- विश्वास पाटील
70च्या दशकात प्रदर्शित झालेल्या आणि मराठी माणसावर गारुड करणा:या ‘पिंजरा’ चित्रपटाचं नव्यानं डिजिटलायजेशन करण्यात आलं असून, नव्या रंग-रूप आणि तंत्रचा साज चढवलेला हा चित्रपट 18 मार्च रोजी पुनप्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त डॉ. श्रीराम लागू यांच्याशी झालेल्या गप्पांचा हा वानोळा.
कोण, कोण हे डॉ. श्रीराम लागू? माङया ‘पिंजरा’ चित्रपटातील श्रीधर मास्तरांची केवढी ती दमदार अन् तगडी भूमिका ! त्याच्यासाठी कोणाही नवख्या नटाचे नाव सुचविण्याचे धाडस तुम्ही करताच कशाला? बरे, या डॉक्टरांनी आजवर सिनेमाच्या पडद्यावर अध्र्या मिनिटाचेही काम केलेले नाही, अन् अशा अभिनेत्याला मी आदर्श श्रीधर मास्तरांची पर्वतप्राय भूमिका द्यायची ती कशासाठी? कसे शक्य आहे ते? शांतारामबापू आपल्या नायकाच्या निवडीबाबत जाम गोंधळात पडले होते. त्याच्या आठवणी स्वत: डॉक्टर आम्हाला सांगत होते.’
‘पिंज:याच्या’ निर्मितीच्या ऐन धुमाळीतील ते दिवस. सिनेमाचे भव्य कथानक अन् त्यातला पॅथोस समजून घेताना शांतारामबापूंचे अनंत माने, शंकर पाटील आणि जगदीश खेबूडकर या तिघांशी ब्रेनस्टॉर्मिग सुरू होते. श्रीधर मास्तर म्हणजे एक आदर्श, कणखर आणि हि:यासारखा अभेद्य वृत्तीचा कठीण कर्मवीर.
पण तो एका मोहाच्या क्षणी एका तमासवालीच्या पदराच्या सावलीत विरघळून जातो. ध्येय अन् आदर्शाच्या उंच शिखरावरून त्याची घसरण होते अन् अक्षरश: तुणतुणं वाजवत तमाशाच्या बोर्डावर उभे राहण्याचे विपरीत जिणो त्याच्या वाटय़ाला येते. अशा या जबरदस्त भूमिकेसाठी मराठीतील तमाम श्रेष्ठ अभिनेते एकीकडे देव पाण्यात घालून बसले होते. मात्र त्याच वेळी वत्सलाबाई देशमुख आणि मानेंसारखी मंडळी डॉ. लागूंसारख्या नवख्या नटाचे नाव सुचवित होते. त्या आठवणी सांगताना डॉक्टर हळूच सांगतात, ‘त्या दिवसांत शांतारामबापू तथा अण्णासाहेब एकदा चक्क नाटय़गृहात आले. माझी ‘नटसम्राट’मधील भूमिका पाहून गुपचूप परस्पर निघून गेल्याचेही मला कोणीतरी मागाहून सांगितले. त्यामुळे मी अधिकच गोंधळात पडलो. शांतारामांच्या त्या गुप्त परीक्षेत मी उत्तीर्ण झालो की नाही तेही कळेना.’ मात्र त्यानंतर काही दिवसांतच डॉक्टरांना परळच्या राजकमल स्टुडिओत बोलावणो आले अन् अभिनय आणि दिग्दर्शन या दोन क्षेत्रतील जिवाशिवाची भेटच एकदा घडून आली. त्या भेटीनेच पुढे उत्तुंग ङोंडे फडकावले. आता चव्वेचाळीस वर्षाच्या दीर्घ अंतराने ‘पिंजरा’ पुन्हा प्रदर्शित होतोय. श्रीधर मास्तरांची मायमराठीतील प्रत्येक गावात, घराघरात आणि प्रत्येकाच्या दिलात जाऊन पोचलेली ती व्यक्तिरेखा.
