- सेवादास दलिचंद ओसवाल
(संघपती, जळगाव)
भगवान महावीर यांचा कार्यकाळ २५०० वर्षांपूर्वीचा मानला जातो. कुंललपूरच्या (बिहार) राजघराण्यात जन्मलेल्या महावीर यांनी वयाच्या ३० व्या वर्षी सन्यस्थ व्रत स्वीकारले. आत्मकल्याण करण्यासाठी जैन दीक्षा घेऊन ते एक तपस्वी बनले. त्यानंतर आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी साडेबारा वर्षं तपश्चर्या केली. सुख-सुविधा त्यागून आत्मा आणि शरीर यातला संबंध ते शोधू लागले.
शरीर आणि आत्मा वेगवेगळे आहेत. आत्मा अजर-अमर-अविनाशी आहे. कर्म करण्यासाठी शरीर महत्त्वाचे आहे. पण शरीर नाशवंत असून ते फक्त माध्यम आहे, असा मुक्तीचा साधा-सोपा उपदेश महावीर यांनी समस्त मानव समाजाला केला.
भगवान महावीर यांना त्रिलोकांचे कैवल्य ज्ञान प्राप्त झाले. चांगला समाज निर्माण करण्यासाठी, समाजकल्याणासाठी महावीर यांनी ज्ञान प्रसारणाचे अविरत कार्य केले. समाजावर आणि माणसांवर प्रेम करा असा संदेश देण्यासाठी महावीर देशभर फिरले. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अचौर्य आणि अनेकांत या सहा तत्त्वांचा प्रसार त्यांनी केला. यातील अहिंसा हे तत्त्व संपूर्ण विश्वाने स्वीकारले. स्व-स्वार्थासाठी दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देणे म्हणजे अहिंसा होय. आपल्या शरीराला किंवा मनाला जशा वेदना होतात त्या इतरांनाही होत असतील याची जाणीव होणे म्हणजेच अहिंसेचा स्वीकार करणे.
प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये हाच अहिंसा तत्त्वाचा भावार्थ आहे. सध्या होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास, नातेसंबंधामधील कटुता, अति लोभ हे प्रसंग अहिंसा तत्त्वाचा अंगीकार केल्यास नक्की टाळता येऊ शकतात. या तत्त्वाला अनुसरून प्रत्येक व्यक्तीने त्याच्याजवळ जे आहे ते समाजासाठी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गरीब दुर्बल व्यक्तींना दोष न देता त्यांच्या उत्थानासाठी सदैव प्रयत्न केले पाहिजेत. काहीही झाले तरी सत्य हे सत्य असते, ते थोडे कटू असते, मात्र ते गोड होऊ शकते हेच अहिंसा तत्त्वाचे सार मानायला हवे.
सत्याची कधीही अवहेलना करू नये. कोणाचीही, कोणत्याही प्रकारे फसवणूक करणे म्हणजे चोरी करणे. असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला त्याचे फळ इतर कोणत्याही रूपाने मिळत असते. सभोवतालचे वातावरण कसेही असले तरी मनावर नियंत्रण पाहिजे.
अपरिग्रह म्हणजे आपल्या मेहनतीने आणि प्रारब्धाने जे मिळाले त्याचा अहंकार न बाळगता आपल्या सोबत असलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांनाही प्रगतीसाठी संधी देणे. अपरिग्रहामध्ये आपल्याला मिळालेल्या संपत्तीमधून कायम समाजासाठी देण्याची भावना अभिप्रेत आहे. थोडक्यात अनीतीने पैसा न कमाविणे म्हणजे अपरिग्रह होय.
प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक बाबतीत आपले मत हे अंतिम सत्य आहे असे न मानता इतर व्यक्तींचेही मत विचारात घेऊन त्यावर उपाय काढणे, विषय सोडविणे यालाच अनेकांत म्हणतात. विचारांमध्ये लवचीकता असली पाहिजे तसेच प्रत्येक व्यक्तीचे मत महत्त्वाचे असल्याने तेही विचारात घेणे अनेकांत या तत्त्वामध्ये अभिप्रेत आहे.
- महावीर भगवान यांच्या तत्त्वांचा अंगीकार करणारा वर्तनाने सज्जन व भावनेने सहृदयी होतो. या गुणांकडे जाण्याचा मार्ग महावीर आपल्या उपदेशातून करतात.