आता आतापर्यंत स्वत:ला तंत्रज्ञान समृद्ध आणि विज्ञान - श्रीमंत समजायचा; आपल्याएवढी क्षमता कोणातच नाही, असा तोऱ्यात वावरायचा त्याचा अहंकार भेदण्याचे काम इस्रोने यशस्वीपणे पार पाडले आहे. देशभरात उसळलेल्या अभिमानाच्या आणि कौतुकाच्या उधाणाला अतीव महत्त्वाकांक्षांचे भविष्य आहे, तसाच सतत अभावातून निश्चयाने पुढे सरकत राहिलेला भूतकाळही आहे.स्वातंत्र्यानंतर प्रगत देशांनी आपल्यापुढे सहकार्य म्हणून देऊ केलेले तंत्रज्ञानाचे तुकडे जुळवत जुळवत एकेक पाऊल टाकणे भारताच्या नशिबी होते. आपल्याकडे ना कुशल संशोधक होते, ना संशोधनासाठीची साधने, ना त्यासाठीची दीर्घदृष्टी! पण, नजीकच्या आणि दूरवरच्या भविष्यात काय होऊ शकेल याची जाण असलेला एक द्रष्टा संशोधक आपल्याकडे होता- भारतातील अणुसंशोधन आणि अवकाश संशोधनाचे जनक डॉ. होमी भाभा. या शास्त्रज्ञाने स्वतंत्र देशाच्या प्रगतीतली विज्ञान-तंत्रज्ञान संशोधनाची खरी गरज ओळखली होती़ त्यांच्या डोळ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्य स्पष्ट दिसलेले असणाऱदुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यातला अणुस्फोट व्हायचा होता आणि जगाला अणुशक्तीचा प्रत्ययही यायचा होता; त्याच्याही दीड वर्ष आधी होमी भाभा यांनी अणुसंशोधनाचे महत्त्व जाणले होते. त्यासंबंधी संशोधन व्हावे आणि अणूचे विघटन होऊन ऊर्जा निर्माण झालीच तर ते सारे विज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि आपल्या देशाला त्याचा फायदा होण्यासाठी संशोधकांची एक फळी तयार असायला हवी, अन्यथा आपण मागे राहू... अशी भीती त्यांनी पंडित नेहरू यांच्याकडे मांडली होती़ हे द्रष्टेपण होमी भाभांकडे होते. त्यांनी लावलेल्या या रोपट्याला पुढे एक एक फांदी फुटत गेली. त्याचा संशोधन वृक्ष झाला. मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्था त्यावेळी मूळ संशोधन संस्था मानली जात होती़ होमी भाभा यांनी या ठिकाणी संशोधन करणाऱ्या प्रत्येकाने स्वतंत्र संस्था काढून वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन संधी निर्माण करण्याची कल्पना पुढे आणली. त्याचा फायदा असा झाला की, भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार वाढला़ संशोधनाला गती आली. संशोधकांची एक पिढी निर्माण झाली.संशोधन क्षेत्रात भारतात आत्ता जे नेत्रदीपक काम होते आहे, ते या एका पिढीच्या पूर्वसंचितामुळे. भारताला पहिला सुपर कम्प्युटर देणाऱ्या कॅनडाने तो बिघडल्यावर दुरुस्तीचे तंत्रज्ञान मात्र भारताला दिले नव्हते. हेच ते प्रगत देशांचे ‘हातचे राखून’ ठेवणे! संगणकीय क्रांतिपूर्व काळातल्या भारतीय संशोधकांनी तो सुपर कम्प्युटर हिमतीने उघडला आणि दुरुस्त करून दाखवला. देशाच्या सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये इतरांना डोकावू न देण्याची संशोधकांची ही वृत्ती आजही भारताला प्रगतीच्या नव्या शिखरांवर पोहोचवित आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या केवळ कुबड्या नकोत तर चालायचे कसे आणि कुबड्या मागे सोडून पळायचे कसे याचे ज्ञान कमावण्याची धमक भारताने दाखवली़ त्यातून संशोधक घडत गेले़एखाद्या उपग्रह प्रक्षेपणाचे लाइव्ह चित्रण टीव्हीच्या माध्यमातून देशाला (आणि जगाला) दाखवण्याची हिम्मत जगात पहिल्यांदा भारतानेच केली. डॉ. वसंत गोवारीकर यांच्यासारख्या जिगरबाज शास्त्रज्ञाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या परवानगीने हा प्रयोग घडवला होता आणि ते उड्डाण यशस्वीही झाले होते़ जगाला विज्ञान संशोधनातील-अवकाश संशोधनातील भारताची ताकद दाखवण्याची परंपरा तेव्हापासून सुरू झाली ती आजतागायत खंडित झालेली नाही.