हेमंत देसाई
बसपा अध्यक्ष मायावतींबद्दल उत्तर प्रदेशातील भाजपा नेते दयाशंकर यांनी केलेली भयानक शेरेबाजी, रोहित वेमुलाचा शोकात्म अंत, हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी चार-चार मुले जन्माला घालण्याचे खासदार साक्षीमहाराज यांचे आवाहन आणि ‘गोहत्त्या करणाऱ्यांचे हातपाय तोडू’ ही भाजपाचे उत्तर प्रदेशातील आमदार विक्रम सैनी यांची दमबाजी या सगळ्यावरून देश कोणत्या दिशेला जात आहे याचे संकेत मिळतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनधिकृत कत्तलखान्यांवर घातलेल्या बंदीनंतर, गोरक्षणाच्या नावाखाली हैदोस घालणाऱ्या टोळ्यांना चेव चढला आहे. भारताच्या राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेकडून सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव पुढे केले गेले आहे. पुढारलेल्या जातींकडून आरक्षणासाठी येत असलेला संघटित दबाव, हिंदू धर्मवाद्यांचा धिंगाणा आणि धर्मरक्षकांची घटनात्मक पदावरच नेमणूक करण्यासाठी चाललेला आटापिटा हे वर्तमान विदारक चित्र आहे. भारताचा पाकिस्तान, अफगाणिस्तान वा सौदी अरेबिया करण्याच्या ईर्षेतूनच हे घडत असावे. यामुळे स्वातंत्र्य, लोकशाही, समता, बंधुता या तत्त्वांवर विश्वास असणारे अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे.
भारतावरील मुस्लीम आक्र मणापूर्वी ब्राह्मणशाही आणि बौद्ध यांच्यात तीव्र संघर्ष झाला होता. आज हा संघर्ष ‘धर्मांध’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ या शक्तींमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘दि इसेन्शियल आंबेडकर’ हा ग्रंथ संपादित करून, माजी खासदार, योजना आयोगाचे माजी सभासद आणि मुंबई विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी एक महत्त्वाचे काम हातावेगळे केले आहे.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले लेख, त्यांची भाषणे असा १७,५०० पृष्ठांचा अति-विस्तृत ऐवज नजरेखालून घालून, त्यातून ४४० पृष्ठांची निवड करणे हे काम चिंतनशीलतेचे, तसेच कष्टाचे आणि चिकाटीचे. ते कार्य संपादक मुणगेकरांनी यशस्वीरीत्या पार पाडलेच; शिवाय त्यांनी प्रस्तुत ग्रंथास मौलिक प्रस्तावनादेखील लिहिली आहे.
या पुस्तकात डॉ. बाबासाहेबांच्या ‘जात व अस्पृश्यता’, ‘जातींचे अर्थशास्त्र व हिंदू समाजव्यवस्था’, ‘हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान’, ‘समान मानवी हक्कांसाठी संघर्ष’, ‘अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी धर्मांतर हा एकमेव मार्ग’, ‘आर्थिक विकास व कामगार कल्याण’, ‘बुद्ध की कार्ल मार्क्स, ‘स्त्री मुक्ती - हिंदू कोड बिल’ अशा विविध विषयांवरील १४ प्रकरणांचा ग्रंथात समावेश करण्यात आला आहे. त्यामधून
डॉ. बाबासाहेबांचा प्रत्येक समस्येकडे पाहण्याचा मूलभूत चिंतनशील दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो.
पुस्तकासाठी लिहिलेल्या आपल्या मर्मग्राही प्रस्तावनेत डॉ. मुणगेकर म्हणतात, ‘‘जात व अस्पृश्यता यांचा सर्वांगीण अभ्यास करणारे डॉ. बाबासाहेब हे अग्रणी विचारवंत. त्यांचा युक्तिवाद एवढा प्रबळ होता की, गांधीजींनी त्यांचा उल्लेख ‘हिंदू धर्मास आव्हान’ अशा शब्दांत केला. अस्पृश्य हे देशातील सर्वात मोठे अल्पसंख्याक असून, त्यांच्यासाठी राजकीय सुरक्षितता असणे जरुरीचे आहे, त्याविना ते राजकीय-सामाजिक स्वातंत्र्य उपभोगू शकणार नाहीत, असे त्यांचे प्रतिपादन होते. हिंदू मानसिकतेत असणारी जात्यधिष्ठित बहिष्कृतता आणि भेदाभेद यांची चिरेबंदी चौकट उद्ध्वस्त करण्याचा बाबासाहेबांचा मनोदय होता. दुर्दैवाने कालौघात भारतातील अन्य धर्मांतही अशीच विषारी मानसिकता निर्माण झाली आहे.’’
आपली उद्दिष्टे आणि मतांवर डॉ. आंबेडकरांची एवढी गाढ निष्ठा होती की, ‘दि अॅनिहिलेशन आॅफ कास्ट’ या त्यांच्या गाजलेल्या लाहोरमधील प्रस्तावित भाषणातील काही अंश काढून टाकण्याची विनंती त्यांना संयोजकांनी केली, तेव्हा ‘‘त्यात मी स्वल्पविरामाचाही बदल करणार नाही,’’ असे त्यांनी ठणकावले. त्यामुळे त्यांचे व्याख्यानच रद्द करण्यात आले. मग त्यांनी ते व्याख्यान स्वत:च प्रसिद्ध केले. ते ऐतिहासिक स्वरूपाचे आहे.
