शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
4
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
5
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
6
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
7
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
8
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
9
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
10
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
11
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
12
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
13
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
14
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
15
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
16
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
17
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
18
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
19
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
20
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील

‘अजिंक्य डोंबिवलीकर’ होऊन रहाणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 6:01 AM

रहाण्यांचा अजिंक्य डोंबिवलीचा, रोहित शर्माही मूळचा डोंबिवलीकरच! सच्चा डोंबिवलीकर चपळ, चिकाट, आक्रमक असतोच, म्हणजे त्याला असावेच लागते!

ठळक मुद्देवेगाने रेल्वे स्थानकात शिरणाऱ्या लोकलमध्ये अचूक उडी ठोकून विंडोसीट पकडतो तो सच्चा, कडवा डोंबिवलीकर. फलाट दिसेपर्यंत ‘छशिमट’हून पकडलेली सीट न सोडण्याची चिकाटी अंगी असते तोच डोंबिवलीकर.

- संदीप प्रधान

भरधाव वेगाने रेल्वे स्थानकात शिरणाऱ्या लोकलमध्ये अचूक उडी ठोकून विंडोसीट पकडतो तो सच्चा, कडवा डोंबिवलीकर. फलाट दिसेपर्यंत ‘छशिमट’हून पकडलेली सीट न सोडण्याची चिकाटी अंगी असते तोच डोंबिवलीकर. शेजारच्या सहप्रवाशाचा खांदा ही आपल्याला मिळालेली जहागिरी आहे, असे मानून प्रवासात त्यावर डोके ठेवून बिनघोर झोपून आपला निद्रा अनुशेष भरून काढतो, तोच आक्रमक डोंबिवलीकर!- त्यामुळे चपळता, चिकाटी, आक्रमकता हे डोंबिवलीकरांचे अंगभूत गुण असून, क्रिकेटच्या मैदानावर याच गुणांची प्रकर्षाने गरज असते. त्यामुळेच डोंबिवलीकर अजिंक्य रहाणे याच्या कप्तानीतील भारतीय क्रिकेट संघाने कांगारूंना त्यांच्याच मैदानात अक्षरश: गडबडा लोळविले. संघाचे उपकप्तान रोहित शर्मा हाही मूळचा डोंबिवलीकर, परंतु त्याने आपल्या आजी-आजोबांकडे बोरीवलीत वास्तव्य करणे पसंत केले. (डोंबिवली व बोरीवली ही शेजारीशेजारील शहरे असल्याने तेथे एकच पत्रकार नियुक्त करण्याचा निर्णय एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संपादकांनी घेतला होता.)

डोंबिवली ही वेगवेगळ्या क्षेत्रातील नररत्नांची खाण आहे. बरीच रत्ने डोंबिवलीत लहानाची मोठी झाली. मात्र, पैलू पडून ती जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रात तळपू लागली, तेव्हा ती मुंबईच्या किंवा अन्य मोठ्या शहरांच्या कोंदणात जाऊन बसली. अर्थात, डोंबिवलीने कधीही त्याबद्दल कुरकुर केली नाही. नवनवीन रत्ने (पैलू न पडलेली) निर्माण करण्याचा घेतला वसा या शहराने टाकला नाही. अजिंक्यचे वडील बेस्ट उपक्रमात सेवेला तर आई गृहिणी. अजिंक्यच्या अंगी जन्मत: क्रिकेट नैपुण्य. डोंबिवलीतील एस.व्ही. जोशी हायस्कूलमध्ये प्रवेश मिळताच शालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये अजिंक्यची बॅट तळपू लागली. डोंबिवलीत क्रिकेटच्या क्षेत्रातील रत्ने हुडकून त्यांना संधी देणारे प्रशिक्षक राजन धोत्रे यांनी अजिंक्यवर क्रिकेटचे प्राथमिक संस्कार केले. पुढे मुंबईत गेल्यावर विद्या पराडकर यांनी अजिंक्यला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याकरिता घडविला. नीलेश कुलकर्णी हाही मूळचा डोंबिवलीकर. भारतातर्फे क्रिकेट खेळल्यावर जसे नीलेशनी डोंबिवली सोडली तशीच अजिंक्यने. डोंबिवलीहून मुंबईत खेळायला जायचे, तर सकाळच्या वेळी एक तर खेळाडू लोकलमध्ये शिरू शकेल किंवा त्याचे क्रिकेट किट! दोघांना लोकलच्या डब्यात प्रवेशाची संधी मिळाली, तर आतील गर्दीत तो बिच्चारा असा घुसमटून जाईल की, जेव्हा तो मुंबईत सरावाकरिता पोहोचेल, तेव्हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका बाजूने संघ सावरून धरताना दमछाक होऊन तंबूत परतलेल्या फलंदाजासारखा थकला भागला भासेल. समजा, रस्ते मार्गे मुंबई गाठून क्रिकेटची आराधना सुरू ठेवायची ठरवली, तर प्रात:कालीन नेटप्रॅक्टिसच्या प्रहरी डोंबिवली सोडलेला खेळाडू लंच टाइमपर्यंत मैदानात दाखल झाला, तरी मिळविले. रस्तेमार्गे डोंबिवलीहून मुंबई गाठण्याकरिता हल्ली तीन ते साडेतीन तास सहज लागतात. सध्या आदित्य रावत, यश सिंग, श्रेयस गुरव, मनिष राव, स्वप्निल प्रधान वगैरे क्रिकेटमधील रत्नांना पैलू पाडण्याचे काम डोंबिवलीत सुरू आहे. राष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते चमकताच डोंबिवली सोडतील, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.