भारतात होणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधनाच्या यशात खोडा घालण्याचा प्रयत्न झाला नाही असे नाही़ तो झालाही़ अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाने भारतीय संशोधन संस्थांवर बंधने लादून पाहिली़ भारतात होणारी ज्ञानाची निर्यातच रोखून प्रगतीत अडथळे आणण्याचाही प्रयोग केला. तंत्रज्ञान रोखले़ परंतु, भारताला फरक पडला नाही़ अविरत सुरू राहिलेला संशोधनाचा यज्ञ भारतीय संशोधनाला नव्या उंचीवर घेऊन गेला. इस्रोची अवकाश भरारी हे त्याचेच फलित आहे. काही दशकांपूर्वी भारत अवकाशसंबंधी सर्व गोष्टींसाठी परदेशी उपग्रहांवर अवलंबून होता़ अगदी भारतातील हवामानाच्या अंदाजांसाठीही परदेशी उपग्रह वापरले जात असत. संरक्षण असो वा आपल्या हातात आता आता आलेले जीपीएस तंत्रज्ञान असो... किंवा शेतीसाठी लागणाऱ्या विविध माहितींची देवाण-घेवाण करणारे उपग्रह-विज्ञान असो, या सर्वांसाठी परदेशी उपग्रहांची मदत भारताला लागत होती़ परंतु, इस्रोच्या संशोधकांनी अतुलनीय कामगिरीच्या जोरावर भारताला त्यातही स्वयंपूर्णतेच्या दिशेने नेले आहे़ एक काळ असा होता की, भारताला अवकाशात सोडावे लागणारे जड वजनाचे उपग्रह अमेरिकेतील नासा किंवा रशियाची रॉस्कॉसमॉस अशा बड्या संस्थांच्या मदतीने अवकाशात सोडावे लागत होते़ कारण तेवढ्या ताकदीचे अग्णिबाण भारताकडे नव्हते़ भारताला ते तंत्रज्ञान मिळू नये म्हणून अमेरिका आणि रशियाने यातही अडथळे आणले.क्रायजेनिक इंजिन असलेल्या अग्निबाणाच्या साहाय्याने जड वजनाचे उपग्रह भारताला प्रक्षेपित करता येऊ नयेत आणि या ‘इंडट्री’वरचे आपले वर्चस्व अबाधित राहावे, हा अमेरिका आणि रशियाचा कारस्थानी उद्योग भारतीय संशोधकांनी मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने मोडीत काढला.हे सारे तंत्रज्ञान भारतानेच स्वयंस्फूर्तीने विकसित केले. हा आपल्या संशोधकांनी रचलेला इतिहास आहे.आता भारताची अवकाश संशोधनातील ताकद एवढी वाढली आहे की, अमेरिका आणि रशियातीलच बड्या कंपन्या त्यांचे उपग्रह भारताच्या अग्णिबाणातून अवकाशात पाठवू लागल्या आहेत़ नुकत्याच झालेल्या यशस्वी मोहिमेत १०४ उपग्रहांपैकी ९६ उपग्रह अमेरिकेतील वेगवेगळ्या कंपन्यांचे होते आणि काही इतर प्रगत देशांचेही होते़ यावरून हे सिद्ध होते की अवकाश संशोधनातील ताकद भारताला एका नव्या उंचीवर घेऊन गेली आहे़ केवळ तीनच वर्षांपूर्वी अगदी एखादे धरण बांधण्यासाठी लागणाऱ्या खर्चात मंगळ मोहीम यशस्वी करून दाखवून भारताने जगात आपला ठसा उमटवला होता़ आता एकाच वेळी शंभराहून अधिक उपग्रह अवकाशात पाठवून जगभरात वेगाने वाढणाऱ्या या नव्या ‘उद्योगक्षेत्रा’त भारताने आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. कधीकाळी अडगळीत असलेली आणि कोणाचे फारसे लक्ष नसलेली इस्रो ही संस्था गेल्या काही वर्षांमध्ये चर्चेत आली ती या अशाच यशोमालिकांमुळे आणि इस्रोचे हे यश भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सामर्थ्याला बळ देणारे आहे़ दबदबा वाढवणारे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील सदस्यत्वासाठी भारताला विरोध करणाऱ्या देशांसाठी भारताची ही ‘ब्रह्मांड झेप’ झोप उडवणारी ठरेल, यात शंका नाही.