- विनोद कापडी
(फिल्ममेकर आणि पत्रकार)
देशात गेल्या वर्षी काहीच पूर्वसूचना किंवा वेळ न देता एकाएकी लॉकडाऊन जाहीर केला गेला. देशभरातील लाखोंच्या संख्येनं ‘रिव्हर्स मायग्रेशन’च्या उन्हाळी वाटा चालत निघालेल्या मजुरांचे हाल सुरू झाले. त्यांच्या कहाण्या समोर येऊ लागल्या. त्या-त्या शहरांच्या वेशींपर्यंतच माध्यमं मजुरांबरोबर जात होती.
मला वाटायला लागलं, शहर सोडल्यावर या मजुरांचं पुढे काय होत असेल? हे फाटके, जर्जर लोक कसे पोचतील आपापल्या गावी, यांच्या राहण्याखाण्याचं काय, यांना प्रशासन कशी, किती मदत करेल, हे सगळे प्रश्न मनात होतेच. देशालाही हे सगळं नीट समजावं अशी इच्छा होती.
सुरुवातीच्या चार-पाच दिवसांतच समजलं होतं, की फाळणीनंतरचं हे सर्वांत मोठं स्थलांतर असणार आहे. भारतातल्या जवळपास वीसहून अधिक मोठ्या शहरांमधून लोक रस्त्यांवर येत आपापल्या गावांकडं निघाले होते. सरकारची खूप मोठी बेपर्वाई याला कारणीभूत ठरली. लोक हजारो किलोमीटर चालत निघाले होते तेव्हा नक्की कुठकुठल्या त्रासांना ते सामोरे गेले हे नागरिकांना कळलं पाहिजे या हेतूने मी या मजुरांबरोबर प्रवास सुरू केला. त्याचं चित्रीकरण केलं आणि त्यातूनच ही डॉक्युमेंटरी घडली : १२३२ किलोमीटर्स!
गाजियाबाद ते सहरसा हे १२३२ किलोमीटरचं अंतर दिवसरात्र सायकल मारत कापलेल्या ७ मजुरांचा प्रवास यात दाखवला आहे. एक कमतरता या प्रवासादरम्यान आणि आजही मला जाणवते. या स्थलांतरात खूप लहान मुलं होती, स्त्रिया होत्या, वयोवृद्ध होते. अगदी गर्भवती स्त्रियाही होत्या. मात्र आमच्या या फिल्ममध्ये एकही तशी स्त्री नाही, लहान मूलही नाही. हे सगळं यात आलं असतं तर नक्कीच अजून वेगळं, जास्त सखोल असं काही समोर ठेवता आलं असतं.
या प्रवासात अशा खूप सूक्ष्म गोष्टीही होत्या ज्या कॅमेरा अजिबातच पकडू शकला नाही. असंही व्हायचं, की अनेकदा हे लोक रात्री उपाशी असायचे. काही वेळेला जेवण मिळायचं. जेवायला मिळावं म्हणून आधी अनेक ढाब्यांवर विनंत्या करून झालेल्या असायच्या. काही ठिकाणी नकार मिळायचा तर काही ठिकाणी जेवण संपलेलं असायचं. अशावेळी सगळं शांत झाल्यावर हे लोक कचऱ्यात टाकलेलं अन्न शोधून खायचे. अर्थात, हे मी पाहिलं नाही. मला सांगितलं गेलं. अशा गोष्टी ऑन कॅमेरा रेकॉर्ड होऊ शकल्या नाहीत. मात्र हे सगळं असं भयानक, अवमानित करणारं त्यांच्यासोबत घडलं.
अनेक ठिकाणी या लोकांना तहान लागायची, तेव्हा पाण्याच्या हातपंपांना हात लावू दिला जायचा नाही... “तुम्ही दिल्लीहून आलात... तिकडं तर कोरोनाच्या खूप केसेस झाल्यात. याला हात लावून संसर्ग पसरवू नका...”
यात आम्ही केवळ मूक प्रेक्षक बनून राहिलो असतो तर हे सात जण सहीसलामत घरी पोचू नसते शकले कदाचित! आम्हाला तो खडतर प्रवासही शूट करायचा होता. लोकांना त्याची तीव्रता कळावी हा हेतू होता. मात्र या खडतरपणाची झळ या सात जणांना कमी लागावी असंही वाटायचं... खूप भीती वाटायची, की यांच्यापैकी कुणाला रस्त्यात काही झालं तर स्वतःला आपण आयुष्यभर माफ करू शकणार नाही...
