-दत्तप्रसाद दाभोळकर
9 सप्टेंबर 1893, सर्वधर्म परिषदेचा पहिला दिवस. दिवस संपत आला होता. श्रोते जांभई देण्याच्या अवस्थेत पोहचले होते. एक अनाम संन्यासी फक्त पाच मिनिटांसाठी व्यासपीठावर आला. त्याने काही शब्द उच्चारले. सा-या सभागृहात विजेची एक लहर चमकून गेली. टाळ्यांचा गजर करत सारे श्रोते उभे राहिले. सारे सभागृह संमोहन अवस्थेत गेले होते. आणि हे गारुड तिथेच थांबले नाही. जगभराच्या वार्ताहरांनी ही संमोहन अवस्था सर्वदूर पोहचवली. त्या क्षणी भाषा, देश, धर्म कुठल्याच सीमारेषा या वादळापासून सुरक्षित नव्हत्या.
आता 125 वर्षे ओलांडली गेली आहेत. अजूनही सारा हिंदुस्थान त्या संमोहन अवस्थेतून बाहेर आलेला नाही.पण आता सव्वाशे वर्षांनंतर तरी त्या पाच मिनिटांच्या भाषणाच्या चकव्यात सापडल्यासारखे पुन: पुन्हा भरकटत राहणे किंवा भोवर्यासारखे गरगर फिरत राहणो आपण थांबावयाला हवे. सर्वधर्म परिषद म्हणजे नक्की काय होते? विवेकानंद तिथे का गेले, कसे पोहचले? त्यांना आयुष्यात नक्की काय करायचे होते? त्यांना ते जमले, की जमले नाही हे पहावयास हवे. त्यांचा कालखंडही नीटपणे लक्षात घ्यावयास हवा.
लोकमान्य टिळकांच्याहून विवेकानंद सात वर्षांनी लहान आणि महात्मा गांधींच्या पेक्षा सहा वर्षांनी मोठे आहेत. या देशाला स्वातंत्र्य मिळवायला आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवायला काय करावयास हवे याचा मार्ग हे तिघेही अस्वस्थ होऊन शोधत होते. विवेकानंदांनी वयाच्या 27व्या वर्षी वराहनगर मठ सोडला. त्यानंतर परिव्राजक म्हणजे भटका संन्यासी म्हणून त्यांनी तीन वर्षे भारत उभा आडवा पिंजून काढला. या तीन वर्षांत त्यांनी संन्यास धर्माची सर्व बंधने तोडली. अनाम संन्यासी, विविदिशानंद, सच्चिदानंद आणि शेवटी विवेकानंद अशी नावे बदलली. भंग्याबरोबर चिलीम ओढली. चांभाराच्या घरी राहिले. मुसलमानांच्या घरी राहिले. राजाच्या राजवाड्यातही राहिले. अस्वस्थ होऊन मित्रांना पत्रे लिहिली. त्यात धर्मचर्चा अजिबात नाही. हा देश या अवनतीला का पोहचलाय याची चर्चा आहे. तीन वर्षांच्या अथक भटकंतीचे फलित म्हणून त्यांनी अळसिंगा पेरुमल यांना लिहिले, ‘मी आता ठामपणे सांगतोय माझ्या देशाला झालेला रोग आणि त्यावरचे औषध मला समजलेले आहे.’
भटकत असताना, उडत उडत विवेकानंदांच्या कानावर सर्वधर्म परिषदेची बातमी येते काय, आणि विवेकानंद सर्वधर्म परिषदेत जाऊन भाषण देण्याचे ठरवतात काय. सारेच विलक्षण!
विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेत भाग घेण्यासाठी अमेरिकेत जाणो म्हणजे गावच्या जत्रेत चमकदार कुस्ती खेळणा-या पहिलवानाने कुठेतरी ऑलिम्पिक नावाचे सामने आहेत, असे ऐकावे आणि आपण तेथे जाऊन कुस्ती खेळायची म्हणून ऑलिम्पिकच्या मैदानात जाण्यासारखे आहे.
