डॉ. संप्रसाद विनोद
वयात आलेली सुरेखा पुण्याच्या उपनगरात राहायची. वयानुरूप वारंवार आरशासमोर उभं राहून आपलं रूप न्याहाळायची. आपल्याच विश्वात रमलेली असायची. नीटनेटकं राहायची. चारचौघीत उठून दिसायची. शाळेत बर्याच वेळा पायीच जायची. शाळा घरापासून दोन-तीन किलोमीटर दूर होती. लेकीला चालत जायचा त्रास नको म्हणून वडील तिला रोज दुचाकीवरून शाळेत सोडायला आणि सायंकाळी परत न्यायलाही तयार असायचे. पण, त्यांना उगीच त्रास नको असं म्हणून एका मैत्रिणीबरोबर ती पायी जाणं पसंत करायची. मैत्रीण आली नाही तर एकटी जायची. घरातून लवकर निघायची. काही वेळा जरा जास्तच लवकर.
डोक्याने चांगली आणि अभ्यासात हुशार असल्यामुळे प्रत्येक परीक्षेत चांगले गुण मिळवायची. शाळेतून तिच्याविषयी कधी काही तक्रार यायची नाही. त्यामुळे आईवडील निश्चिंत असायचे. घराजवळ राहणार्या सुतार कुटुंबाचं तिच्या घरी जाणं-येणं असायचं. सुरेखाचं कुटुंब सणासुदीला त्यांच्याकडे जायचं. सुतार कुटुंब सधन होतं. त्यांचा मोठा बंगला होता. गाडी होती. घरात बाकी सगळ्या सुविधा- सुखसोयी होत्या. पाहुण्यांचा, आल्यागेलेल्यांचा राबता होता. सुतारांना दोन मुलं. २२ वर्षांचा धनेश आणि २५ वर्षांची सुप्रिया. लग्न झालेली सुप्रिया तिच्या सासरी सुखात होती. धनेशचंच तेवढं ठीक नव्हतं. शिक्षण जेमतेम १२वी पर्यंत झालेलं. पण, दुचाकी दुरुस्त करण्याचा अनुभव असल्यामुळे वडिलांनी काढून दिलेलं गॅरेज तो चालवायचा. बाजूला सगळी अपुरं किंवा अर्धवट शिक्षण झालेली मुलं असल्यामुळे त्याचं वागणं-बोलणं खूप मोकळंढाकळं आणि रांगडं झालं होतं. धनेश मनाने खूप चांगला असल्यामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता.
दोन्ही कुटुंबांचा चांगला घरोबा असल्याने धनेशची आणि सुरेखाची चांगली ओळख होती. शाळेत जातायेता त्यांच्या मधूनमधून भेटी व्हायच्या. मोटरसायकल असल्यामुळे बर्याच वेळा पायी शाळेत जाणार्या सुरेखाला तो गाडीवरून शाळेत सोडायचा. दोन्ही कुटुंबातल्या मंडळींना त्यात काही वावगं वाटायचं नाही. अल्लड वयातली सुरेखा मात्र धनेशच्या चांगल्या स्वभावामुळे त्याच्या प्रेमात पडली. कधीमधी त्याच्या घरी जाऊ लागली. कधीतरी धनेशच्या खोलीत जाऊ लागली. खोलीचं दार उघडं असल्याने यातही धनेशच्या घरातल्या कोणाला काही गैर वाटलं नाही. मग, पुढेपुढे घरात कोणी नाही असं पाहून खोलीचं दार बंद होऊ लागलं. तारुण्यसुलभ आकर्षणामुळे खोलीत प्रथम शारीरिक चाळे आणि नंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध सुरू झाले. घरी खोटं सांगून भेटणं सुरू झालं. हे सगळं तसं राजरोस चालू होतं. पण, बराच काळ कोणाच्या ते लक्षात आलं नाही. स्त्री-पुरुषांमधील शरीरसुखाची भूक मोठी असते. सहजासहजी ती तृप्त होत नाही. त्यातून लहान वयात जर ओढ वाढली तर त्यात गुंतायला होतं. या सुखाचं आकर्षण वाटतं. धनेश आणि सुरेखाच्या बाबतीत असंच झालं. दोघांना त्याची चटक लागली. गर्भ राहणार नाही याची काळजी घेत राहिल्याने मोठी अडचण टळली.
एकदा शाळेतून सुरेखाच्या तब्येतीची चौकशी करणारा फोन आला. त्या वेळी, तिच्या घरच्यांना धक्काच बसला. ही मुलगी आजारी कधी पडली होती? आणि ते आपल्याला कसं माहीत नाही. म्हणजे, आपल्याशी खोटं बोलून ती शाळेच्या वेळात आणखी कुठे जाते की काय? अशी तिच्या घरच्यांना शंका आली. थोडे दिवस लक्ष ठेवल्यावर सगळ्या गोष्टी उलगडत गेल्या. खरं तर, आधुनिक विचारांच्या तिच्या आई-वडिलांनी तिला खूप स्वातंत्र्य दिलं होतं. सुरेखाच्या किंवा धनेशच्या भेटण्याबद्दल कधी आक्षेप घेतला नाही. दोघांवर पूर्ण विश्वास टाकला. पण, दोघांचं ‘वेडं वय’ असल्याने ती एकमेकांकडे आकर्षित झाली आणि मनाने एकमेकांमध्ये गुंतली. दोन्ही घरांना या गोष्टीचा प्रचंड धक्का बसला. त्यांचे डोळे खाडकन उघडले. खरं तर, काही महिन्यांपासून सुरेखाच्या आईला तिच्या वागण्यातला फरक लक्षात आला होता. पण, सुरेखाच्या वडिलांच्या प्रभावामुळे ती माऊली गप्प बसली होती.
