शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

देशाबाहेर... आणि आत! - अमित वाईकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 6:00 AM

समृद्धी आली; पण त्या घाईत संस्कार विसरले तर भारताचं मनुष्यबळ जागतिक स्पर्धेत दुबळं ठरेल आणि संधी गमावून बसेल, हे नक्की ! अठरा वर्षाच्या मुलाच्या हातातल्या स्क्रीनवर सनी लिओनी येणं आपण रोखू शकणार नाही कदाचित; पण त्याच्या त्या स्क्रीनवर साने गुरुजी कुठे दिसत नाहीत, ही माझी काळजी आहे.

ठळक मुद्देअठरा वर्षाच्या मुलाच्या हातातल्या स्क्रीनवर सनी लिओनी येणं आपण रोखू शकणार नाही कदाचित; पण त्याच्या त्या स्क्रीनवर साने गुरुजी कुठे दिसत नाहीत, ही माझी काळजी आहे.

डोहलर ग्रुप या बलाढ्य जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून शांघायमधून कार्यरत असणारे अमित वाईकर मूळचे नागपूरचे. त्यांना नुकताच ‘प्रवासी भारतीय सन्मान’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद...* जागतिकीकरणानंतरच्या गेल्या पंचवीस वर्षात भारत आणि उर्वरित जग; यांची एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी बदलत गेली. या बदलत्या चित्राचा एक भाग म्हणजे अनिवासी भारतीयांच्या संघटित शक्तीचा उदय ! तुमचा अनुभव काय सांगतो?- भारताकडे पाहण्याची जगाची दृष्टी मुख्यत: बदलली, ती अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात. या बदलाचे ते शिल्पकार आहेत. सध्या अंदाजे चार ते पाच कोटी अनिवासी भारतीय जगाच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत; त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा, ‘संपर्का’चा आपल्या देशासाठी कसा वापर करून घेता येईल, याचा विचार पहिल्यांदा केला तो वाजपेयी यांनी. अनिवासी भारतीयांची संघटित शक्ती मायदेशाच्या प्रगतीला/प्रतिमावर्धनाला मोठा हातभार लावू शकते.नुसता चीनचा विचार केला, तरी जवळपास नव्वद हजार भारतीय या देशात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघायमध्ये आले, त्यानिमित्ताने चीनमधल्या भारतीयांच्या संघटना उभ्या राहिल्या, त्या एकत्र आल्या. दोन्ही देशांच्या परस्परसंबंधांसाठी अशा संघटनांची फार कळीची भूमिका आहे.* आयुर्वेद आणि योगशास्राच्या मागोमाग ‘अनिवासी भारतीय’ आता भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’चा मोठा हिस्सा बनले आहेत...?- नक्कीच ! राजकीय नातेसंबंधांच्या पलीकडे देशोदेशीच्या उद्योग-व्यापारापासून लेखक-कलावंत आणि उच्चभ्रू बुद्धिवादी अभिजनांपर्यंतच्या सगळ्याच स्तरांमध्ये भारताबद्दल आज उत्सुकता आहे. ही उत्सुकता निर्माण करण्यात बदलत्या राजकीय वर्तमानाबरोबरच विविध देशात स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीयांचं योगदानही फार मोठं आहे. अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाची याबाबतीतली कामगिरी अत्यंत कळीची ठरलेली आहे.