प्रा. डॉ. द. ता. भोसले
बारावीच्या वार्षिक परीक्षेला साधारणत: एकच महिना राहिला होता. तसे सर्वच वर्गांचे तास संपत आले होते. पदवी परीक्षेचे तास मात्र थोड्याफार प्रमाणात चालू होते. त्यामुळे सारा प्राध्यापक वर्ग मोकळा होता आणि तास नसल्याने आनंदी होता. सर्वच मुले आपल्या अभ्यासात गुंतली होती. आम्ही तीन-चार प्राध्यापक कॉलेजच्या कँटिनमधून चहा घेऊन स्टाफरूम समोर असलेल्या छोट्याशा बागेत विसावलो होतो. गप्पा चालल्या होत्या.
तेवढय़ात खिन्न चेहरा असलेला एक विद्यार्थी आमच्या जवळ आला नि तितक्याच खिन्न शब्दांत म्हणाला, ‘‘सर, मी एक विनंती करायला आलोय. कृपा करून माझी अडचण दूर करा. मला माझी बारावीची परीक्षा होईपर्यंत आपल्या ग्रंथालयातून पुस्तके देता आली, तर बघा. फार उपकार होतील सर.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘अरे बाळा, जून-जुलैमध्येच आपण प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व विषयांचा एक पुस्तक संच वर्षभर वापरण्यासाठी मोफत देत असतो. तो तुला मिळाला नाही का? आणि नाव काय तुझे? कुठला तू?’’ तो अपराधी सुरात म्हणाला, ‘‘सर माझं नाव चंदू.’’
आम्ही भटक्या-जाती जमातीतल्या मसणजोगी जातीचे. पोटाच्या पाठीमागे भटकत भटकत येथून वीसएक मैलांवर असलेल्या गावात राहतो. माझं दुर्दैव असं, की माझा बाप मला खूप छळतो. मला गुरासारखा मारतो. उपाशी ठेवतो. मला तो दुसरा राक्षसच वाटतो.’ त्याला मध्येच थांबवत शेजारी बसलेले प्राध्यापक म्हणाले, ‘‘अरे, काय सांगतोस तू? कोणतेही आईबाप आपल्या मुलासाठी जीव गहाण टाकतात. स्वत: उपाशी राहून लेकराला घास घालतात. आपल्या पोराच्या सुखासाठी धडपडतात अन् तू हे काय सांगतोस?’’ क्षणभर तो थांबला, नंतर गदगदलेल्या कंठानं तो सांगू लागला, ‘‘सर, सांगायला लाज वाटते; पण सांगतो ते खरे आहे. माझा हा बाप आहे सावत्र.’’
मी चौथी-पाचवीत असताना माझ्या आईबरोबर लगीन केलं यानं. केलं म्हणण्यापेक्षा आईवर दडपण आणून बळजबरी करून त्यानं स्वार्थ साधला. त्याचीही पहिली बायको याच्या मारपीटीला वैतागून पळून गेली होती. हा माझा बाप आहे ऐतखाऊ. आईच्या मजुरीवर हा जगतो. दारू पिऊन धिंगाणा घालतो. आईलाही मारतो. आईच्या पहिल्या नवर्यापासूनचा म्हणून माझा राग राग करतो. मला बघितले, की त्याला माझ्या बापाची आठवण येते. अन् तो राग माझ्यावर काढतो. रात्र रात्र त्यानं मला घराबाहेर काढले आहे. मी शिकतो याचा त्याला आणखी राग. मी शाळा सोडावी, मजुरी करावी, असं त्याचं मत. आपल्या जातीत कोण शिकलंय का? शाळेत जाणे आमच्या लोकांना मान्य नाही. तो गुन्हा वाटतो.
