- सुलक्षणा वऱ्हाडकरमाझ्या रोजच्या वाटेवर पार्किंग लॉटमध्ये एक व्हॅन मला दिसली. ब्राझिलचे नवीन प्रेसिडेण्ट माझ्या कॉलनीत राहत असल्याने आणि त्यांच्यावर प्रचारादरम्यान खुनी हल्ला झाल्याने आमच्या विभागात सुरक्षितता वाढलेली आहे. अशात एक जुनी पुरानी व्हॅन पाहून मी कानोसा घेण्याचा प्रयत्न केला.सकाळचे ७ वाजले होते. व्हॅनमध्ये एक देखणं जोडपं होतं. देखणा पुरुष कॉफी बनवत होता आणि त्याची तेवढीच सुंदर बायको (म्हणजे मी गृहीत धरलंय ती बायको असणार असं) सॅण्डवीच बनवत होती.मी ‘बोन जिया’ म्हटल्यावर दोघांनीही तोंड भरून ‘बोन जिया सिनोरा’ म्हटलं आणि दक्षिण अमेरिकेतील अत्यंत मोकळ्या मैत्रिपूर्ण संस्कृतीनुसार आमच्या गप्पा चालू झाल्या.‘चाय पे चर्चा’ अर्थात पोर्तुगीजमध्ये ज्याला कॅफेझिनो म्हणतात तशा गप्पा सुरू झाल्या. मी त्यांच्या घरात पाहुणी असल्याने मला कॉफीचा पहिला कप मिळाला. बसायला फुटपाथचा कट्टा होताच. त्यादिवशी मी नेमका कधी नव्हे तो सलवार सुट घातला होता. रिओमध्ये क्राइमरेट खूप जास्त असल्याने शक्यतो स्थानिक नागरिकांसारखे कपडे घालण्याकडे माझा कल असतो. आॅफिसमधून तसा इशारेवजा सल्लाही नेहमी दिला जातोच.माझ्या ड्रेसमुळे माझी भारतीय असल्याची एथनिक आयडेण्टिटी डिझाइन झालीच होती. त्यामुळे त्या देखण्या पुरुषाने ज्याचं नाव लिओनार्दो (अर्थात लिओ), त्याने मला एक प्रश्न विचारला. त्याच्या पाठीवर ‘शेष विश्वास, स्वातंत्र्य’ असं मराठीत लिहिले होते. त्याला त्यातील शेषचा नेमका अर्थ हवा होता.मी माझ्या परीने इंग्लिश, पोर्तुगीज आणि स्पॅनिशमध्ये त्याला तो अर्थ समजावला.लिओ आणि त्याची बायको फ्लोरेन्स माझ्याशी गप्पा मारायला लागले. ते दोघे आपापसात स्पॅनिश बोलत होते. माझ्याशी इंग्लिश-पोर्तुगीज मिक्स. त्याचं इंग्लिश खूप चांगलं नव्हतं. ब्राझिलमध्ये तसेही इंग्लिश हाताच्या बोटावरील काही टक्क्यापर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे लिओला त्यामानाने खूप इंग्लिश समजत होते.सकाळी ब्रेकफास्टची वेळ असल्याने त्यांनी त्यांच्या सोबत माझ्यासाठीही सॅण्डवीच बनवले. त्यांच्या त्या पिटुकल्या चार चाकांवरच्या संसाराकडे मी खूप कुतूहलाने पाहत होते.जुनाट अशी मिनी व्हॅन होती ती. जर तुम्ही नियमित दक्षिण अमेरिकेतील मालिका पाहत असला तर ह्या संस्कृतीत चारचाकी गाडी किंवा अशा जुनाट व्हॅनचे सांस्कृतिक, सामाजिक महत्त्व समजू शकेल. गरिबातल्या गरिबाकडेही अशी जुनाट गाडी असतेच असते. लिओ आणि फ्लोरेन्सच्या गाडीत आणखी बरेच काही होते. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं म्हणत लिओने त्यात फोल्डिंग बेड, डायनिंग टेबल, सिंक, लायब्ररी, स्टोरेज, ड्रेसिंग रूम, कचराकुंडी, म्युझिक सिस्टीम, पडदे.. अशा अनेक सोयी केल्या होत्या.