अवघडातले परफेक्शनतब्बल १०४ उपग्रह एकाचवेळी अवकाशातील विविध कक्षांमध्ये सोडणे हे अवघड काम आहे. एकतर अग्णिबाणाचा वेग अतिप्रचंड असतो आणि एकापाठोपाठ एक उपग्रह अशा तऱ्हेने सोडावे लागतात की ते पुन्हा कधी एकमेकांवर आदळू नयेत. याची काळजी इस्रोने उत्तमरीत्या घेतली. अचूक गणितीय मांडणी करून आपल्या संशोधकांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली यात शंकाच नाही. हे अतिप्रगत अभियांत्रिकी कौशल्य आणि अवघड गोष्टीतले परफेक्शन आहे.या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची विश्वासार्हता सिद्ध झाली आहे़ उपग्रह अवकाशात सोडणाऱ्या कोणत्याही कंपनीसाठी यशाचे प्रमाण महत्त्वाचे असते. व्यावसायिक कंपन्या आणि छोट्या-मोठ्या देशांना इस्रोमुळे कमी खर्चात उपग्रह पाठवण्यासाठी उत्तम सोय उपलब्ध झाली आहे़ विज्ञान-तंत्रज्ञान आणि पैसा या सर्वच पातळ्यांवर श्रेष्ठ असणाऱ्या देशांना जे आजपर्यंत जमले नाही ते भारताने करून दाखविले आहे. - डॉ. अनिल काकोडकर (सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ)
इतके उपग्रह कोण आणि का सोडते?
अमेरिकेने एकाच वेळी २९ उपग्रह सोडले, रशियाने ३७़ आता भारताने तब्बल १०४ उपग्रह अंतराळात पाठवले़ यात काही खाजगी कंपन्यासुद्धा आहेत. एवढे उपग्रह नेमके कशासाठी सोडले जातात?- हा कुतूहलाचा प्रश्न पडणे साहजिक आहे़त्याचे कारण वेगाने बदलते तंत्रज्ञान आणि अवकाशात फिरणाऱ्या या उपग्रहांच्या विविध उपयोग-पद्धतींनी घेतलेला आपल्या दैनंदिन जगण्याचा ताबा! आपण टीव्ही बघतो, इंटरनेट वापरतो, जीपीएस वापरून चालत्या वाहनातून इच्छित ठिकाणी जाणारा जवळचा रस्ता शोधतो; ते उपग्रहांच्या मदतीने! शिवाय हवामानाचे अंदाज बांधण्यापासून शत्रूराष्ट्राच्या हालचालींचा वेध घेण्यापर्यंत अनेक बाबतीत या उपग्रहांची मदत घेतली जाते. जमीन मोजणे, जमिनीचा वापर निर्धारित कारणासाठीच होतो ना यावर नजर ठेवणे, पिकांचे नियोजन अशा अनेकानेक गोष्टींसाठी उपग्रहाधारित सेवा वापरात आल्या आहेत. संशोधनासाठी उपग्रह सोडले जातात ते वेगळेच. आता तर खासगी कंपन्याही ग्राहकांना उत्तम सेवा देता यावी यासाठी उपग्रह सोडू लागल्या आहेत. उपग्रहाधारित सेवांचे प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे ते पाठवण्याचा वेगही वाढतो आहे. उपग्रह अवकाशात सोडण्याच्या सेवेला आता एक प्रकारे ‘इंडस्ट्री’चे रूप आले ते यामुळेच. छोटे-छोटे; पण अधिक उपग्रह सोडायचा ट्रेंड वाढतो आहे. इस्त्रोने आतापर्यंत २२६ उपग्रह प्रक्षेपित केले त्यापैकी १७९ उपग्रह हे परदेशी होते़ म्हणजेच विश्वासार्हता, क्षमता व कमी खर्च या पातळीवर इस्रो यशस्वी ठरली आहे. एकाच अग्निबाणाने जेवढे अधिकाधिक उपग्रह अवकाशात सोडू तेवढा प्रत्येक उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा खर्च कमी होणार. हे म्हणजे एका गाडीत अधिकाधिक प्रवासी बसवण्यासारखे आहे. जो हे करू शकेल, त्याला कमी खर्चात अधिक पैसा मिळणार. हे याचे आर्थिक गणित. त्यामुळेच इस्रोने एकाचवेळी अनेक उपग्रह पाठवण्याची केलेली किमया उपग्रह प्रक्षेपण ‘इंडस्ट्री’चे गणितेच बदलणारी ठरणार आहे.(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्ती मुख्य उपसंपादक आहेत)