हे सगळं समजल्यावर सुरेखाच्या शाळेतून (?) घरी परतण्याची वाट पाहणार्या आईचा मला फोन आला. आपल्या मुलीचं जे काही चाललं होतं त्याचा या दोघांना प्रचंड ताण आला होता. काय करावं काही समजत नव्हतं. प्रथम फोनवरूनच त्या दोघांना हे नीट समजावून सांगावं लागलं, की सुरेखा घरी आल्याआल्या तिला अजिबात रागावू नका. तिचं खाणपिणं आटोपलं, की सहज म्हणून माझ्याकडे घेऊन या. त्याप्रमाणे, ती दोघं आली. प्रथम सुरेखाशी बराच वेळ बोलून सगळी परिस्थिती नीट समजून घेतली. आता पुढे काय करणार? असं विचारल्यावर ‘लग्न करणार’ असं ती म्हणाली. ही एवढी हुशार मुलगी आणि बेताच्या बुद्धीचा धनेश यांची जोडी कशी काय टिकणार? असा मला प्रश्न पडला.
मग, अजाण वयातलं ‘भाबडं प्रेम’ म्हणजे काय, खर्या प्रेमाचं स्वरूप काय असतं, लहान वयात शारीरिक आकर्षणातून निर्माण झालेले शारीरिक संबंध, त्याविषयी सतत वाटणारी ओढ, त्यामुळे अभ्यासावरचं उडणारं लक्ष, त्याचा परीक्षांवर होणारा परिणाम, बिघडणारं भवितव्य अशा कितीतरी महत्त्वाच्या विषयांवर आमचं सखोल आणि प्रदीर्घ बोलणं झालं. या संवादातून हुशार असलेल्या सुरेखाच्या विचारांना योग्य दिशा मिळत गेली. त्याच्या जोडीला ‘अभिजात योगसाधना’ सुरू राहिली. हळूहळू तिला मानसिक स्थैर्य, शांती मिळत गेली. तिच्या समस्येविषयी तिला सखोल जाण आणून देण्यावर कायम भर दिल्याने या बोलण्याचा तिच्यावर खूप चांगला परिणाम होऊ लागला. या नात्यातला ‘पोकळपणा’ तिचा ‘तिलाच’ लक्षात आला. एकदा-दोनदा धनेशशी बोलून त्याचीही बाजू समजून घेतली. तो काही मनाने वाईट नव्हता. कुठल्याही प्रकारे तिला फसवण्याचाही त्याचा हेतू नव्हता.
दोघांमध्ये जे घडलं होतं ते त्याचं ‘तारुण्य’ आणि तिचं ‘भाबडं वय’ यामुळे घडलं होतं. धनेशच्या घरचं थोडं कर्मठ, पारंपरिक वातावरण आणि सुरेखाकडचं आधुनिक वातावरण यांचा दीर्घकाळ मेळ बसू शकणार नाही हेही समजदार धनेशच्या लक्षात आलं. सुरेखाला देखील ही समज आली. याबाबतीत आमच्यात झालेले प्रदीर्घ संवाद तिला खूप उपयोगी पडले.
या सगळ्या कठीण कालखंडातून जाताना सुरेखाच्या आई-वडिलांचं तिच्या पाठीशी उभं राहणं, तिला मायेने समजून घेणं, धीर देणं कसं महत्त्वाचं आहे हे त्यांना खूप काळजीपूर्वक समजावून सांगावं लागलं. त्यांच्या लाडक्या, गुणी आणि हुशार लेकीच्या हे हिताचं आहे असं लक्षात आल्यामुळे उपचार प्रक्रियेतला त्यांचा सहभाग खूप चांगला राहिला. काही महिने सुरेखाचे वडील तिला ज्युनिअर कॉलेजमध्ये नेणं-आणणं, प्रसंगी पूर्ण वेळ कॉलेजात थांबणं, कायम तिच्याबरोबर राहणं हे सगळं करीत राहिले.
सुरेखाला हे सर्व तिच्या हिताचं कसं आहे हे नीट समजावून सांगितलेलं असल्यामुळे तिचंही चांगलं सहकार्य मिळालं. विशेष म्हणजे, लहान वयात एवढय़ा सगळ्या ताणतणावातून जावं लागूनही सुरेखाला सगळ्या विषयात चांगले गुण मिळाले. मला तिचं फार कौतुक वाटलं. त्यातूनच तिला पुढच्या अभ्यासासाठी आवश्यक असणारी प्रेरणा मिळाली. तिने पदव्युत्तर अभ्यास विशेष गुणवत्तेसह उत्तम प्रकारे पूर्ण केला. एका अनुरूप, उच्चशिक्षित तरुणाशी तिचं लग्न झालं. आता ती तिच्या संसारात छान रमली आहे. धनेशचंही चांगलं चाललंय. तोही त्याच्या आयुष्यात
स्थिरावलाय. दोघांमधील प्रश्न पूर्णपणे सुटलाय; विशेष म्हणजे हे सगळं मनात परस्परांविषयी कुठलीही कटुता किंवा राग न ठेवता घडलंय!!
(लेखक महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे योगगुरू आहेत.)