दिल्लीहून यूपी-बिहारमधल्या गावांचं अंतर तरी तुलनेनं कमी आहे. मुंबई, बंगलोर अशा शहरांतून निघालेल्या लोकांनी हे अंतर कसं कापलं असेल, या विचारानेच अंगावर काटा येतो. दोन-तीन हजार किलोमीटरचं अंतर लोकांनी चालत कापलं. काही जण वाटेतच मेलेही. हे असं सगळं भयंकर त्या काळात देशभर घडत होतं.
मी पत्रकार आहे, सोबतच फिल्ममेकरही आहे! पत्रकार म्हणून तुम्ही लोकांशी बोलता तेव्हा लोकांच्या वेदना तुम्हाला जास्त चांगल्या कळतात. मात्र फिल्ममेकर म्हणून तुम्ही त्या पडद्यावर प्रभावीपणे उतरवू शकता. माझा अनुभव आहे, की या दोन्ही गोष्टी एकमेकांना खूप पूरक आहेत. अर्थात यात एक विचित्र कोंडीही असते. संकटात सापडलेल्या लोकांच्या समस्या रिपोर्ट करायच्या की त्या सोडवायच्या, त्यांना मदतीचा हात द्यायचा..?
हे शूट करायला आम्ही निघालो तेव्हाच समजलं होतं, की रस्ताभर खूप अडचणी, त्रास दिसणार आहेत. सगळंच अवघड चित्र असणार आहे. आम्ही ठरवलं, की या मजुरांच्या अडचणी अजूनच वाढतील, असं काही करायचं नाही. आपली फिल्म प्रभावी बनावी यासाठी आलेली संकटं मूक प्रेक्षक बनून पाहत राहू अशीही भूमिका घ्यायची नाही. म्हणजे, रस्त्यात कुण्या मजुराला चक्कर आली, येऊदे, त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होताहेत तर होऊदे असं धोरण ठेवायचं नाही, हे ठरवलं होतं.
आपल्याला जनसामान्यांचा आवाज बनायचं आहे, हेच मी पत्रकार म्हणून शिकत आलो. या फिल्ममधूनही हेच करण्याचा प्रयत्न होता. मी या मजुरांसह होतो तेव्हा हे सात जण आणि बाकीचेही असंख्य स्थलांतर करणारे प्रचंड रागात होते. व्यवस्थेवरची त्यांची चीड जाणवत होती. पण, आठ महिन्यांनंतर बिहारमध्ये मतदान झालं तेव्हा पुन्हा त्याच रस्त्यावर मरायला सोडलेल्या सरकारला त्यांनी जिंकून दिलं. अर्थात जुन्याच नॅरेटिव्हला हे सगळे बळी पडले. असं का होतं..?
या सात जणांपैकी सहा लोक पुन्हा शहरात आले. मात्र त्यातला एक जण मुकेश, जो मध्येच रस्त्यात बेशुद्ध पडला होता, तो गावीच राहिलाय. तो खूप अस्वस्थ आणि घाबरलेला आहे. त्याला आता पुन्हा दिल्लीला यायचं नाही. गावातच त्यानं लहानशा ठेल्यावर खाद्यपदार्थ विकणं सुरू केलं आहे. उरलेले सहा जण मात्र म्हणतात, की गावी राहून किती कमावणार? सरकारनं स्थानिक पातळीवर कितीही रोजगाराचं आश्वासन दिलं तरी प्रत्यक्षात काहीच आलेलं नाही.
आता पुन्हा एकदा आपण अजून तीव्र गोष्टींना सामोरं जातो आहोत. संसर्ग रोखायला विविध राज्यं नव्यानं लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहेत. असंख्य मजूर पुन्हा आपापल्या गावी हाल करून घेत निघालेत. त्या-त्या राज्याच्या सरकारनं आणि केंद्रानंही त्यांच्याच राज्यात त्यांना रोजगार दिले तर चित्र कितीतरी बदलेल. त्रासांची तीव्रता सौम्य होईल. आपण बोलत, लिहीत राहायचं... आवाज यंत्रणेच्या कानावर पडेपर्यंत..!
(शब्दांकन : शर्मिष्ठाभोसले)