आमच्या समाजातली म्हातारी माणसं मी शिकू नये, म्हणून दमदाटी करतात. मी त्यांचं बिलकूल ऐकत नाही. सर, मला खूप शिकायचं आहे. खूप खूप शिकायचं आहे. आमच्या मूर्ख चालीरीती आणि परंपरा यांच्या दलदलीतून बाहेर पडायचं आहे. माझ्या आईला सुखाचा घास घालायचा आहे.’ चंदूंचं हे महाभारत ऐकूण आम्ही सारेच व्यथित झालो आणि त्याची शिकण्याची जिद्द पाहून आनंदितही झालो. बारावीत असणारा म्हणजे, सोळा-सतरा वर्षांचा हा मुलगा. ओठ पिळला तर दूध निघेल, असं त्याचं वय; पण या वयातही त्याची समज, त्याची जिद्द आणि झुंज मला मोठी कौतुकाची वाटली. मोठी अपवादात्मक वाटली. इतर प्राध्यापकांनीही हीच भावना व्यक्त केली. माणसावर कोसळणारी संकटे त्याला नामोहरम करीत नाहीत, तर त्याला पुरुषार्थ शिकवितात, हे या चंदूनं दाखवून दिल्याने मला त्याच्याविषयी अपार सहानुभूती वाटली. न राहवून मी त्याला विचारले, ‘‘अरे चंदू, तुला बारावीची पुस्तके कशासाठी हवीत, हे सांगितलेच नाही आम्हाला?’’ तेच सांगणार आहे सर, घडलेली गोष्ट अशी, की गेल्या आठवड्यात या माझ्या बापानं दारू प्यायला आईकडे पैसे मागितले. तिच्याकडे काहीच शिल्लक नव्हते. असणार तरी कसे म्हणा? तिच्या मजुरीमुळे कशी तरी एकवेळ चूल पेटते. आईने नकार देताच बाप संतापला. रागानं म्हणाला, ‘या तुझ्या हरामखोर पोराच्या बससाठी तुझ्याकडे पैसे असतात. त्याच्या कपड्यासाठी तुझ्याकडे पैसे असतात. पुस्तकं घ्यायला पैसे असतात, अन् मला देताना मात्र जिवावर येतं तुझ्या. मला माहीत नाही. तू मला प्यायला पैसे दे. नाहीतर मी याची सारी पुस्तकं विकून टाकतो. म्हणजे त्याचं शिकणंही थांबेल आणि माझंही काम होईल.’ असं म्हणून त्यानं चक्क सारं दप्तरंच उचललं. आईनं विरोध केला. मी दप्तरासाठी झोंबाझोंबी केली. बापाचे पाय धरले; पण त्याला दया आली नाही. उलट आईला लाथा घातल्या. माझ्या मानेवर कोयत्यानं वार केला. मरता मरता वाचलो मी. एवढं करून तो थांबला नाही. त्यानं मला घराबाहेर हाकललं आणि ‘पुन्हा जर तोंड दाखवायला आलास, तर तुझी खांडोळी करतो,’ असा दम दिला.
आठ दिवस झाले घर सोडून. सध्या मी एसटी स्टँडवरच राहतो. तिथेच मिळेल ते खातो. तिथेच झोपतो; पण परीक्षा तोंडावर आली असताना झोपही लागत नाही. परीक्षा संपेपर्यंत मला पुस्तके द्या. एसटी स्टँडच्या उजेडात मी अभ्यास करीन. आणि परीक्षा संपली, की पुस्तके परत करीन. माझ्यासाठी तुम्ही एवढी कृपा करा आणि परीक्षा संपल्यावर मजुरी करून बापानं विकलेल्या पुस्तकांची रक्कम मी परत करीन. अगदी दंडासह सारे पैसे मी कॉलेजला भरीन. माझं हे वर्ष वाया जाऊ नये म्हणून मी अगदी कळकळीची विनंती करतो सर.’ आणि तो अनावर झालेल्या दु:खानं रडू लागला. त्याला हुंदके आवरता आवरेनात.
त्याची ही स्थिती पाहून आम्हा चारही प्राध्यापकांचे डोळे पाणावले. एक जण म्हणाला, ‘काय भोगतोय हा पोरगा? कसलं नशीब म्हणावं याचं?, पुढे होऊन मी त्याला प्रेमानं थोपटलं. दुसर्यानं त्याचा हात घेऊन सहानुभूती व्यक्त केली. त्याला आम्ही चौघांनी कँटिनला नेऊन थोडेसे खाऊ घातले आणि आम्हा चौघांच्या वतीने मी म्हणालो, ‘चंदू, तू आता तुझा सारा भूतकाळ विसरून जा. तुला अभ्यासाची सारी पुस्तके तर देऊ च; पण प्राचार्यांनी भेटून तुझी वसतिगृहात सोय होते का ते पाहू. शिवाय इथून पुढे तुला लागणारी सारी मदत आम्ही चौघे जण देऊ .
कॉलेजही तुझ्या पाठीशी राहील. तू एकाच वेळी चार आघाड्यांवर लढतोस, याचा मला आनंदही होतो आणि अभिमानही वाटतो आहे. बुरसटलेल्या आणि नासलेल्या सामाजिक रूढी-परंपरेविरुद्ध तू लढतो आहेस, पायात साखळदंड, हातात बेड्या आणि पाठीवर प्रहार करणार्या नियतीच्या विरुद्ध तू लढतो आहेस, मरणाच्या दारात घेऊन जाणार्या भीषण परिस्थितीशी तू लढतो आहेस आणि गिळून टाकणारी भूक आणि न संपणार्या दारिद्रय़ाविरुद्ध तू झुंज घेतो आहेस. ते ही हातात कुठलेली शस्त्र नसताना. सत्ता, संपत्ती आणि सावलीचा अभाव असताना. शिक्षणावरील अभंगनिष्ठा तर तुझ्या जगण्याची ऊर्जाच झाली आहे. समाज व्यवस्थेने ओवाळून टाकलेला एक कोवळा पोरगा एकाच वेळी चार आघाड्यांवर लढून झालेल्या जखमांना फुले मानतो. या सारखी अभिमानाची व आनंदाची दुसरी गोष्ट नसेल. तू आमच्याबरोबर पुस्तकांसाठी ग्रंथालयात चल. तुझ्याबरोबर आम्हालाही तीर्थक्षेत्राला जाण्याची ओढ लागलेली आहे.’’
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व नवृत्त प्राचार्य आहेत.)