शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

अँड अ‍ॅवॉर्ड गोज टू....

By admin | Published: June 22, 2014 12:38 PM

प्राण्यांना घेऊन चित्रपट करणं नवं नाही. मात्र आपल्याकडे ते बघवत नाही. ‘कान महोत्सवा’त पाहिलेल्या चित्रपटात ज्या पद्धतीनं मांजर व विशेषत: कुत्र्याचा वापर करून घेण्यात आला आहे, त्याला तोड नाही. ते सगळं मानवी भावनांशी जोडून घेण्यात आलं होतं हे विशेष!

 अशोक राणे

 
प्राण्यांना घेऊन चित्रपट करणं नवं नाही. मात्र आपल्याकडे ते बघवत नाही. ‘कान महोत्सवा’त पाहिलेल्या चित्रपटात ज्या पद्धतीनं मांजर व विशेषत: कुत्र्याचा वापर करून घेण्यात आला आहे, त्याला तोड नाही. ते सगळं मानवी भावनांशी जोडून घेण्यात आलं होतं हे विशेष!
------------
प्रत्येक माणूस हा कुत्र्याचा मित्र असतोच असं नाही. हे कुणा सर्वसाधारण माणसाचं किंवा अगदी माणसातल्या विचारवंताचं वगैरे म्हणणं नाही, तर चक्क एका कुत्र्याचंच निरीक्षण आहे. त्याचं नाव हॅगन! तो भेटला हंगेरियन दिग्दर्शक कोर्नेल मुंद्रोझ याच्या व्हाइट गॉड या चित्रपटात! तर अशा या विचारवंत तसेच ‘संवेदनशील’ कुत्र्याचं, आपल्याला अजब वाटणारं निरीक्षण तपासून पाहण्याआधी केवळ माणूस आणि कुत्राच नव्हे, तर माणूस आणि इतर प्राणी या पारंपरिक नात्याची एक गोष्ट पाहू या. इटालियन दिग्दर्शिका आसिआ आरगेंतो हिच्या मिसअंडरस्टुडमधल्या आरियाची बेस्ट फ्रेंड आहे तिची मांजरी- डॅक! आरिया अवघी नऊ वर्षांची आहे. अभ्यासात हुशार आहे. पोर गुणवान आहे; परंतु म्हणूनच ती शाळेत एकटी पडते. एरवीही ती एकटी, एकाकी आहे. घरी दोन थोरल्या सावत्र बहिणी आहेत. एक वडलांना पहिल्या बायकोपासून झालेली, तर दुसरी आईच्या आधीच्या नवर्‍यापासूनची! आपापल्या लेकींना दोघांनी भलतंच लाडावून ठेवलेलं आहे. आरिया या दोघांची! सावत्र बहिणींना तिच्याविषयी मुळी कसली मायाच नाही. 
वडील सिनेनट, तर आई संगीत क्षेत्रातली. दोघांनाही सतत बाहेर राहावं लागतंय. तशातच त्यांनी वेगळं राहायचा निर्णय घेतलाय. वडील आपल्या नव्या मैत्रिणीकडे राहायला गेलेत. आईला तिच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा बर्‍याच दिवसांसाठी बाहेर गावी जावे लागते, तेव्हा ती या पोरींची रवानगी नवर्‍याकडे करते. थोरल्या दोघींना, इथे काय तिथे काय काहीच फरक पडत नाही; कारण दोन्हीकडे लाडच व्हायचेत. आरियाला मात्र हे कठीण जातंय; कारण एक तर पाठीवर बिर्‍हाड घेतल्यासारखं इथून तिथून फिरत राहावं लागतंय आणि तिच्या मांजरीविषयी कुणालाच ममत्व नाही. उलट घृणाच आहे. 
अशा या विखुरलेल्या कुटुंबात आरिया अधिकच एकटी आहे. तिला सोबत आहे ती डॅकची! त्यामुळे या घरातून त्या घरात सतत मुक्काम हलवताना पाठकुळीला बॅकपॅक आणि हातात डॅक असलेला पिंजरा घेऊन ती सतत ये-जा करते. कुठल्याही परिस्थितीत आरिया डॅकला सोडत नाही.. 