* ६०-७०च्या दशकांत नशीब काढण्यासाठी देशाबाहेर पडलेल्या भारतीयांच्या पहिल्या पिढीतल्या लोकांनी वरिष्ठ पदांपर्यंत पोहचण्यात अदृश्य अडथळे आणणाऱ्या ‘ग्लास सिलिंग’चा अनुभव घेतला. नंतर मायक्रोसॉफ्टसकट अनेक बड्या कंपन्यांचं नेतृत्व भारतीय वंशाच्या लोकांनी केलं, तुम्ही स्वत: डोहलर या जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीसाठी चीनमधून वरिष्ठ पदावर काम करताहात. ‘ग्लास सिलिंग’ या शब्दाचे संदर्भ बदलत गेल्याचं तुम्हाला जाणवतं का?- अर्थात ! परिस्थिती खूप बदलली आणि सकारात्मकतेने बदलली. आता प्रश्नही बदलले आहेत. डोहलर ही १८० वर्षे वयाची बलाढ्य जर्मन कंपनी आहे. दीड अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या आमच्या कंपनीचा सीईओ अ‍ॅण्डी हल्ली मला म्हणतो, ‘अमित, मी जगात जिथे जिथे जातो; त्या त्या कंपन्यांच्या वरिष्ठ स्तरावर बहुतेक भारतीय लोक महत्त्वाच्या पदांवर असतात. भारतीयांमधली ही सर्वोच्च गुणवत्ता परदेशी इतकी चमकते; तर मग तुमच्या देशातच तुम्हाला काय होतं?’मी हसून त्याला सांगतो, आमच्या देशाचं सर्वोच्च बलस्थान आणि सगळ्यात मोठा कच्चा दुवा एकच आहे : लोकशाही ! इतक्या साऱ्या धर्मांचे, विचारांचे लोक आपापल्या मतभेदांसह एकत्र नांदतात हे खरं; पण देशातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ज्ञानप्राप्तीच्या संधी पोहचवण्यात आम्ही कमी पडलो. या व्यवस्थेने दिलेल्या स्वातंत्र्यासोबत अपेक्षित असलेल्या जबाबदाऱ्याचं भानही पुरेसं रुजलेलं नाही. त्यामुळे एरवी जगाला मार्गदर्शक ठरू शकला असता असा भारतीय लोकशाहीचा ‘सामाजिक प्रयोग’ अजून काहीसा अपूर्णावस्थेत रखडला आहे.* ‘इंडियन पीपल आर एबल, बट नॉट एम्प्लॉएबल..’ अशी खंत भारतात अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे. ज्या व्यवस्थेबद्दल देशातच अस्वस्थता आहे, त्यातून मिळणारी अशी कोणती कौशल्यं असतात की जी जगाच्या बाजारपेठेत आपलं नाणं खणखणीतपणे वाजविण्यासाठी तुमच्यासारख्या उच्चपदस्थांना मदत करतात?- मी माझ्या अनुभवातून तीन ठळक गोष्टी सांगेन : भारतीयांची मल्टिटास्किंग अ‍ॅबिलिटी, मल्टिडायमेन्शनल थिंकिंग आणि कुटुंबातून मिळालेल्या संस्कारांनी-जीवनमूल्यांनी दिलेलं एक स्थैर्य !माझ्या व्यावसायिक संदर्भात कोणतंही आव्हान असो, त्याचा यशस्वी सामना करण्यासाठी मी एकाच वेळी अनेक पर्यायांचा विचार करू शकतो आणि अशी अनेक आव्हानं एकाचवेळी पेलू शकतो. मला वाटतं, हे असं चौफेर विचारांचं भान आणि निर्णयक्षमतेचा आवाका आपली व्यवस्थाच आपल्याला देते. भारतीयांकडे असलेलं हे कौशल्य फार दुर्मीळ आहे आणि म्हणूनच ते कळीचं ठरतं.*व्यक्तिगत आर्थिक उन्नतीसाठी देशाबाहेर राहून तुम्ही एका अर्थाने देशद्रोह करत नाही का, या दिशेने केले जाणारे काहीसे भावुक प्रश्न पूर्वी अनिवासी भारतीयांच्या वाट्याला येत असत. आता या प्रश्नाचे संदर्भ किती बदललेले जाणवतात?