ब्रिटिश आमदनीत रेल्वेचे पॉवर हाऊस ठाकुर्लीला उभे राहिले, तेव्हा बारा बंगला परिसरात गोऱ्या साहेबाचे वास्तव्य होते. त्यावेळी सुशिक्षित, पांढरपेशा समाजाची वस्ती असलेल्या डोंबिवली या खेडेगावात मुंबईतील लोक हवापालटाकरिता यायचे. (आता याच शहरात प्रदूषणामुळे हिरवा पाऊस कोसळतो) ब्रिटिशांनीच रेल्वे स्थानकालगत प्लॉट पाडून सुरुवातीला या गावाच्या नियोजनबद्ध आखणीचा श्रीगणेशा केला. एके काळी ख्यातनाम साहित्यिक विजय तेंडुलकर हे असेच तीनेक वर्षांकरिता काकुशेठ चाळीशेजारील गांधी बंगल्यातील दोन खोल्यांत राहिले होते. विंदा करंदीकर हे सरखोतांच्या चाळीत काही काळ रमले, नंतर ते दोघे मुंबईला गेले. ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर हे मूळचे डोंबिवलीकर. मात्र, संपादकपदाची माळ गळ्यात पडताच त्यांनी डोंबिवली सोडली. डोंबिवलीत वास्तव्य करणाऱ्यात साहित्यिक, लेखकांमध्ये पु.भा. भावे, शं. ना. नवरे, वसुंधरा पटवर्धन, ना. ज. जाईल, प्रभाकर अत्रे, द. भा. धामणस्कर, मधुकर जोशी वगैरे अनेक मान्यवरांचा समावेश आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रातील ‘दादा’ (भाई नव्हे) लोक डोंबिवलीत राहतात, सकाळी निमूटपणे लोकल पकडून नोकरी, धंद्याला जातात व रात्री केवळ पाठ टेकण्याकरिता डोंबिवलीत येतात. लग्न होऊन डोंबिवलीत येणाऱ्या चवळीच्या शेंगेसारख्या सुना कालांतराने डोंबिवली ‘मानवल्याने’ (येथील पोळी-भाजी केंद्रात उकडीच्या मोदकापासून पुरणपोळ्यांपर्यंत सर्व विनासायास उपलब्ध होत असल्याने) ‘सुखासीन’ दिसतात, तसेच काहीसे या शहराचे झाले. ब्रिटिशांनी सुरुवातील केलेली शहराची नियोजनबद्ध आखणी विस्कटून अनेक बेकायदा बांधकामे झाल्याने डोंबिवलीची तीही ओळख झाली. अतिक्रमण करणाऱ्यांनी नागरी सुविधांचे भूखंड गिळल्याने मैदाने, बगिचे, क्रीडांगणे, सभागृहे, मंडया वगैरे सुविधा शेवटच्या पंक्तीतल्या पानात जिलेबीचे तुकडे पडतात, तशा अभावाने आढळतात. डोंबिवलीतील काही शैक्षणिक संस्थांनी मैदाने ही आपली खासगी मालमत्ता करून ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे कुलूपबंद केल्याने पुढच्या पिढीतील नीलेश कुलकर्णी, अजिंक्य रहाणे यांना तर येथील मटर्निटी होममध्ये टॅहँऽऽऽ करण्यापूर्वी ‘हे डोंबिवली तर नाही ना?’ याची खातरजमा करायला लागेल. अर्थात, मैदाने, सुविधा कुठल्याही शहरात मिळाली, तरी वर म्हटल्याप्रमाणे चपळता, चिकाटी, आक्रमकता आणि सोशिकता वगैरे हे सारे डोंबिवलीकरांच्याच डीएनएमध्ये आहे हे विसरू नका!

(सच्चे डोंबिवलीकर असलेले लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वरिष्ठ सहायक संपादक आहेत!)

sandip.pradhan@lokmat.com