‘‘आप किधर हो?’’‘‘आप किधर हो?.. मै यहाँ हूँ. यहा पर एक मंदिर है, यहा पर बहोत बिल्डिंग है...’’- अम्मांचा मुलगा श्रीगणेशशी फोनवर बोलत त्यांचं घर शोधणं चालू होतं. चेंबूरला हजारवेळा जाणं झालं असेल; पण चेंबूरचा हा भाग कधीच पाहिला नव्हता. शोधत शोधत गेल्यावर अगदी इस्टर्न एक्स्प्रेस वेला चिकटेल इतक्या लांब म्हाडाच्या उंच इमारती आहेत. हे सगळे लोक वेगवेगळ्या झोपडपट्ट्या उठवल्यावर इकडे राहायला आले असावेत. आता यासुद्धा उभ्या झोपडपट्ट्याच झाल्या आहेत. दोन इमारतींमध्ये अगदी चिंचोळी जागा आणि काळोखे मजले असं लहानंसं उपनगर चेंबूरच्या टोकाला वाशी नाक्याला उभं राहिलंय. सगळ्या एकसारख्या दिसणाऱ्या इमारतींमध्ये अम्मांचं घर शोधण कठीणच होतं. शेवटी एकदाचा त्यांचा मुलगा दिसला आणि आम्ही त्यांच्या घरी निघालो.अम्मांना भेटायला चाललो होतो. त्याच त्या ‘न्यूड’ सिनेमावाल्या अम्मा. हा सिनेमा चर्चेत आल्यावर आपल्याकडे पहिल्यांदाच न्यूड मॉडेलिंग, त्या मॉडेल्सचं आयुष्य हे विषय सार्वजनिक चर्चेत आले आणि एक वेगळंच विश्व उलगडलं जाऊ लागलं. त्याभोवती उत्सुकतेची वलयं तयार होत राहिली. त्यात हा सिनेमा ज्या लक्ष्मीअम्मांवर बेतला आहे, त्या अम्मांच्या थेट मुलाखतीच प्रसिद्ध होऊ लागल्या आणि गुप्ततेचा (अनावश्यकच) बुरखाही एकदाचा गळून पडला.सिनेमा प्रसिद्ध झाल्यावर अम्मा आणि त्यांचा मुलगा श्रीगणेश यांच्याशी भेट ठरली ती थेट त्यांच्या घरीच. श्रीगणेश त्यांच्या घरी घेऊन गेला. कष्टाने उभं केलेलं अम्माचं घरपण ‘म्हाडाच्या या काळोख्या इमारती आम्हाला राहाण्यासाठी अजिबात चांगल्या नाहीत’ असं अम्मा सांगत होत्या, ‘वस्तीतले बरेच लोक दारूडे, गांजेकस आहेत. जरा दोन तास घरात कोणी नसेल तर सगळं घर लुटून नेतील, अशी अवस्था. त्यामुळे आम्ही सगळे एकाचवेळी घराबाहेर पडू शकत नाही. दारू आणि जुगाराच्या वातावरणामुळं श्रीगणेशच्या लहान मुलाला बाहेर खेळायलाही सोडता येत नाही.’- अम्मांच्या बोलण्यात काळजी होती आणि काडीकाडी गोळा करून उभं केलेलं घर दिसतच होतं. टीव्ही, फ्रीज, गॅस असं सगळं अम्मांनी आणि त्यांच्या मुलांनी हळूहळू करून जमवलेलं. लक्ष्मींचं खरं नाव धनलक्ष्मी; पण त्यांचं लक्ष्मी हेच नाव रूळलं. पुढे लक्ष्मीअम्मा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आणि नंतर त्या नुसत्या अम्मा झाल्या. जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे सगळे विद्यार्थी त्यांना अम्माच म्हणतात. आता सिनेमामुळं अम्मा चांगल्याच ओळखीच्या झाल्यात, माध्यमांशी बोलल्यामुळं थोडा आत्मविश्वासही त्यांच्यामध्ये आलाय.मी काही विचारायच्या आधीच त्यांनी त्यांची कहाणी सांगायला सुरुवात केली,‘‘मैरे पास बहोत फिल्मवाले स्टोरी पूछने के लिए आते थे, बहोत पैसा देने की बात करते थे, लेकिन किसीपर ट्रस्ट नही हुवा. आदमी देखके पता चलता है. एकतो आदमी घर आया और स्टोरी बताया. आप मॉडेलिंग के लिए बैठे हो और आपका बेटा आगेसे चलके आता है, ऐसा स्टोरी था. बेटे को हिरो बनाऊंगा बोला लेकीन मैने ये नही हो सकता ऐसा बोला. पर ये डायरेक्टर (रवि जाधव) चड्डी-शर्ट पेहनता हे लेकिन बहोत रिस्पेक्टफुल है, सबका बहोत आदर करता है. सिर्फ उसी के साथ मै बात करनेको तैयार हो गयी.''