- सदानंद दाते (प्रमुख, राज्य दहशतवाद विरोधी विभाग) दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी केलेला मुंबईवरील हल्ला मी कधीच विसरू शकणार नाही. तो दिवस, ती रात्र मला अजूनही लख्ख आठवते. रात्री निद्राधीन होण्याच्या तयारीत असतानाच दक्षिण मुंबईत अनेक ठिकाणी गोळीबार झाल्याचे वृत्त कानी आले. मी तडक मलबार हिल पोलिस ठाणे गाठले. तिथून एके-४७ घेऊन सहकाऱ्यांसोबत हल्लेखोरांच्या दिशेने झेपायचे असा मनसुबा होता; परंतु पोलिस ठाण्यात एके-४७ उपलब्ध नव्हती. एकच कार्बाइन होती. ती घेतली आणि सीएसएमटी स्थानकाकडे पथक रवाना झाले.
कामा हॉस्पिटलमध्ये दहशतवाद्यांनी रुग्ण आणि डॉक्टरांना ओलिस धरल्याचे समजले. आम्ही त्या दिशेने चाल केली. ‘कामा’च्या प्रवेशद्वारावरच आम्हाला दोन मृतदेह दिसले. आमच्यापुढे काय वाढून ठेवले आहे, याची जाणीव तिथेच झाली. गोळीबार करणारे प्रसूतिगृह इमारतीच्या छतावर पोहोचल्याने आम्ही लिफ्टने सहाव्या मजल्याकडे निघालो. माझ्याकडे बुलेटप्रूफ जाकीट होते. म्हणून मी सगळ्यात पुढे राहण्याचे ठरविले. तिथूनच आमची आणि दहशतवाद्यांची चकमक सुरू झाली. अर्धवट उघड्या दरवाजाच्या दोन-तीन पावले मागे उभे राहूून मी जिन्यात इलेक्ट्रिक पाइपच्या क्लिप्स टाकल्या. त्याबरोबर आमच्यावर एके-४७च्या गोळ्यांचा भडिमार सुरू झाला. नंतर कसाबच्या चौकशीत कळले की, तो आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल यांनी आमच्या क्लिप्सना हँडग्रेनेड समजून गोळीबार केला होता.
प्रसंग बाका होता. छतावर रुग्ण-डॉक्टरांना ओलिस ठेवलेले अत्याधुनिक शस्त्रधारी दहशतवादी. आणि आमच्याकडे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, कार्बाइन अशी शस्त्रे. असमतोल होता; परंतु परिस्थितीवर मात करण्याचा आम्ही चंग बांधला होता. छताकडून येणाऱ्या जिन्यावर लक्ष ठेवून आम्ही भिंतीचा आडोसा घेतला. एकीकडे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून होतो. तर दुसरीकडे रुग्णालयाच्या छतावरील दहशतवाद्यांचा बीमोड करण्याची शिकस्त सुरू होती.
नियंत्रण कक्षाशी बोलत असतानाच लिफ्टच्या दरवाजावर हिरवा, चेंडूसारखा ग्रेनेड येऊन थडकला आणि माझ्या अगदी समोर त्याचा स्फोट झाला. त्या हँडग्रेनेडच्या स्फोटाने आमचे साथीदार पोलिस उपनिरीक्षक मोरे शहीद झाले, इतर सर्वच जण जखमी झाले. माझ्याही डोळ्यांत, गळ्याशी, चेहऱ्यावर ग्रेनेडच्या स्प्लिंटरच्या जखमा झाल्या. डोळ्यांतल्या जखमेने कही क्षण माझ्यासमोर अंधारी आली. त्यातून सावरून मी छताच्या दिशेने गोळीबार करून भिंतीचा आडोसा पकडला. ही चकमक पुढची सुमारे ४०-४५ मिनिटे चालली. त्यांनी फेकलेला पाचवा ग्रेनेड माझ्या अगदी जवळ, पायापाशीच फुटला. मला जाणवलेली सर्वांत वेदनादायी जखम या ग्रेनेडमुळे झाली. काही वेळ त्या आवाजाच्या आणि जखमेच्या धक्क्याने मला ग्लानी आली. या दहशतवादी हल्ल्यात आमचे अनेक साथीदार शहीद झाले; मात्र त्या रात्री मुंबई पोलिसांनी दाखविलेल्या कर्तव्यनिष्ठेचा आणि बहादुरीचा मला अभिमान आहे. (‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ या सदानंद दाते यांच्या पुस्तकातून साभार)