एखाद्या कलाकाराप्रमाणे मिनिमिलिस्टिक संकल्पनेनुसार संसाराचा गाडा (की गाडी?) सजवली होती. मी पत्रकार आहे असं समजल्यावर लिओने मला काही स्पॅनिश पुस्तकं सुचवलीत. त्याच्या खासगी लायब्ररीतील पुस्तके दाखवलीत. त्यांचं वारंवार (पोर्तुनॉल) म्हणजे पोर्तुगीज आणि स्पॅनिशमिश्रित बोलणं पाहून मला ते ब्राझिलच्या सीमा भागातील वाटले होते. अख्ख्या दक्षिण अमेरिकेत स्पॅनिश राजवट होती; परंतु ब्राझिलमध्ये पोर्तुगीज, त्यामुळे ब्राझिलव्यतिरिक्त इतर दक्षिण अमेरिकन देश स्पॅनिश बोलतात. मात्र सीमा भागातील काही प्रदेशात ‘पोतुनॉल’ बोलले जाते. यात साहित्यसुद्धा उपलब्ध आहे.लिओ म्हणाला, ते दोघे अर्जेंटिनाहून ब्राझिलला आले होते. दशकभरापासून इथलेच झाले. इंटरनेट, इन्स्टाग्राममुळे तिथली नाळ अजून आहे. पण ब्राझिलच त्यांची कर्मभूमी आहे. हातातले ब्रेसलेट डिझाइन करणारी फ्लोरेन्स इन्स्टाग्रामवरसुद्धा अॅक्टिव्ह आहे.ब्राझिलच्या वेगवेगळ्या समुद्रकिनारी ह्या गाडीतून दोघे प्रवास करत असतात. एखादं शहर स्वस्त असेल तर दहा-पंधरा दिवसांसाठी लहानसं घर भाड्यानं घेतात. नाहीतर मोठ्या शहरांमध्ये पार्किंग लॉटचे पैसे भरून व्हॅनमध्येच राहतात.त्या दोघांकडे पाहून मला क्षणभरही असं वाटलं नाही की ते होमलेस किंवा बेघर आहेत. याला ब्राझिलची संस्कृतीही कारणीभूत आहे. ट्रॉपिकल हवामानामुळे इथे अगदी गरिबातील गरीबही दिवसातून दोनदा अंघोळ करतो. समुद्रकिनारी शॉवर असतात. काही नाही तर समुद्राच्या पाण्यात डुबकी मारली जाते. प्रत्येक खाण्यानंतर इथे दात घासले जातात. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहात ब्राझिलियन्स नेहमी दात घासताना दिसतात. टापटीपपणा, निटनेटकेपणा, तब्येतीची काळजी घेणे ही इथली संस्कृती आहे.लिओ, फ्लोरेन्सकडे पाहताना, त्यांच्याशी बोलताना मला जाणवत होते की, एकीकडे घरासाठी वणवण फिरणारे किंवा मजल्याचे घर बांधण्यात हयात घालवणाऱ्या भारतीय लोकांची मानसिकता आणि ‘आपल्याला वटवृक्षासारखी मूळं थोडीच असतात एका जागी घट्ट रोवून उभं राहण्यासाठी, आपल्याला देवाने पाय दिलेत भ्रमण करण्यासाठी, जगाच्या शाळेत प्रत्यक्ष शिकण्यासाठी’ असं म्हणणारा लिओ.अर्जेंटिना सोडून ब्राझिलला आपलं घर मानणारा बंजारा लिओ आणि फ्लोरेन्स तर मुंबई सोडून पंधरा हजार किलोमीटर दूरवर असलेल्या रिओमध्ये स्वत:ची ओळख घडवणारी जातीच्या प्रमाणपत्रावर बंजारा असणारी मी, मला एकाच तालासुराचे वाटलो.‘भक्कम मुळं जखडून ठेवतात, फुलायला वाव देत नाही’ म्हणणारा लिओ आणि त्याच्याकडे कौतुकाने पाहत त्याला अनुमोदन देणारी फ्लोरेन्स; दुसऱ्या भेटीत मला तिने बनवलेले ब्रेसलेट देत होती. मी तिच्यासाठी गणपतीचा एक फोटो नेला होता.आज संध्याकाळी पुन्हा एकदा त्यांना ‘तूदो बीम?’ म्हणजे कसं काय विचारण्यासाठी मी पार्किंग लॉटमध्ये गेले, तर सिक्युरिटी म्हणाला, ते तर गेलेत! तुम्हाला विचारत होते!..(रिओ, ब्राझिलस्थित लेखिका मुक्त पत्रकार आहेत)
manthan@lokmat.com