- पूर्णत:! नव्या जागतिक रचनेत हा प्रश्न माझ्या मते अगदीच गैरलागू आहे. उलट परदेशात राहून मी भारताची अधिक सेवा करू शकतो, असं माझं मत आणि अनुभवही आहे. चीनमध्ये काम करत असताना भारतातून इकडे येऊन या देशाशी व्यापारी किंवा अन्य संबंध जोडू इच्छिणाºया माझ्या देशबांधवांसाठी मी खात्रीशीर दुवा ठरू शकतो. दोन्ही देशांमधल्या परस्परसंबंधांमध्ये सुविहितता यावी, रहावी म्हणून प्रयत्न करू शकतो. मी आत्ता जिथे राहातो आहे, त्या चीनमधल्या लोकांनी गेली कित्येक दशकं जगभरात जाऊन, यश मिळवून आपल्या संपर्कजाळ्याचा उपयोग चीनला महासत्ता बनवण्याच्या प्रक्रियेत केलाच की!बदलत्या काळाने ‘देशसेवा’ आणि ‘मायभूमीशी निष्ठा’ या संकल्पनांना कितीतरी वेगळे आयाम दिले आहेत, ते मला अधिक महत्त्वाचे वाटतात.* पूर्वी लोक नशीब काढायला पूर्वेकडून पश्चिमेकडे जात. आता भारत-चीन या बलाढ्य अर्थव्यवस्थांच्या आधाराने मनुष्यबळाची उलटी वाटचाल सुरू होईल का?या प्रश्नाचं उत्तर खूप गुंतागुंतीचं आहे. भांडवलाचा, गुंतवणुकीचा ओघ यावा म्हणून लागणारं धोरणात्मक सातत्य, स्थिरता आणि पुरेसं पारदर्शी राजकीय पर्यावरण या मूलभूत गरजा असतात. या निकषांवर भारताबद्दल पूर्वीइतकी संदिग्धता नसली तरी अजूनही पुरेशा खात्रीचं वातावरण नाही. भारतामध्ये ‘पोटेन्शियल’ आहे, याबाबत जागतिक औद्योगिक वर्तुळात मला दुमत दिसत नाही; पण इथल्या अस्थिर संदिग्धतेचा धसका अजून संपलेला नाही. सुदैवाने भारत सरकारमध्ये धोरणात्मक स्तरावर याबाबत आता पुरेशी स्पष्टता दिसते. सरकारी शिष्टमंडळांमधले लोक हल्ली परदेशी बैठकांमध्ये वास्तव मान्य करतात. अडचणींमधून मार्ग काढण्याचे मार्ग शोधण्याला तयार असतात, हे महत्त्वाचा बदल मी अनुभवतो. पूर्वी नुसतीच आश्वासनं देण्यावर भर असे. नुसत्या ‘हॅण्डशेक मिटिंग्ज’ होत आणि पुढे काही सरकत नसे. आता या बदलांना अधिक वेग मिळण्याची गरज आहे.*सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश, ही भारताची नवी ओळख आहे. एक बहुराष्ट्रीय कंपनीच्या संचालक पदावरून या तरुण भारतीय मनुष्यबळाकडे तुम्ही कसे पाहाता?- खूप काळजीने पाहातो, हे माझं प्रामाणिक उत्तर आहे आणि ते देताना मला वेदना होतात. आपल्याकडच्या तरुण मुलांच्या हाती अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आली आणि कनेक्टिव्हिटी अगदी तळागाळात पोहचली, या तपशिलापेक्षा ‘या तरुण मुलांकडे झोकून देऊन कष्ट करण्याची आणि प्रसंगी अंगमेहनतीची तयारी आहे का?’ हे मला महत्त्वाचं वाटतं. समृद्धी आली; पण त्या घाईत संस्कार विसरले तर भारताचं मनुष्यबळ जागतिक स्पर्धेत दुबळं ठरेल आणि संधी गमावून बसेल, हे नक्की ! अठरा वर्षाच्या मुलाच्या हातातल्या स्क्रीनवर सनी लिओनी येणं आपण रोखू शकणार नाही कदाचित; पण त्याच्या त्या स्क्रीनवर साने गुरुजी कुठे दिसत नाहीत, ही माझी काळजी आहे.‘बिल्ड इंडिया’, ‘मेक इन इंडिया’च्या घोषणा योग्यच आहेत; पण त्या घाईत आपल्याला ‘लर्न इंडिया’चा विसर पडू नये, एवढंच !

waikar2019@gmail.com(मुलाखत : अपर्णा वेलणकर)