सभोवतालच्या माणसांशी संवाद जुळून येत नाही तेव्हा एखाद्या व्यक्तीचा एखाद्या प्राण्याशी, पक्ष्याशी ऋणानुबंध जडतो, याच्या अनेक कथा आजवर प्रत्यक्षात आणि विविध कलाकृतींतून पाहिल्या.. अनुभवल्या! त्याच धारेतला हा मिसअंडरस्टुड! अतिशय नजाकतीनं केलेला. माणूस आणि प्राणी यांचं नातं एका सहजतेनं चितारणारा. रसभंग करू शकेल अशा भावुकतेला निग्रहपूर्वक दूर करीत नेमका परिणाम साधणारा! आपलं  माणूस सोबत असलं, की 
प्रतिकूल परिस्थितीत जगतानाही एक प्रकारचा आत्मविश्‍वास जागा होतो आणि अवघं जगणंच सुसह्य, सुरक्षित होऊन जातं. या संकल्पनेभोवती फिरणारा हा चित्रपट तमाम नातेसंबंधांकडे एका विेषक नजरेने पाहायला लावतो. 
मिसअंडरस्टुडमधल्या आरियाचं जसं तिच्या मांजरीशी घट्टमुट्ट नातं आहे, तसंच ते व्हाइट गॉडमधल्या लिलीचं तिच्या कुत्र्याशी- हॅगनशी आहे. तिलाही तिचा हॅगन सर्वांत जास्त प्रिय आहे आणि तिच्या सभोवतालच्या सर्वांनाच तो तितकाच नकोसा आहे. वरवरचं कथानक किंवा कथासूत्र दोन्हीकडे सारखं असलं तरी व्हाइट गॉड एका व्यापक राजकीय आशयाकडे जाणारा आहे. अनेक अर्थछटा धुंडाळायला लावणारा आहे. 
लिलीचे वडील लिलीला आणि हॅगनला शहराच्या बाहेर दूर कुठेतरी आडवाटेला नेतात आणि हॅगनला गाडीबाहेर काढून गाडी सुसाट सोडतात. हॅगन गाडीचा पाठलाग करतो; मात्र तो लिलीला गाठू शकत नाही. शहराबाहेरच्या या बकाल भागात तो मग असाच बेवारशीसारखा इतर भटक्या कुत्र्यांबरोबर वावरू लागतो.. ही कुत्रीही त्यांच्या मालकांनी अशीच आणून सोडलीत. कारण नव्या कायद्याप्रमाणे मिश्र जातीची कुत्री पाळायची असतील तर भरमसाठ कर भरावा लागतो. त्यामुळे अशा सोडून दिलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व्यापक आणि अतिशय आक्रमक मोहीम राबविली जाते. हॅगनही त्यात सापडतो. हॅगनला जेवढं लिलीचं प्रेम मिळालंय, तेवढीच त्याने लिलीच्या वडलांची, इतर शेजारपाजार्‍यांची घृणा अनुभवलीय. त्याच्याविषयी, त्याच्या तमाम जातभाईंविषयी ही घृणा आता एक मोठ्ठे व्यापक आणि अतिशय हिंस्र स्वरूप धारण करते. एक अभूतपूर्व असे घमासान युद्ध सुरू होते. 
कुत्री पकडणारी फौज त्यांच्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह हल्लाबोल करते, परंतु ही कुत्रीही संघटित होत हॅगनचं नेतृत्व स्वीकारीत प्रतिहल्ला करतात आणि मग ती रक्तरंजित सूड घेत जातात. शहरात दहशतीचं राज्य पसरतं. या कुत्र्यांना आवरणं अशक्यच होऊन बसतं.. परंतु अखेर लिलीच पुढे होते आणि अखेरचा हल्ला तिच्या वडलांवर करायला आलेल्या हॅगन आणि त्याच्या गँगसमोर ती लोटांगण घालते. गुरगुरणारी गँग जागच्या जागी गुरगुरत शांत होत जाते. दरम्यान, लिलीचे वडीलही येऊन लोटांगण घालतात. हॅगन या शरणार्थीला माफ करतो. युद्ध थांबतं आणि सिनेमाही! 
चित्रपटाचं नाव व्हाइट गॉड आणि प्रमुख पात्र कुत्रं. डॉग! क्षणभर वाटावं, की स्पेलिंग मिस्टेक आहे की काय? ऊड¬चं ¬डऊ झालं की काय?  परंतु चित्रपट पाहिला आणि उलगडा झाला. 
