(संकलन : शर्मिष्ठाभोसले)
भेटी, गप्पा, सोबत केलेले प्रवास, स्पर्श, मिठी, चुंबन... सध्या किती दुर्मीळ या साऱ्या गोष्टी! पण इटलीतल्या मायकेल डे अलोपाज आणि पाओला एग्नेली या जोडप्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या सक्तीवर मार्ग शोधलाच शेवटी! दोघेही इटलीतल्या वेरोना या शहरात राहतात. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये दोघेही आपापल्या घरात अडकून पडलेले. बाल्कनीत उभ्या मायकलच्या नजरेनं समोरच्याच बाल्कनीतल्या पाओलाला हेरलं. त्याच रात्री पाओलालाही मायकल त्याच्या गच्चीत शतपावली करताना दिसला. एका उदास संध्याकाळी पाओलाची बहीण व्हायोलिनवर एका गाण्याची धून वाजवीत होती. ‘वी आर चॅम्पियन्स...’ आसपास अंधारून आलेल्या काळात क्वारंटाइन झालेल्या लोकांना जगण्या-जगवण्याचं बळ मिळावं म्हणून केलेला हा एक सुंदर प्रयत्न. रोज संध्याकाळी सहा वाजता ही सांगितिक मैफल साकारायची. बहिणीच्या परफॉर्मन्सवेळी पाओलाही तिथेच होती. पुन्हा मायकेलची नजर पाओलावर पडली आणि तिच्या गोड चेहऱ्यावर अडकून राहिली.
इकडं पाओलाची अवस्थाही काही वेगळी नव्हती. गंमत अशी, की पाओलाची बहीण आणि मायकल एकमेकांना ओळख होते. मात्र, या सगळ्या कुलूपबंद दिवसांत पाओलाला गाठण्याचे सगळे मार्ग गोठलेले. एकच आशा होती, ती म्हणजे, ऑनलाइन सोशल प्लॅटफॉर्म्स. मायकेल एकेक करून सगळ्या ठिकाणी तिचं नाव शोधू लागला. अखेर त्याला प्रेमात वेडं करणारी ती सापडली इन्स्टाग्रामवर. मग दोघांचा संवाद सुरू झाला. रात्ररात्रभर टेक्स्टिंग चालायचं. तब्बल १० आठवडे आपापल्या बाल्कनीतून एकमेकांना टक लावून पाहत हे संवादसत्र सुरू होतं.
एके दिवशी मायकेलनं पाओलाचं नाव एका जुन्या बेडशीटवर मोठ्या-सुबक अक्षरात लिहून ते बाल्कनीत टांगले. पाओला हे सरप्राइज पाहून हवेतच गेली. हे असं सगळं मे उजाडेपर्यंत सुरू राहिलं.
...आणि अखेर ‘रोमिओ आणि ज्युलिएट’ भेटले! मे महिन्याच्या सुरुवातीला एका बागेत समोरासमोर येत दोघांनी मास्क उतरवीत एकमेकांना किस केलं. हे सगळं दोघांसाठीही कमालीचं अद्भुत होतं. सहा महिन्यांनी मायकल आणि पाओलानं एंगेजमेंट केली आणि त्यानंतर एकमेकांचे नातेवाईक आणि मित्रांच्या साक्षीनं लग्न...