- अम्मा सांगत होत्या ते खरंच होतं. आधीच आपल्याकडे नग्नता वर्ज्य. त्यातल्या कलेबिलेची चर्चा फक्त मर्यादित वर्तुळांपुरतीच. बाकी आंबटशौकच सगळा. त्यात त्यांनी इतकी वर्षे सर्वांपासून लपवलेली गोष्ट सगळ्यांना सांगायची म्हणजे धाडसच होतं.लक्ष्मीअम्मा मात्र आता एकदम मोकळेपणाने बोलत होत्या. त्यांच्या घरीही कामाबद्दल सगळ्यांना समजलंय. त्यामुळे मनावर इतकी वर्षं अकारण वागवलेलं ओझं कमी झालंय हे त्यांनी सांगूनच टाकलं. श्रीगणेशलासुद्धा आता याची सवय झाली असावी. तोही छान मोकळेपणाने बोलत-वागत होता.अम्मा वयाच्या दहाव्या वर्षी मुंबईत आल्या. मुदलियार त्यांचं आडनाव. आई-वडील त्या लहान असतानाच गेले. लग्न झाल्यावर त्या माटुंग्याच्या झोपडपट्टीत राहू लागल्या. हिरे व्यापाऱ्यांच्या इमारतीचा कचरा चाळायच्या कामाचं कंत्राट त्यांचा नवरा घेत असे.अम्मा सांगत होत्या, ''वो दिन हम झोपडपट्टीमैही रहते थे लेकिन सुकून था, मरद हप्ते मै बीस-तीस हजार कमाता था लेकिन सब पैसा दारू मे जाता था, हप्ते मे एकबार हम सिनेमाबी जाते थे. लेकिन वो गुजर गया, ये बडा बेटा सिर्फ पाच साल का था और दुसरा उससे भी छोटा...''
- झोपडपट्टीत दोन कोवळ्या मुलांसह राहणं एका विधवेला शक्यच नव्हतं. एकतर काम करून दोन पोरांचं पोट भरायचं आणि आजूबाजूच्या लोकांपासून आपलं रक्षण करायचं त्यांच्यासमोर आव्हान होतं. काम मागायला गेलं की ‘मुझे क्या दोगी’ हा प्रश्न यायचा! त्यामुळं काम मिळवणं त्यांच्यासाठी फारच अवघड झालं होतं. शेवटी शेजारच्या एक बाई व्हीटी स्टेशनच्या जवळ कोठेतरी काम करतात हे समजलं. पण त्या अम्मांना कामाच्या ठिकाणी न्यायला टाळाटाळ करायच्या. एकदा अम्माच पत्ता शोधत जे.जे. मध्ये जाऊन उभ्या राहिल्या. तिथे हे ‘असलं’ काम करायचं म्हटल्यावर मात्र त्या काळजीत पडल्या. पण कोठेच काम न मिळण्याची बाहेरची स्थिती आणि मुलांचं आयुष्य लक्षात घेऊन शेवटी त्यांनी होकार दिला.‘पहिली बार मुझे बहोत रोनेको आया लेकिन वो पडोसवाली औरत बोली, बाहर कहाभी काम नही है और लोग भी अच्छे नही है, यहाँ हर शुक्रवार पगार मिलता है.’ - एवढा दिलासा अम्मांना पुरेसा होता.जेजेतलं काम सुरू केल्यावर त्यांनी श्रीगणेशला हॉस्टेलमध्ये ठेवलं. अम्मांच्या बोलण्यात जे.जे.चे विद्यार्थी आणि शिक्षकांबद्दल प्रचंड आदर आणि कौतुक दिसत होतं. जेजेच्या विद्यार्थ्यांबद्दल किती सांगू किती नको असं त्यांना झालेलं. ‘‘वे पवारसर, जगतापसर सबने मुझे बहौत हेल्प की है. ये सब विद्यार्थी कॉलेजमे जाओगे तो पैर छुते है, कॉलेज छोडने के बाद भी मुझे ध्यान मे रखते है. मै जरा भी उदास रहेगी ना, तो पूछते है, क्या हुआ अम्मा, हमे बताओ ना, मुझे हसाने के लिए, गाते हे, नाचतेभी है. उनको मेरा चेहरा मालूम होता है, जराभी चेंज हुआ तो उनको पता चलता है, कुछतो गडबड है. ये सब लोग मेरा बड्डे भी मनाते है.. कभीकभार पिकनिकके लिए चौपाटीपर भी जाते है. शादीको बुलाते है, शादीके बादभी बडे आर्टिस्ट बन जाते है, तबभी मुझे पेहचानते हे. मैही उनको पेहचान नही सकती इतने स्टुडंट पच्चीससाल मे यहाँसे पास हो गये. सब कहते है अम्मा है, इसिलिए हमे पढने का मौका मिलता है.’’