आपल्या सोयीने, आपल्या मर्जीनुसार वरचा वर्ग खालच्या वर्गाला जवळ घेतो आणि मनाला येईल तेव्हा आक्रमक होत अंगच्या सार्‍या सार्मथ्यासह निर्दयपणे त्याला चिरडूनही टाकतो. कुणाचं काय करायचं याचा सर्वाधिकार यांचा यांनीच घेतलेला. हे व्हाइट आणि बाकीचे.. परंतु कधी तरी एक दिवस हे इतर असा काही हल्लाबोल करतील, की यांना पळता भुई थोडी होईल. आजवर अनेकदा हे दिसून आलंय. शोषितांच्या सहनशक्तीचा अंत फार नाही पाहता येत. व्हाइट गॉड याच सत्याकडे पाहायला लावतो. मैत्री आणि नातं हे विशुद्ध नसतंच. त्यालाही एका व्यापक राजकारणाचा संदर्भ असतो, हेही हा चित्रपट अधोरेखित करतो. सबळ आणि दुर्बल यांच्यातल्या या चिरंतन संघर्षमय संबंधाचा हा चित्रपट नेमका वेध घेतो. 
दिग्दर्शक कोर्नेल मुंद्रोझ याने वरवर एक अँक्शनबाज सूडकथा वाटणारी ही कथा प्रगल्भतेने हाताळली आहे आणि म्हणूनच ती अशा एका व्यापक आशयसूत्राला भिडते. आयुष्याची आणि कलाविष्काराची प्रगल्भ जाणच असा परिणाम साधू शकते आणि अशी एखादी अभिजात कलाकृती घडवू शकते. एक-दोन नव्हे तर दोनशे कुत्र्यांकडून अभिनय करून घेणं हे केवळ अशक्यच म्हणावं लागेल. क्रमाक्रमाने जबरी हिंस्रता गाठणारी अँक्शन त्यांच्याकडून करवून घेणं हे तर अशक्य वाटावं असंच आहे; परंतु ते छानच जमून आलंय. हॅगन सोडून बाकीच्या कुत्र्यांना कुठे उकिरड्यावर भटकणे, प्रसंगी गुरगुरणे आणि गँग करून शहराच्या रस्त्यातून हल्लय़ाच्या पवित्र्यात जीव खात धावत सुटणे इतकाच अभिनय करायचा होता. परंतु, प्रमुख व्यक्तिरेखा म्हणून हॅगनने प्रेम, माया, रुसणं, बारीक रागावणं, नाकारलं जाणं, लिलीच्या पुनर्भेटीसाठीची तगमग, क्रमाक्रमाने सूडभावनेने पेटत जात लढय़ाचं नेतृत्व आपल्याकडे घेत जाणं, युद्ध पुकारणं आणि अखेरीस लिलीच्या लोटांगणापुढे सारी शस्त्रं खाली ठेवणं, तिच्या वडलांकडे करुणेनं पाहणं अशा किती तरी गोष्टी एखाद्या सर्मथ नटाप्रमाणे बारकाईने दाखविल्या आहेत. आमचा एक मित्र म्हणाला देखील, ‘‘या वर्षी कानच्या ज्युरींनी नियमाला अपवाद करून हॅगनची भूमिका करणार्‍या या कुत्र्यालाच सर्वोत्तम नटाचा पुरस्कार द्यायला हवा.’’
सहजच पटण्यासारखं होतं हे.! चित्रपटाच्या सादरीकरणाआधी व्यासपीठावर दिग्दर्शक, निर्माता, तंत्रज्ञ, कलावंत येतात आणि प्रेक्षकांना अभिवादन करतात. गंमत म्हणजे व्हाइट गॉडच्या खेळाच्या आधी दिग्दर्शक कोर्नेल मुंद्रोझ याच्याबरोबर हॅगनची भूमिका करणारा हा प्रतिभावंत व्यासपीठावर उपस्थित होता.. न बुजता.. न घाबरता.. एखाद्या सराईतासारखा.! 