सर्वधर्म परिषद ही त्यावेळच्या जगातील एक फार मोठी घटना होती. चार्लस कॅरॉल बॉनी त्याची तीन वर्षे तयारी करत होते. त्यांनी जगभर शेकडो नव्हे हजारो परिपत्रके आणि पत्रे पाठवली होती. जगात सर्वत्र अनेक समित्या स्थापन केल्या होत्या. अगदी प्रय}पूर्वक आणि काळजीपूर्वक प्रत्येक धर्माचा प्रतिनिधी निवडला होता. त्याचा जाण्या-येण्याचा, राहण्याचा, मानधनाचा सर्व खर्च संयोजक करणार होते. त्याने आपल्या धर्मातील मूलतत्त्वे कोणती, इतर धर्मांहून ती वेगळी कशी, आपला धर्म मानवजातीसमोरचे आजचे प्रश्न कसे सोडवणार आणि सर्वधर्म समन्वय कसा साधता येईल, यावर बोलावयाचे होते.
विवेकानंद तेथे पोहचले त्यावेळी त्यांना यातील काही म्हणजे काही माहीत नव्हते. निमंत्रण नसताना तेथे आलेत म्हणून त्यांची खिल्ली उडवण्यात आली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका थिऑसॉफिस्टने लिहिलेले पत्र आज उपलब्ध आहे. त्याने लिहिलेय, ‘धर्माची वेडीवाकडी नवी मांडणी करणारा हा भटका संन्यासी आता भुकेने आणि थंडीने व्याकूळ होऊन अमेरिकेत तडफडत मरणार.’
खिशात दमडी नाही. राक्षसी थंडीपासून रक्षण करणारे कपडे नाहीत. सर्वधर्म परिषदेला अजून पाच आठवडे शिल्लक होते.. मात्र, विवेकानंदांच्या लक्षात आले होते, की सर्वधर्म परिषद ही जगाच्या व्यासपीठावर जाण्याची सुवर्णसंधी आहे. विवेकानंदांनी त्या आधीच्या पाच आठवड्याचे सोने केले. त्या पाच आठवड्यात त्यांनी अकरा भाषणे दिली. वेगवेगळ्या थरातील श्रोते निवडले. विवेकानंद अमेरिकेतील श्रोत्यांची नाडी तपासत होते. ते येथेच थांबले नाहीत. पत्रामधून आपल्या शिष्यांना त्यांनी कळवले ‘वक्त्याच्या दृष्टीने त्याचा पोशाख महत्त्वाचा असतो. येथे आल्यापासून मी पोशाख बदलून पाहतोय. मी आता सर्वधर्म परिषदेत व्याख्यान देतेवेळी तांबडा झगा व फेटा याचा उपयोग करणार आहे. अशा प्रकारचा पोशाख करण्याचे येथील स्त्रियांनी मला सुचवले आहे.’
- विवेकानंदांचा आत्मविश्वास बघा. सर्वधर्म परिषदेचे आमंत्रण हातात येण्यापूर्वी त्यांनी हे पत्र लिहिले. प्रचंड आत्मविश्वास. मनात आमंत्रण मिळविणो वगैरे फिजूल अडचणी नाहीत. विवेकानंद प्रोफेसर राइट यांना शोधत होते. राइट हे त्यावेळचे अमेरिकेतील सर्वात मोठे विचारवंत. विवेकानंदांनी अखेर राइट यांच्याबरोबर संवाद साधला. रात्रभर दोघे बोलत होते. निघताना राइट म्हणाले, ‘भल्याङ्कमाणसा, तू फक्त तीस वर्षांचा आहेस. पण मानवी संस्कृतीचे तीन हजार वर्षांचे संचित तुझ्याबरोबर आहे. माझी विनंती आहे. तू सर्वधर्म परिषदेत बोलावयास हवे! चार्लस कॅरॉल बॉनी माझा विद्यार्थी आहे. त्याला पत्र देतोय!’