जगातील क्र ांतदर्शी महान विचारवंतांत डॉ. बाबासाहेबांचा समावेश होतो. देशापुढील एकही प्रश्न असा नाही, की ज्याला त्यांनी स्पर्श केला नाही. ते सक्रिय बुद्धिमंत विचारवंत होते व त्यांचे विचार आजच्या संदर्भातही तितकेच लागू होतात. देशातून जातिभेदाचे समूळ उच्चाटन करणे हे त्यांचे जीवित ध्येय होते. त्यासाठी त्यांनी व्यवस्थेला आव्हान दिले आणि समाज व राज्यव्यवस्थेत मूलगामी सुधारणा व्हाव्यात यासाठी लढा दिला, असे सुरेख विवेचन डॉ. मुणगेकरांनी केले आहे.
ग्रंथातील पहिल्याच लेखात डॉ. बाबासाहेबांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला आहे. ‘जातिसुधारणांसाठी प्रथम उपजाती नष्ट केल्या पाहिजेत; कारण विभिन्न जातींपेक्षा उपजातींमध्येच प्रतिष्ठा व रीतीभाती याबाबतीत समानता असते’, हे गृहीतच कसे चुकीचे आहे, ते बाबासाहेबांनी सप्रमाण दाखवून दिले. कार्ल मार्क्सचा वर्गयुद्धाचा सिद्धांत बहुतेक सनातनी हिंदूंना मान्य नाही.
परंतु प्राचीन काळात ब्राह्मण-क्षत्रियांमध्ये वर्गयुद्धे झाली होती. वसिष्ठ वि. विश्वामित्र यांच्यातील संघर्षाचा, तसेच परशुरामाने केलेल्या क्षत्रियांच्या संहाराचाही ते दाखला देतात. डॉ. बाबासाहेबांचे लेखन तर्कशुद्ध असे.
‘हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान’ या विषयाचे विश्लेषण करताना ते त्यातील त्रुटींवर बोट ठेवतात. आपल्याकडे इतक्या जाती-पोटजाती आहेत की ज्याचे नाव ते. ब्राह्मणांमध्येच १८८६ पोटजाती, पंजाबात सारस्वत ब्राह्मणांच्याच ४६९ आणि कायस्थांच्या ८९० पोटजाती आहेत, हे बाबासाहेबांनी त्याकाळी दाखवून दिले आहे.
अस्पृश्यांनी शिक्षणाची कास धरावी व शिक्षणाचा विस्तार करावा. अस्पृश्य समाज हा शोषित-पीडित कामगारवर्ग आहे. त्याच्याकडे आर्थिक शक्ती नाही. आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी राजकीय सत्ता मिळवली पाहिजे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब करतात. अर्थात, आज दलित नेतृत्व सत्तेत आहे; ते आपल्या समाजाच्या नव्हे, तर व्यक्तिगत उद्धारात, पंचतारांकित जीवनात वा फालतू कविता करण्यात गर्कआहे, हा भाग वेगळा.
आर्थिक विकासावर भाष्य करताना डॉ. बाबासाहेबांनी देशातील शेतकी असलेले सरासरी लागवडक्षेत्र कमी असून, त्यांचे एकत्रीकरण करणे जरुरीचे आहे. प्रत्येकाला जमीन मिळाली म्हणून आनंद मानावा असे काही नाही. कारण जमीनक्षेत्र लहान असल्याचा फटका युरोपला बसला होता. त्यामुळे शेती कार्यक्षम व अव्यवहार्य कशी होते, त्याची अर्थशास्त्रीय मांडणी डॉ. बाबासाहेब करतात. भारतीय शेती कधी फायद्यात नसते. तिच्या सोबत संलग्न कुटिरोद्योग थाटले पाहिजेत. त्यासाठी वीज आदिंचा पुरेसा पुरवठा हवा, हे बाबासाहेबांनी कित्येक वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे.
त्यांचे विचार अंमलात आले असते तर आज शेतकऱ्यांना आत्महत्त्या कराव्या लागल्या नसत्या. संसदीय लोकशाहीचे त्यांचे विचार राज्यकर्त्यांनी रुजवले असते, तर खासदार रवींद्र गायकवाडांसारखी पायताण-पूजा बांधणारी रत्ने जन्माला आली नसती.
डॉ. मुणगेकर हे उदारमतवादी अभ्यासक. संसदीय लोकशाहीवर भेदाभेदांच्या आणि असहिष्णुतेच्या सावल्या पडू लागल्यानंतर स्वस्थ न बसता त्यांनी आंबेडकरी विचारांचे रोपटे लावण्याचे संस्थात्मक व वैचारिक काम नेटाने सुरू ठेवले आहे, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
समग्र आंबेडकर समजून घेण्यासाठी सुमारे सात वर्षे काम करून मुणगेकरांनी संपादित केलेला आणि ‘रूपा पब्लिकेशन्स’ या भारतातील अग्रगण्य प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलेला ‘दि इसेन्शिअल आंबेडकर’ हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचाच आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)