वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी तसेच सामाजिक एकता दृढ होण्यासाठी दिग्रस तालुक्यातील शिवणी येथील ग्रामदैवत श्री आप्पास्वामींना पुरणपोळीचा नैवद्य अर्पण करून तब्बल ५० वर्षाची महापंगत परंपरा कुतूहलाचा विषय बनली असून सुवर्ण महोत्सवी वर्षात वृक्षारोपण चळवळ राबविणार असल्याचा संकल्प युवकांनी केलाय. आर्णी, दिग्रस, दारव्हा या तीन तालुक्याच्या सीमेवर वसलेले आडवळणावरील शिवणी हे छोटंसं गांव . तेथील नागरिक शेती तथा शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरिनर्वाह करतात. त्यांची सारी भिस्त वरु णराजावर असते. पर्यावरणाचे असुंतलन, वृक्षारोपणाचे महत्त्व याबाबत शिवणीकरांना नक्कीच जाणीव आहे. मात्र अनेक वर्षांची पुरणपोळी परंपरा कायम ठेवत गावात सामाजिक एकोपा जोपासत आहे. पावसावर ग्रामस्थांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. गावात सुगीचे दिवस येऊन गावातील शांतता भंग होऊ नये अशी गावकऱ्यांची मनोमन भावना. गावात सद्भावना निर्माण होऊन एकजुटीने पुढे जाण्याचा संकल्प करीत पावसाला प्रसन्न करण्यासाठी शिवणीकरांचे आराध्य दैवत श्री आप्पास्वामींना पुरणपोळीचा नैवद्य दाखवून गावभोजन दिले जाते. आपापल्या परीने गावकरी धान्य, पैसे गोळा करून नियोजन करतात. यामध्ये सर्व जाती जमातीचे लोक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. आबाल वृद्ध मंडळी एकत्र जमतात. मतभेद विसरून सामाजिक एकोपा पाहायला मिळतो. पुरणपोळीची परंपरा तब्बल ५० वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. गावकऱ्यांच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण करणाऱ्या पुरणपोळीची कथा मोठी रंजक आहे. गत ५० वर्षापूर्वी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. दरम्यान शिवणीमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. विहिरी आटल्या होत्या. नागरिकांसह गुराढोरांना देखील पाणी मिळणं दुर्मिळ झालं होतं. मृगाच्या दिवसात पावसाचा थांगपत्ता नव्हता. वरुणराजा रु सला होता. तेव्हा शिवणीकरांनी बैलगाडींच्या साहाय्याने श्री क्षेत्र धामणगाव देव गाठले. संत मुंगसाजी महाराजांकडे साकडे घातले. मुंगसाजी महाराजांनी वरु णराजाला प्रसन्न करणारा देव तुमच्याच गावात असून त्याला पुरणपोळीचा प्रसाद हवा असल्याचे सांगितले. गावकऱ्यांनी परत येताच श्री आप्पास्वामींना पुरणपोळीचा नैवद्य अर्पण केला. सर्व ग्रामस्थांनी एकत्रित स्नेहभोजन केले. आश्चर्याची बाब म्हणजे नेमका त्या दिवशी धो धो पाऊस कोसळला आणि तेव्हापासून पुरणपोळीची प्रथा पडल्याचे वृद्धमंडळी सांगतात. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने पावसाची समस्या निर्माण झाल्याची जाणीव ग्रामस्थांना आहे. पुरणपोळीच्या निमित्ताने गाव एकत्र येते. दरवर्षी शिवणीकर मोठ्या श्रद्धेने पुरणपोळीची महापंगत करतात. सामाजिक एकतेची वीण घट्ट केली गेली. ग्रामस्थ मतभेद विसरून एकत्र येतात. सुख दु:खाचे अनुभव कथन करीत कामाचा ताण हलका करतात. यावर्षी पुरणपोळीच्या सुवर्ण महोत्सव वर्षात गावात वृक्षारोपण चळवळ राबविणार असल्याचा संकल्प युवकांनी केल्याची माहिती सरपंच गजानन इंगळे यांनी दिली. श्रद्धेच्या बळावर शिवणीतील शेतकरी मोठ्या उत्साहाने शेतकामाला लागतो. काबाडकष्ट करीत ईश्वराला प्रार्थना करतो..आभाळागत माया तुझी, आम्हावर राहू दे ..!
- सुनील पु.आरेकर