सर्वधर्म परिषद सतरा दिवस चालणार होती. दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी तीन सत्रे होती. चार्लस कॅरॉल बॉनी यांनी राइट यांच्या सांगण्यावरून पहिल्याच दिवशी विवेकानंदांचे भाषण ठेवले. विवेकानंदांचे नाव चारवेळा उच्चारण्यात आले. विवेकानंद तीनवेळा उठले नाहीत. विवेकानंद का उठले नाहीत, याबाबत दोन टोकाची मते आहेत. पहिले मत सांगते - ते घाबरले होते. त्यापूर्वी फक्त हैदराबाद येथील मेहबूब कॉलेजात ते मोठय़ा समुदायासमोर बोलले होते. पण दुसरे मत सांगते - विवेकानंद निवांत होते. अमेरिकेतील अकरा भाषणांमधून त्यांनी अमेरिकेतील श्रोत्यांची नाडी तपासली होती. आता ते शांतपणे वक्ता आणि श्रोते यांची उंची तपासत होते ! र्शोते कुठे जांभई देतात आणि कुठे टाळी वाजवतात ते पहात होते. त्यांच्या लक्षात आले होते, आयुष्यातील ही फार
मोठी संधी आहे ! पण फक्त पाचच मिनिटात अपेक्षित परिणाम घडवून परत यायचे आहे. झोपलेल्या, मरगळलेल्या श्रोत्यांना आणि वक्त्यांनाही खडबडून जागे करायचे आहे. विवेकानंदांनी ओळखले, आपल्या भाषणातील खरे लालित्य, कौशल्य, नजाकत वगैरे दाखवायचे असेल तर ते हे ठिकाण नव्हे ! हा सामना किंवा हे भाषण फक्त आहे प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना पाच मिनिटांसाठी मंत्रमुग्ध करण्यासाठी ! आणि हे जरी केले तरी भाषणाची उदंड आमंत्रणे येतील. त्यावेळी भाषण म्हणजे काय आणि त्यातील कौशल्य म्हणजे काय ते मी दाखवून देईन !
त्या भाषणानंतर आपल्या जवळच्या चार मित्रांना पत्र पाठवून त्यांनी कळवले, ‘आता मी अमेरिकेत भाषणो देऊन भरपूर पैसे मिळवू शकेन. भारतातील माझ्या मनातील रचना साकार करण्यासाठी मला त्या पैशांची खूप गरज आहे. कारण माझ्या मनातील रचना साकार करायला भारतातील लोक फक्त तोंडी सहानुभूती दाखवतात ! पैशाचे नाव काढताच बाजूला पळतात!’
विवेकानंद सर्वधर्म परिषदेत का गेले होते, याला आणखीही एक कारण आहे. परिषदेनंतर 28 डिसेंबर 1893 रोजी हरीपद मित्रांना पत्र पाठवून त्यांनी कळविले, ‘मी काही नाव मिळवायला किंवा कुतूहल म्हणून येथे आलो नाही, तर माझ्या देशाचे नवनिर्माण करण्याच्या ज्या रचना माझ्या मनात आहेत, त्यांना मदत करणारे लोक किंवा रचना मला येथे मिळतील का ते मी शोधतोय.’
ते असो. या धर्म परिषदेत विवेकानंद जे बोलले त्यातील महत्त्वाचा भागपण आपण लक्षात घेत नाही. या भाषणात मांडलेली धर्माबाबतची मते विवेकानंदांनी त्यानंतर अनेक ठिकाणी नेमकेपणांनी सांगितली. विवेकानंदांचे भाऊ महेंद्रनाथ त्यांना 1896मध्ये अचानक लंडन येथे भेटले. विवेकानंदांनी 1890 साली कलकत्ता सोडल्यावर सहा वर्षांनी ते प्रथमच त्यांना भेटत होते. त्यावेळी विवेकानंद त्यांना जे म्हणाले, ते त्यांनी ‘लंडनेर स्वामी विवेकानंद’ या पुस्तकात लिहिले आहे.
विवेकानंद म्हणाले, ‘भाऊ, मला ओळखलंस का? मी सेंट पॉलप्रमाणे धर्माचे वेड पांघरलेला एक विचारवंत आहे. धर्मवेडासारखा मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही!’
विवेकानंद परत आल्यावर बंगालमधील सनातनी सुबोध पत्रिकेने लिहिले, ‘विवेकानंद हे शूद्र आहेत. त्यामुळे संन्यास ग्रहण करण्याचा किंवा हिंदूधर्माचा उपदेश करण्याचा अधिकार त्यांना पोहचत नाही.’ आणि महामहोपाध्याय गोपाळशास्त्री कराडकर यांनी मुंबईत त्र्यंबकशास्त्री वैद्य यांच्या घरी जाऊन त्यांना सांगितले, ‘विवेकानंद शूद्र आहेत. त्यातून समुद्रप्रवास करून आलेत त्यामुळे प्रायश्चित्त देऊनही त्यांना शुद्ध करता येणार नाही.’ आणि दक्षिणेश्वरच्या मंदिरात श्री रामकृष्ण परमहंसांची जयंती साजरी करण्यासाठी गेल्यावर पुजा-यानी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. म्हणाले, ‘तुमच्याबरोबर यवनी स्त्रिया आहेत!’