न्यूड चित्रणाचा अभ्यास करायला मिळतो, अशा दुर्मीळ कॉलेजपैकी एक जे.जे. आहे. त्यामुळं अम्माचं म्हणणं खरंच होतं. त्या म्हणाल्या, काही मुलं सांगतात, परदेशांमध्येही हे शिकायला मिळत नाही. यहापर दूरदूरसे स्टुडण्ट आते है, कोलापूर, सोलापूरसे बच्चे एग्जामके लिए आते है. जे.जे. मे नये मॉडल भी मैनेही दिए है, इसिलिए उनका मेरेपर भरोसा है’... बोलत बोलतच त्या चहा करायला उठून गेल्या.इकडे श्रीगणेशशी बोलताना थोडं अवघडल्यासारखं झालं. सिनेमाचं कळल्यावर तुला कसं वाटलं असं धाडकन विचारणं विचित्र वाटत होतं. पण अशा प्रश्नांना तो थोडा सरावला असावा. तो म्हणाला,‘इतके दिवस अम्मा जे.जे.मध्ये सफाईचं काम करायची एवढंच माहिती होतं. कधीतरी चित्रासाठी मॉडेल म्हणून बसते असं तिनं सांगितलं होतं. पण न्यूडबद्दल माहिती नव्हतं. तिच्या ओळखीने मला बिर्ला आर्ट गॅलरीमध्ये नोकरी मिळाली होती, तिकडे न्यूड चित्र पाहिलेली. तेव्हा तिथल्या मॅडम म्हणाल्याही होत्या ‘बदन मत देख, आर्ट देख’ वगैरे. पण आपली अम्मा यासाठी काम करते हे मला यावर्षी ८ एप्रिलला समजलं. महिला दिनी अम्माचा कॉलेजात सत्कार झाला आणि न्यूड सिनेमाबद्दल समजलं. पहिल्यांदा व्हॉट्सअॅपवर त्या कार्यक्रमाची क्लिप आली तेव्हा दोन मिनिटं सुन्न व्हायला झालं. निरनिराळे विचार आले; पण मी ते नकारात्मक दिशेने नेले नाहीत. नंतर जे.जे.च्या एका मुलीनं सांगितलं, आपकी अम्मा हमारे लिए गॉड है. झालं! एवढं मला बास होतं!! आपल्या अम्माला इतकी मुलं देव मानतात हे ऐकूनच मला भरून आलं. इतके दिवस अम्मा म्हणायची माझ्यावर सिनेमा येणार आहे असंतसं.. पण मी म्हणायचो, तू असं काय केलं आहेस की तुझ्या आयुष्यावर सिनेमा येईल?? कारण तेव्हा मला ती काय करते हेच माहिती नव्हतं.’- पण मग सिनेमा आल्यावर काय झालं?श्रीगणेश शोच्या प्रीमिअरला गेला होता. तो सांगतो, ‘सिनेमाच्या प्रीमिअर शोला आम्ही गेलो तेव्हा मला अगदीच भरून आलं होतं. भावनांना आवरणं अगदीच अशक्य होतं. इंटरवलमध्ये कल्याणी मॅमनी (सिनेमातील अभिनेत्री कल्याणी मुळे) बोलवल्यावर तर मला रडूच फुटलं. मी मधूनच निघून आलो. नाही पाहू शकलो सगळं. अम्माने पुढचा सिनेमा शेवटपर्र्यंत पाहिला. मी नंतर परत जाऊन सिनेमा पाहून आलो. आता सगळं ठीक आहे.’- श्रीगणेशशी बोलत असतानाच अम्मा चहा घेऊन आल्या. सिनेमानंतर माझ्या डोक्यावरचं मोठं टेन्शन गेलं असलं तरी लोकांमध्ये फारसा बदल झालेला नाही म्हणाल्या. माझ्यावर सिनेमा येणार हे लोकांना ट्रेलर, व्हिडीओतून समजलेलं. त्यामुळं काही लोक ओळखायचे. बाजारात इकडे-तिकडे गेल्यावर म्हणायचे, ‘‘आपपर कुछ तो मुवी आ रहा है, आपको पेहचानतेहे’’