पुढे दोन दिवसांनी ज्याँ ल्यूक गोदार यांचा गुडबाय टू लँग्वेज पाहिला आणि मला मनापासून वाटलं, की सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हॅगनची भूमिका करणार्‍या त्या श्‍वान नटवर्यापेक्षा गोदारच्या चित्रपटातील नटवर्याला द्यायला हवा. कारण तिथे या श्‍वान नटवर्याला मोठ्ठं आव्हान होतं. चित्रपट माध्यमात फार मोठे मन्वंतर आणणार्‍या १९५0च्या दशकात आलेल्या फ्रेंच न्यू वेव्हचे एक प्रणेते ज्याँ ल्यूक गोदार आज ८३ वर्षांचे आहेत. दिग्दर्शक झाल्यापासून ज्यांनी रूढ वाटेने निघालेल्या पारंपरिक चित्रपटभाषेला नाकारलं, नव्या अनवट भाषेला जन्म दिला, त्याच गोदारने आयुष्याच्या या वळणावर केलेल्या चित्रपटाचं नाव आहे - गुडबाय टू लँग्वेज! हे खरं तर त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाला, कलाजाणिवांना, कलाविषयक विचारांना आणि धोरणांनाही साजेसंच आहे. भाषेलाच निरोप.. मग संवाद कसा व्हायचा? त्याची क्षिती गोदारनी का बाळगावी? कुणाला काय वाटेल, त्याहीपेक्षा कळेल न कळेल याचीही तमा या अवलियाने कधी बाळगली नाही. तो त्याचे चित्रपट करत गेला आणि पुरेसे कळले- नाही कळले तरी त्याचा जगभरचा प्रेक्षक, ज्याने त्याची साथ कधीच सोडली नाही, तो पाहतच गेला. परवा कानमध्ये या त्याच्या प्रेक्षकाने त्याच उत्साहात गुडबाय टू लँग्वेजही पाहिला. त्याच्या चाहत्यांच्या लेखी तो एक आगळा सुखद अनुभव होता. कारण थिएटरमध्ये दस्तुरखुद्द गोदार उपस्थित होते. त्याआधी त्यांच्या टीमबरोबर ते रेड कार्पेटवरून आले. व्यासपीठावर मात्र ते आले नाहीत. त्यांचा एकूण वावर जत्रेत हरवलेल्या मुलासारखा होता. 
त्यांचे चित्रपट सहजपणे कळण्यासारखे नसतात. ते पुन्हा पुन्हा पाहावे लागतात. आणि तरीही त्यांचा जगभरचा प्रेक्षक गेली पाच-सहा दशके त्यांचे चित्रपट आवर्जून पाहतो आहे. 
यातला एक संवाद माझ्या कायम स्मरणात राहील.. डॉग्स आर नेव्हर नेकेड बिकॉज दे आर नेकेड.. 
आपल्याकडल्या एका महोत्सवात त्यांच्या प्रनोम कार्मेन या चित्रपटाला थिएटर भरून वाहिलं इतकी गर्दी लोटली होती. आम्ही काही मित्र मधल्या जागेत जमिनीवरच बसलो होतो. आमच्या मागेच बासू भट्टाचार्य बसले होते. चित्रपट संपला. बासुदा माझ्या पाठीवर थाप मारीत म्हणाले, 
ही हॅज द गट्स टू मेक धिस काइंड ऑफ फिल्म अँड यू डोण्ट हॅव द गट्स टू वॉक आऊट ऑफ द थिएटर.  
गोदार यांची इतकी नेमकी ओळख क्वचितच कुणी तरी करून दिली असेल. 
एकदा एका पत्रकाराने त्यांना विचारलं, 
चित्रपटाला सुरुवात, मध्य आणि शेवट असायला हवा हे तरी तुम्ही मानता की नाही? ते म्हणाले, 
अलबत! परंतु याच क्रमाने नव्हे! 
फेस्टिव्हलच्या कॅटलॉगमध्ये त्यांच्या या चित्रपटाचं कथासूत्र (?) आयडिया इज सिंपल  या वाक्याने सुरू होतं. त्यांच्या प्रेक्षकाला चांगलं ठाऊक असतं.. इथं काही सरळ, सोप्पं असणार नाही.. भिरभिरायला होणार आहे आणि तशातच या अवलियाने आपला हा नवा चित्रपट थ्रीडीमध्ये केलाय. मध्ये एकदा तर एका दृश्यात त्याने असा काही प्रकार केलाय, की कळेचना की डोळ्यांवरच्या थ्रीडीच्या चष्म्यात अचानक काही झालंय, की तिकडे प्रोजेक्शनमध्ये काही घोळ झालाय. नेमकं कळेना आणि त्याचा पाठपुरावा करणं संपेना.. ..तर अशा या आयडिया इज सिंपल चित्रपटात पुन्हा एक कुत्राच प्रमुख भूमिकेत आहे. सातत्याने गोदारचे चित्रपट पाहणार्‍या त्यांच्या प्रेक्षकांना त्यांचे चित्रपट धड कळत नाहीत तिथे त्यांची ही सिंपल संकल्पना समजून घेऊन त्यांच्या चित्रपटात चोख भूमिका बजावणार्‍या या श्‍वान नटवर्यालाच नको का सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार द्यायला.? 
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)