‘पिंजरा’च्या कथानकाने एकाअर्थी अनेक जागतिक विक्रम निर्माण केले आहेत. मराठी मावशीचा मोरू हा तिचा जसा स्वत:चा नाही, तसेच मायमराठीच्या हृदयात कोंदण करणारे श्रीधर मास्तरही इथले नव्हेत. हेन्रीच मान नावाच्या जर्मन लेखकाने ‘प्रोफेसर उनरंट’ नावाची कांदबरी लिहिली. त्यावरुन जोसेफ वॉर्न स्टर्नबर्ग या प्रतिभावंत दिग्दर्शकांने ‘ब्ल्यू एंजेल’ नावाचा जर्मन चित्रपट 1929 मध्ये बनवला. तो पहिला जर्मन बोलपट. हॉलिवूडच्या उत्तुंग नायिकांमध्ये जिचा पुढे समावेश झाला ती मर्लिन डेट्रीईच या अभिनेत्रीचासुद्धा ‘ब्ल्यू एंजेल’ हा पहिला सिनेमा. तसेच मराठीत सप्तरंगांची दुनिया घेऊन येणारा पहिला चित्रपट म्हणजेच हा ‘पिंजरा’.
यानिमित्ताने डॉक्टरांच्या भेटीसाठी मी एक वेगळाच नजराणा सोबत घेऊन गेलो होतो. पिंजराच्या प्रिंटशी झटापट करून, आधुनिक तंत्रविद्येचा वापर करून संदेश घोसाळकर या गुणी छायाचित्रकाराकडून मी एक खास अल्बम बनवून घेतला होता. तो पाहून डॉक्टरसाहेब हरवून आणि हरखून गेले. पिंजरा घडत असताना डॉक्टरांचे वय किती होते असा प्रश्न मी केला. तेव्हा डॉक्टर हसून म्हणाले, ‘43 वे वर्ष. त्याच वर्षी इकडे पिंज:यातले आदर्श मास्तर आपले कठोर ब्रrाचर्य सोडून देतात आणि त्याच वर्षी मी दीपाशी विवाहबद्ध झालो होतो.’
त्या मंतरलेल्या दिवसांच्या आठवणी जागवताना डॉक्टर कमालीचे हळवे झाले होते. निळू फुलेंसारख्या सेवादलातून आलेल्या मित्रंच्या आठवणींचा ओघ एकीकडे संपत नव्हता. दुसरीकडे ‘पिंजरा’च्या निमित्ताने व्ही. शांताराम नावाच्या श्रेष्ठ दिग्दर्शकांच्या जादूई व्यक्तिमत्त्वाची आठवणसुद्धा डॉक्टरांना येत होती. ‘पिंजरा’ हे शीर्षक तसे नाटकी आणि भडक. डॉक्टर नाराजीने त्याची खिल्लीही उडवायचे. पण डॉक्टर सांगतात, ‘सिनेमा जसजसा घडत गेला, त्याचा एक एक पदर उलगडत गेला तसा त्या शांताराम नावाच्या प्रतिभावंताच्या पिंज:यात मी स्वत: बंदिवान झालो की हो!’
बापूंची आणि डॉक्टरांची पहिली, म्हणजेच सलामीची जी थेट भेट झाली होती ती अवघी अध्र्या तासाची असेल नसेल. पण डॉक्टर सांगतात, ‘तेवढय़ा कमी वेळात अण्णासाहेबांनी आपल्या दिग्दर्शकीय हुकूमतीचं असं गारुड घातलं की, मी एखाद्या भारलेल्या प्राण्यासारखा त्या बैठकीतून बाहेर पडलो. एखाद्या मनुष्याला आंतरबाह्य पकडण्याची विलक्षण ताकद त्या जादूगारामध्ये होती. शांताराम नावाच्या अवाढव्य जाणिवेच्या माणसानेच माङयातला नट जागा केला.’ पिंजराचे चित्रीकरण कोल्हापूरच्या रम्य परिसरात घडले. शूटिंग सुरू असताना एके दिवशी दुर्दैवाने सिनेमाचा सारा कपडेपट चोरीस गेला. चित्रीकरण मध्येच थांबले. त्याच रंगवाणाचे कपडे शोधण्यासाठी धावपळ उडाली. परंतु त्या ऐन संकटातही बापूंचे वर्तन एखाद्या स्थितप्रज्ञाला लाजवील असेच होते. शांतारामांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना डॉक्टर सांगतात, ‘कोणापुढे नतमस्तक होण्याची वृत्ती माङयाकडे नाही. उभ्या जीवनामध्ये फारतर चार किंवा पाच व्यक्तींच्या पाऊलांचे मी दर्शन घेतले अन् त्यातील एक व्यक्ती म्हणजे अण्णासाहेब तथा शांताराम बापू.’