असं म्हणायचे.. सिनेमा आल्यावर कुर्ला स्टेशनवर तिकीट घेताना एक माणूस म्हणाला, ‘‘आपका सिनेमा आ रहा है ना? क्या मॅडम, हमको भी चान्स मिलेगा क्या’’ - आता हे तो चांगल्या अर्थाने म्हणत होता, की वाईट ते मात्र समजलेलं नाही. बरेचसे लोक किती पैसे मिळाले असं विचारतात. काही लोक सरळ बहोत पैसा मिला होगा ना असं सरळ म्हणून टाकतात. पण हे होणारच.’’या दोघांशी भरपूर बोलणं झालं होतं. आता आपल्या मुलांच्या भविष्याचं काय होणार याची काळजी अम्मांना वाटते. किती दिवस काम करू आता, असं जे.जे.च्या पोरांना म्हटलं की ते अम्मांना म्हणतात, ‘‘अम्मा हम आपको उठाके लाएंगे यहाँपर.’’- पण अम्मांना पुढे धावत्या काळाचं भान आहे आणि डोक्यात मुलांच्या भविष्याची काळजी. ‘धाकट्याला कसली नोकरी मिळाली तर बघा’ - असं सांगतच त्यांनी निरोप दिला. म्हाडाच्या त्या काळोख्या इमारतीतून बाहेर पडताना विचार केला, या बाईंनी चित्रकारांच्या किती पिढ्या तयार केल्या असतील. त्यातले आज कित्येक चित्रकार जागतिक पातळीवर काम करत असतील. आपल्या समोर कोणते मोठे चित्रकार घडत होते हे कदाचित अम्मांनाही माहिती नसावं. एका महत्त्वाच्या आणि दुर्मीळ विषयासाठी त्या एकट्या उभ्या राहिल्या. ही वाट त्यांनी हिमतीने कसली, नाइलाजानेच धरली, तेव्हा त्यांना तरी कुठे माहिती असेल, वाटेत किती खाचखळगे लागणार ते!! नुकत्याच सुरू झालेल्या संसारातून नवरा जाण्याचं दु:ख, मागे उरलेल्या स्वत:सोबत पदरातल्या दोन पोरांचा सांभाळ हे सगळं त्यांनी निमूट, विनातक्रार केलं. अशी वेळ अनेक स्त्रियांच्या वाट्याला येतेच. एवढंच फक्त, की लक्ष्मीअम्मांनी निवडलेली वाट चारचौघींची नव्हती. उलट त्यांच्यासारख्याच चारचौघींनीही उपेक्षेने तोंड वेंगाडावं आणि बोटं उचलावीत अशीच होती.लक्ष्मीअम्मांना साथ केली ती त्यांच्या शरीराने आणि चाचपडत का असेना, मिळवलेल्या मूक हिमतीने!पण आपण जे करतो आहोत, त्याचं मोल कोणालाच - अगदी स्वत:लाही कदाचित- नसण्याच्या धास्तीची रुखरुख, त्यापायी मनावर सतत असलेलं गुप्ततेचं दडपण त्यांना आयुष्यभर वाहावं लागलं आहे. या पार्श्वभूमीवर अम्मांची कर्मभूमी असलेल्या जेजे महाविद्यालयाचा, तिथल्या विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांचा उल्लेख अम्मा ज्या कृतज्ञतेने करतात, ते फार मनोज्ञ आहे आणि मोलाचंही!२५ वर्षांनंतर का असेना, अम्मांच्या आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या आयुष्यभराच्या कामाविषयी मोकळेपणाने, उघडपणाने बोलण्याची संधी त्यांना मिळाली आहे.- आणि हो, न्यूड सिनेमा प्रदर्शित होऊन आता इतके दिवस होऊन गेले, तरी आधीची वादळं पुन्हा परतलेली नाहीत.नग्नतेकडे पाहण्याची आपली सामाजिक दृष्टी एकदम बदलणार वगैरे नसली, तरी किमान त्यात सभ्यता येऊ घातली आहे, याचंच हे निदर्शक असेल का?- असू दे!(लेखक आॅनलाइन लोकमतमध्ये उपसंपादक आहेत.onkark2@gmail.com )