अवमानीत, अस्वस्थ विवेकानंदांना त्यावर्षी तो महोत्सव दुसरीकडे जाऊन साजरा करावा लागला.विवेकानंदांनी बेलूर मठ स्थापन केला. मानवी समाज आणि संस्कृती एकत्र आणण्याचा तो प्रयोग होता. तो सर्वांसाठी खुला होता. सभासद होण्यास लिंग, जात, पंथ, धर्म, राष्ट्रीयत्व असा कोणताही अडथळा नव्हता. मात्र बेलूर मठ स्थापन करताना, निम्म्याहून अधिक पैसे, हिंदू मुसलमान समन्वय सांगणा-या या महामानवाला, हिंदू आणि मुसलमानांनी नव्हे, तर हेमरिटा मुल्लर या त्यांच्या अमेरिकन शिष्येने दिले आणि तेथील साधकांची मनोवृत्ती पाहून, नंतर त्यांनी बेलूर मठाकडे कायमची पाठ फिरवली आणि त्या कायमच्या अमेरिकेत निघून गेल्या !
आयुष्यात आपल्याला फार र्मयादित यश मिळाले याची विवेकानंदांना जाणीव होती. त्याचे त्यांनी दिलेले कारण मात्र फार वेगळे आहे. ते म्हणाले, ‘एकच माणूस, एकाच आयुष्यात संघटक, नेता, कार्यकर्ता, खजिनदार आणि दार्शनिक या भूमिका पार पाडू शकत नाही, हे मी शिकलो. मी फक्त हिमालयात बसून ही मांडणी करावयास हवी होती. पण काही हरकत नाही. माझी हाडेही चमत्कार करून दाखवतील.’
हाडे म्हणजे माणसाबरोबर न जळता मागे उरणारे त्याचे विचार. मानवी समाजासमोरच्या त्यावेळच्या आजच्या आणि उद्याच्याही प्रश्नांची मांडणी करत त्यांची उत्तरे सांगत त्या महामानवाचे ते विचार आजही उभे आहेत.- 125 वर्षे मागे पडली आहेत. आतातरी त्या भाषणाच्या आपणच निर्माण केलेल्या भूलभुलैयामधून बाहेर पडून आपण विवेकानंदांचे ते विचार समजावून घेणार आहोत का?
..जेथे वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही!
* स्वामी विवेकानंद ही केवळ 39 वर्षांंची अथक आणि अत्यंत एकाकी धडपड आहे.
* अनेक व्याधींनी शरीर पोखरलेले. त्यांचे विचार समजावून घेण्याची कुवत नसलेला आणि कुवत असेल तर हिंमत नसलेला समाज भोवताली.. अशा अवस्थेतली धडपड !
* 10 जून 1898 रोजी मोहमदानंदांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी लिहिले,
* ‘जेथे वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपणाला मानवजातीला घेऊन जायचे आहे. पण हे काम आपणाला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावे लागेल.’
9 सप्टेंबर 1893अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्म परिषदेत भाषण करताना स्वामी विवेकानंद म्हणाले होते :
‘धर्म, पंथ आणि संप्रदाय यांच्या दुराभिमानापोटी आजवर अनेकवेळा ही पृथ्वी मानवी रक्तात न्हाऊन निघाली आहे. त्यामुळे संस्कृतीचा विनाश झाला आणि कितीएक राष्ट्रे नष्ट होऊन गेली.सार्या जगातून इथे आलेल्या सर्वधर्माच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी आज सकाळी जी घंटा वाजवली गेली, ती सर्व प्रकारच्या धर्मवेडाची मृत्युघंटा ठरेल. लेखणी किंवा तलवार यांच्या साहाय्याने केल्या जाणा-या मानवाच्या सर्व प्रकाराच्या छळाचा तो अंतिम क्षण असेल आणि आपापल्या मार्गाने एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेल्या मानवांपैकी कोणाविषयीही कोणाच्याही मनात कोणत्याही प्रकारचा अनुदार भाव शिल्लक राहणार नाही, असा मला पूर्ण विश्वास आहे.एखादी व्यक्ती वा एखादा विचार पूर्णपणे नाकारण्याचा किंवा बाजूला टाकण्याचा अर्थ व्यक्त करणा-या ‘एक्सक्ल्युजन’ या इंग्रजी भाषेतील शब्दाला संस्कृत भाषेत पर्यायी शब्द नाही. कोणत्याही धर्मात हा शब्द असता कामा नये.ही सर्वधर्म परिषद धर्म वेडेपणाची मृत्युघंटा ठरेल !
(लेखक ख्यातनाम विचारवंत आहेत)
dabholkard@dataone.in