- शंभराहून अधिक वेळा मी पिंजरा पाहिला आहे. तरीही त्याची माङया मनावरची मोहिनी आटलेली नाही. आजही मला वाटते ‘पिंजरा’चा पूर्वार्ध पाहावा तो खेबुडकरांच्या जादुभ:या शब्दांसाठी, उषा मंगेशकरांच्या ठसकेदार लावण्यांसाठी आणि राम कदमांच्या जादुभ:या लोकसंगीतासाठी. मात्र ‘पिंजरा’चा उत्तरार्ध पुन्हा पुन्हा पाहावा तो व्ही. शांताराम नावाच्या महान दिग्दर्शकाच्या विलक्षण कसबासाठी आणि डॉ. लागूंच्या जबरदस्त अभिनयासाठी.
‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’ या गीताच्या वेळी महान दिग्दर्शक आणि तितक्याच महान अभिनेत्याने एकापाठोपाठ एक उत्कर्षबिंदू गाठले आहेत. आपली अध:पतनाच्या वाटेवरची भूमिका साकारताना हाती तुणतुणो घेतलेले डॉक्टर झुकून उभे आहेत. सुरुवातीला बापूंच्या लाँग शॉटमध्ये डॉक्टरांची डगमगती पाऊले दिसतात. हळू हळू लाँगशॉटवरून कॅमेरा मिडशॉट आणि शेवटी टाईट व क्लोजअपवर जातो. कॅमे:याच्या गतीबरोबर डॉक्टर देहबोलीही बदलत राहतात. आरंभी झोकांडय़ा देणारे त्यांचे शरीर पुढे गदगदून जाते. अन् शेवटी टाईट क्लोजअपमधले डॉक्टरांचे भावभरे, अश्रूंनी डबडबलेले बोलके डोळे काळजाचा ठाव घेतात.
जन्मभरी फसगत झाली तिचा हा तमाशा
जळुनिया गेली देवा जगायची आशा
आज हुंदक्याने भैरवी मी गायली
या ओळी गाताना डॉ. लागू आपल्या विलक्षण अभिनय सामथ्र्याने आपली भूमिका एका उत्तुंग टोकावर घेऊन जातात, तेव्हा एका आदर्श जिवाची झालेली ती परवड पाहून रसिकांच्या काळजाचा ठोका चुकतो. हाच ‘पिंजरा’ नव्या रूपात आता येतो आहे. प्रसाद लॅबने पिंजराच्या प्रत्येक फ्रेममध्ये नव्याने रंग भरले आहेत. अविनाश-विश्वजित या संगीतकार जोडीने रामभाऊंच्या प्रत्येक लावणीला नव्या तंत्रने प्रोग्रॅमिंग करून लाइव्ह म्युझीकचा साज चढवला आहे. पण हे करताना जुन्या गोडव्याला धक्का न देता त्याची लज्जत अधिक वाढवली आहे. 5.1 च्या तंत्रने मल्टीप्लेक्सच्या भव्य थिएटरमधून रामभाऊंची गाणी नव्याने गुंजून उठणार आहेत.
डॉ. श्रीराम लागूंनीही जाहीर केले आहे, ‘नव्या तंत्र-मंत्रने येणारा ‘पिंजरा’ प्रेक्षकांत बसून बघायला मी आतुर झालो आहे.’
(लेखक प्रख्यात साहित्यिक आहेत.)
authorvishwaspatil@gmail.com